चोचीतले गाणे

पक्षी निरीक्षण करताना पक्षी बघणे जेवढे महत्त्वाचे असते तेवढेच त्यांचे आवाज ऐकणे हेही महत्त्वाचे असते. किंबहुना जेव्हा आपण जंगलात किंवा उंच आणि घनदाट झाडी असलेल्या ठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी जातो तेव्हा काहीवेळा आपल्याला पक्ष्यांचे आवाज आधी ऐकायला येतात आणि नंतर पक्षी दिसतात.

Story: पक्षिमित्राच्या दुर्बीणीतून | मंदार � |
07th May 2022, 11:39 pm
चोचीतले गाणे

मनुष्यप्राण्याला देवाने दिलेल्या असंख्य देणग्यांपैकी एक महत्त्वाची देणगी म्हणजे 'वाचा' किंवा बोलणारा गळा. आम्ही माणसे बोलू शकतो, गाऊ शकतो आणि ओरडूसुद्धा शकतो. काही सजीव विविध प्रकारचे आवाज काढून एकमेकांशी संवाद साधतात, पण गाण्याची कला मनुष्य वगळता फक्त पक्ष्यांकडेच असते. बहुतेक पक्ष्यांकडे त्यांचं असं एकच विशिष्ट गाणं असतं तर काही पक्षी तब्बल पंधरा-वीस वेग-वेगळी गाणी गाऊ शकतात. उदाहरणार्थ, मी दोन वर्षांपूर्वी नारिंगी भू कस्तुर (Orange-headed Thrush) ह्या पक्ष्याचे गाणे ध्वनिमुद्रित केले होते. त्या सव्वातीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रणात तब्बल २१ प्रकारचे वेगवेगळे आवाज त्या इवल्याश्या पक्ष्याने काढले. तुम्हाला जर ते ध्वनीमुद्रण ऐकायचे असेल तर www.macaulaylibrary.org/asset/444687041 इथं तुम्हाला ते ऐकायला मिळेल.

पक्षी निरीक्षण करताना पक्षी बघणे जेवढे महत्त्वाचे असते तेवढेच त्यांचे आवाज ऐकणे हेही महत्त्वाचे असते. किंबहुना जेव्हा आपण जंगलात किंवा उंच आणि घनदाट झाडी असलेल्या ठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी जातो तेव्हा काहीवेळा आपल्याला पक्ष्यांचे आवाज आधी ऐकायला येतात आणि नंतर पक्षी दिसतात. रात्रीच्या पक्षी निरीक्षणाच्या वेळी तर आपल्याला त्यांच्या आवाजावरच अवलंबून राहावा लागतं. विशेषतः निशाचर पक्षी, जसे घुबडांच्या (Owl) आणि रातव्यांच्या (Nightjar) प्रजातींना जर आपल्याला शोधायचे असेल तर आधी त्यांचे आवाज आपल्याला ओळखता आले पाहिजे.

पक्ष्यांच्या आवाजांचे विविध प्रकार असतात. त्यातले प्रमुख दोन प्रकार म्हणजे हाक (Call) आणि गाणे (Song). हाकेमध्ये आणि गाण्यामध्ये परत काही उपप्रकार असतात जसे कि पिल्लाची पालकांकडे खाऊ मागण्यासाठी दिलेली हाक (Begging Call), शत्रूपासून बाकी पक्ष्यांना सावध करण्यासाठी दिलेली हाक (Alarm call), उडताना दिलेली हाक (Flight Call). तसेच प्रणयाराधनेसाठीचे गाणे (Courtship Call) इत्यादी. कधी कधी काही कारण नसतानासुद्धा पक्षी गाणे गात असतात. काही विशेषतः छोट्या छोट्या गटाने फिरणारे पक्षी लहान सहान आवाज काढून बाकी पक्ष्यांकडे संवाद साधत असतात ज्याला आपण आपसातले संवाद (Contact Call) असे म्हणू शकतो. कोतवाल (Racket-tailed Drongo) दुसऱ्या पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करण्यात पटाईत असतो. कधी कधी तर तो माकड, खार ह्या सारख्या सस्तन प्राण्यांचेसुद्धा आवाज काढतो. काही निशाचर पक्षी तर आपल्याला घाबरवून टाकतात. सवाना रातवा (Savanna Nightjar) हुबेहूब घुंगरासारखा आवाज करतो. असं वाटतं की कोणीतरी बाई घुंगरू पायाला बांधून चालत आहे. दुसरा पक्षी म्हणजे श्रीलंका बे घुबड (Sri Lanka Bay Owl) हा तर असा आवाज करतो जशी कोणी स्त्री किंचाळते आहे. तुम्हीच विचार करा की कधी रात्रीच्या निरव शांततेत असे आवाज ऐकले तर एखाद्याचे भीतीने काय हाल होतील.  पक्षीछायाचित्रणाबरोबर पक्ष्यांचे आवाज ध्वनीमुद्रित करणे हा सुद्धा हल्ली नवीन छंद झाला आहे. पूर्वीच्या काळी ध्वनीमुद्राणाची साधने आजच्यासारखी छोटी आणि स्वस्त नसायची तेव्हा काही मोजकेच लोक ह्या क्षेत्रात असायचे. आजकाल सगळं डिजिटल झाल्याकारणाने आवाज ध्वनीमुद्रित करणे व नंतर संगणकाच्या मदतीने त्यात सुधार करणे सोपे झाले आहे. बाजारात छोटे छोटे खिशात मावणारे ध्वनीमुद्रक (Pocket Recorder) उपलब्ध आहेत. जर तुमच्याकडे असा ध्वनीमुद्रक नसेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा ध्वनीमुद्रण करू शकता. गोव्यात पक्षीध्वनीमुद्रणाची सुरुवात मूळ गोवेकर पण सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले श्री.आंद्रे मास्कारेन्हास ह्यांनी जवळपास पंधरा वर्षांपूर्वी केली. त्यांनीच पुढे माझ्यासारख्या काही स्थानिक युवकांना फक्त प्रशिक्षणच दिलं नाही तर स्वतःचे ध्वनीमुद्रणाचे साहित्य वापरायला दिले. आंद्रे सरांच्या प्रोत्साहनामुळेच आज गोव्यातल्या पक्ष्यांची जवळजवळ दीड हजार ध्वनिमुद्रणं www.xeno-canto.org ह्या जागतिक स्तरावरच्या पक्षी ध्वनीमुद्रण संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तुम्हाला जर कधी घराबाहेर पक्ष्याचा आवाज आला तर जरूर बाहेर जाऊन कोणता पक्षी आवाज करतो ते बघा. कुठला पक्षी आवाज करतो ते जर कळत नसेल तर मोबाईलवर तो आवाज ध्वनिमुद्रित करा आणि मला पाठवा. मी माझ्या परीने तो ओळखायला मदत जरूर करेन.