बहुमुखी सितारा

आभाळात रात्रीच्या वेळी असंख्य तारे चमकत असतात. पण पृथ्वीवरही एक असा सितारा आहे, ज्याने आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या अनेकांचे जीवन प्रकाशमय केलेले आहे.

Story: गगनभरारी | सिंथिया कृष्णा गावकर |
22nd January 2022, 11:11 Hrs
बहुमुखी सितारा

सितारा सिताराम मांद्रेकर हीचा जन्म २१ जानेवारी, १९९८ साली पराष्टे पेडणे येथे झाला. तिने आपलं बी. ए. बी. एड. पर्यंतचं शिक्षण गणपत पार्सेकर महाविद्यालयात पूर्ण केलं. तिला लहानपणापासूनच विविध खेळ खेळण्याची व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची खूप आवड होती. तिचे वडील तिला मल्टीटास्कर म्हणून हाकही मारायचे. घरात ती सगळ्यांची लाडकी. कुणाचं काही अडलं नडलं तर सर्वात प्रथम तिच्याकडे जायचं. आणि तीही कधी कोणाला नाही म्हणत नाही. जणू तिच्या बाबांचेच गुण तिच्यात अवतरलेत.

मित्रांबरोबर किंवा शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर खेळ खेळता - खेळता तिच्या मनात क्रिकेट खेळण्याची आवड तयार झाली. आपण म्हणतोच ना इच्छा तिथे  मार्ग. तिच्या क्लेंसी नावाच्या मैत्रिणीने तिला आपल्या क्रिकेटसंघात सामील करून घेतले. सिताराच्या वडिलांबरोबर तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही क्रिकेटची  खूप हौस होती म्हणून तिच्या या निर्णयाला तिच्या घरच्यांनी पुरेपूर पाठिंबा दिला. खरं पहायला गेलं तर तिच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव २०१९ आणि २०२१ मध्ये मिळाला. जेव्हा तिने भुवनेश्वरमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय क्रिकेट सामन्यात गोवा संघात सहभागी होऊन मानाचा विजेता चषक पटकावला. त्याच बरोबर तिला खेळातील राष्ट्रीय अधिकारी म्हणून किताब देण्यात आला. तिच्या कुटुंबाबरोबरच हा संपूर्ण गोवा राज्यासाठी अभिमानास्पद क्षण होता. लहान मोठे सामने खेळताना कधी गोव्याबाहेर पाऊल पडले हे तिला कळलेच नाही. पण तिने कधीही आपल्या कर्मभूमीला पाठ दाखवली नाही.

पाखरू कितीही वर उडलं तरी ते आपलं घरटं कधी विसरत नाही. सितारानेही आकाशात एवढी मोठी झेप घेतली तरीही ती आपला गाव आपला तालुका विसरली नाही. तिने राजू केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक कलंगुटकर यांच्या ' ध्रुव ' या संस्थेमध्ये मुलींचा क्रिकेट संघ तयार केला आणि त्याच बरोबर या संघाचे कर्णधारपद तिने आपल्या हाती घेतले. मोठे पद म्हणजे मोठी जबाबदारी पण सिताराने आपल्या संघाच्या मदतीने आणि स्वत:च्या जिद्दीने ही कामगिरीसुद्धा यशस्वीरित्या पार पाडली. राज्यस्तरीय क्रिकेट सामन्यात अनेक पदके पटकावून तिने अवघ्या काही दिवसांत ध्रुव महिला क्रिकेट संघाचे नाव अख्या राज्यात गाजवले.

हा तिचा सगळा प्रवास उत्सुकतेने आणि आनंदाने चालत असता तिचे आधारस्तंभ असलेल्या वडिलांच्या अकाली  निधनाने तिच्या संपूर्ण परिवारावर दुःखाचे सावट पसरले. एकवीस वर्षांच्या शिक्षण आणि क्रिकेट एवढंच सांभाळणाऱ्या मुलीवर घरातील थोरली मुलगी असल्याने आर्थिक जबाबदाऱ्या येऊ लागल्या. बाबांचे बोट धरून चालणाऱ्या मुलींवर आज आपल्या आई आणि दोन लहान भावंडांना आधार द्यायची वेळ आली. या प्रसंगाने सर्वात जास्त तिलाच हादरवून सोडले होते, पण तिने आपल्या मनाची वेदना चेहऱ्यावर झळकू न देता संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलली.

तिच्या वडिलांचा तिच्यावर खूप विश्वास आणि प्रेम होतं. आणि याच गोष्टींच्या बळावर,  आज अनेक मुलांचे प्रेरणास्थान बनून  ती सध्या सेंट. एन विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्याचबरोबर ती योगा प्रशिक्षण कार्यशाळा ही घेते. आपल्या कुटुंबाची काळजी घेत ती आपली आवड, क्रिकेट आणि शिक्षकी पेशा अचूकरित्या सांभाळत आहे. जेव्हा जेव्हा ती कोणतेही बक्षिस किंवा चषक घेऊन घरी परतायची तेव्हा सर्वात जास्त आनंदी तिचे वडील व्हायचे. आज सितारा आपले कलागुण जोपासत असताना घरातील व्यक्तींना वडीलांची कमी भासू नये म्हणून प्रयत्न करीत आहे. आपल्या चिमुरडीला आपला संसार चालवताना बघून तिच्या वडिलांना तिचा खूप जास्त अभिमान वाटत असेल. सितराचा जन्म फक्त लखलखण्यासाठी झालेला आहे हे तिने आज सर्वांना दाखवून दिले.