अमली पदार्थ : गुन्ह्यांत १९.३१ टक्के घट


21st January 2022, 11:53 pm
अमली पदार्थ : गुन्ह्यांत १९.३१ टक्के घट

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तसेच इतर पोलीस स्थानकांनी मिळून १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ११७ गुन्हे दाखल करून १३४ जणांना अटक करून त्यांच्याकडून २ कोटी ६८ लाख १७ हजार ७० रुपये किमतीचे १२९.१६५ किलो ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले. त्यामुळे २०२० मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत २०२१ मध्ये १९.३१ टक्के, अमली पदार्थ जप्तीत १३.०४ टक्के तसेच जप्त केलेल्या किमतीत ६२.२८ टक्के घट झाली आहेत.           

गोवा पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये १४५ गुन्हे दाखल करून १६९ जणांना अटक करून त्यांच्याकडून ७ कोटी ११ लाख ८ हजार ६५० रुपये किमतीचे १४८.५४४ किलो ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले होते. त्यामुळे कारवाई व जप्तीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याची दिसून आले आहे.            

या व्यतिरिक्त जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांत सर्वाधिक ९५.५२ टक्के गांजा तर ४.४८ टक्के रासायनिक अमली पदार्थ आहेत.            

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने आणि इतर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी व सेवन प्रकरणी केलेल्या कारवाईत सर्वाधिक १२३.३५० किलो ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ३३.२० ग्रॅम कानाबीस, ४. ८९६ किलो ग्रॅम चरस, ५४१ ग्रॅम हशीश तेल, ८२.५३ ग्रॅम एमडीएमए, ८२.७४ ग्रॅम कोकेन, ५८.१८१ ग्रॅम एलएसडी, ८.१ ग्रॅम एमपिथामाईन, १२२.७५९ ग्रॅम एॅक्टेसी टॅबलेट्स, ९.५९ ग्रॅम हिरोईन आणि १३.२० ग्रॅम मॅथेफेथामाईन मिळून १२९.१६५ किलो ग्रॅम अमली पदार्थ जप्त केला आहे.            

राज्यात २०२१ मध्ये सर्वाधिक २४ गुन्हे अमली पदार्थ विरोधी पथकाने दाखल केले आहेत. त्यापाठोपाठ कळंगुट पोलिसांनी १८, गुन्हा शाखा आणि पेडणे पोलिसांनी प्रत्येकी १३,  हणजूण १० गुन्हे, पणजी आणि म्हापसा पोलिसांनी प्रत्येकी ७ गुन्हे, मडगाव आणि काणकोण पोलिसांनी प्रत्येकी ४, कोलवा ३, कोळवाळ, वेर्णा, वास्को, फातोर्डा आणि केपे पोलिसांनी प्रत्येकील २ गुन्हे दाखल केले आहेत. कोकण रेल्वे, साळगाव, फोंडा आणि कुंकळ्ळी पोलिसांनी प्रत्येकी १ गुन्हे मिळून राज्यात ११७ गुन्हे दाखल केले आहेत.

२०२१ मध्ये अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी सर्वाधिक ६६.४१ टक्के म्हणजे ८९ परप्रांतियांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त १७.९१ टक्के म्हणजे २४ गोमंतकीयांच्या तर १५.६७ टक्के म्हणजे २१ विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या विदेशी नागरिकांत सर्वाधिक १२ नायजेरियनाचा समावेश आहेत. त्यानंतर तीन रशीयन, दोन आयवरीयन तर नेपाल, गुनिवा, युक्रेन आणि ऑस्ट्रीयाचा प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. 

हेही वाचा