खड्ड्यांमुळे अटल सेतू बनला अपघात केंद्र

|
08th May 2022, 11:37 Hrs
खड्ड्यांमुळे अटल सेतू बनला अपघात केंद्र

मांडवी नदीवरील अटल सेतूवर खड्ड्यांमुळे रविवारी संध्याकाळी झालेला अपघात.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा :
मांडवी नदीवरील अटल सेतू पुलावर पडलेले खड्डे अपघाताचे केंद्र ठरत आहे. या खड्ड्यांमुळे वारंवार होणार्‍या अपघातांमुळे हा सेतू अपघाताचे केंद्र बनला आहे. मेरशी ते पणजी दरम्याच्या अटल सेतूवर मोठमोठे खट्टे पडले आहेत. हे खड्डे चुकवण्याचा प्रयत्न वाहनचालक करतात आणि अपघातांना आमंत्रण देत आहेत. दररोज हा प्रकार पुलावर घडत आहे.
पुलावर पडलेले खड्डे चुकवण्यासाठी वाहनस्वार गाडीचा वेग अचानक कमी करतात. समोरील गाडीचा वेग कमी होताच मागून भरधाव वेगाने येणार्‍या गाडीचा समोरच्या गाडीला जोरदार धडक बसते व त्यानंतर मागून अपघातांची रांगच लागते.
रविवारी संध्याकाळी अशाच प्रकारे खड्डा चुकविण्याच्या नादात एका गाडी चालकाने गाडीचा वेग कमी केल्याबरोबर मागून येणार्‍या दोन गाडींनी एकमेकांना धडक दिली. या जोरदार धडकेमुळे एक कार दुभाजकावर जाऊन विसवली. या तीन वाहनांच्या अपघातात सुदैवाने कुणालाही गंभीर जखम किंवा जीवितहानी झाली नाही.

खड्डे कायमस्वरूपी न बुजवल्यास पावसात धोका
सध्या अटल सेतूवरील पडलेले खड्डे वाहनस्वारांच्या जीवावर बेतत असून हे खड्डे कायमस्वरूपी न बुजवल्यास पावसाळ्यात हा सेतू अधिक धोकादायी बनेल, अशी शक्यता वाहनस्वारांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने पाटो पणजी भागातील वाहतुकीची कोंडी सोडविण्याच्या हेतूने हा मांडवी नदीवरील तिसरा अटल सेतू पूल उभारला होता. त्यामुळे पुलाखालील वाहतुकीची समस्या सुटली. पण, पुलावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे हे पूल वाहतुकीसह अपघाताचे प्रमुख केंद्र बनू लागले आहे.‍