अग्रलेख । भाजपची यादी आणि डोकेदुखी

भाजपमधील अनेक नेते उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत, जे बंड करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसमध्येही तीच स्थिती आहे. पुढील चार पाच दिवस भाजप, काँग्रेसमध्ये बंड उफाळून येईल. निवडणुकीपर्यंत हे बंड सुरूच राहतील.

Story: अग्रलेख |
21st January 2022, 12:46 am
अग्रलेख । भाजपची यादी आणि डोकेदुखी

कुठल्याच राजकीय पक्षाच्या उमेदवारांच्या यादीची जेवढी प्रतीक्षा लोकांना नव्हती तेवढी एका भाजपची होती. अनेक ठिकाणी कोणाचा पत्ता कापला जाईल आणि कोण उमेदवारी मिळवण्यात यशस्वी होईल, यावरून निर्माण झालेला सस्पेन्स वाढल्यामुळे सगळ्यांमध्ये भाजपच्या यादीविषयी उत्सुकता होती. भाजपनेही अभ्यास करून आपले नुकसान कमी होईल आणि सत्ता स्थापनेसाठीचा मार्ग सुकर होईल या पद्धतीने उमेदवारांच्या नावावार चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केल्यानंतर शेवटी भाजपने ३४ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. दुधाने तोंड पोळले तर ताक फुंकून पितात असे म्हटले जाते. भाजपच्या पदरी दिवसेंदिवस तोंड पोळून घेण्याच्याच घटना पडत आहेत. आता तर तोंड पोळण्यापूर्वीच ताक फुंकून प्यावे असेच जणू भाजपच्या नेत्यांनी ठरवलेले दिसते. त्यामुळे सावध पावले टाकत भाजपने ३४ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. अजून सहा ठिकाणी भाजप उमेदवार देणार आहे. कुठलाच मतदारसंघ सोडू नये तर चाळीसही मतदारसंघात निवडणूक लढवावी असा भाजपचा हेतू आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये गोव्यात ३० टक्क्यांच्या वर मते भाजपने मिळवली आहेत, त्यामुळे मतांची टक्केवारी तीसपेक्षा जास्तच राहील, त्यासोबतच काही मतदारसंघांमध्ये अपक्षांना भाजपचा छुपा पाठिंबा आहे असे तिथल्या मतदारांना वाटू नये यासाठी सर्व मतदारसंघांत कमळ चिन्ह देण्याचे भाजपने ठरवले असावे.२००७,२०१२ आणि २०१७ या तिन्ही निवडणुकांमध्ये प्रत्येकी ३०.३ टक्के, ३४.६७ टक्के आणि ३२.५ टक्के अशी मतांची टक्केवारी भाजपने मिळवली. काँग्रेसने या तीन निवडणुकांमध्ये प्रत्येकी ३२.३ टक्के, ३०.७८ टक्के आणि २८.४ टक्के अशी मते मिळवली. भाजपने आपल्या मतांची टक्केवारी ३० आणि त्यापेक्षा वर नेली. दरम्यान काँग्रेसची मते घटत गेली. यावेळी तृणमूल, आम आदमी पार्टी या पक्षांची सक्रियता त्याशिवाय गोवा फॉरवर्ड, मगो, रिव्होल्युशनरी गोवन्स या पक्षांचा सहभाग निवडणुकीत असल्यामुळे भाजप आणि काँग्रेसची मते आणखी घटू शकतात याचा अंदाज भाजपला आहे, त्यामुळे मतांची टक्केवारी शाबूत ठेवतानाच उमेदवारही चांगले द्यायचे असा प्रयोग भाजपने केला आहे. यात भाजपला किती यश येईल ते सांगणे शक्य नसले, तरी भाजपच्या उमेदवारांच्या यादीनंतर राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आलेले आहे. भाजपमधील अनेक नेते उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत, जे बंड करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसमध्येही तीच स्थिती आहे. पुढील चार पाच दिवस भाजप, काँग्रेसमध्ये बंड उफाळून येईल. निवडणुकीपर्यंत हे बंड चालूच राहतील.
भाजपने पणजीत बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देऊन गेले काही दिवस उत्पल पर्रीकर यांच्यासाठी पणजीत वातावरण निर्माण करणाऱ्या लोकांचा मनोभंग केला आहे,. पण उत्पललाही डिचोली, सांताक्रुझ असे मतदारसंघ पर्याय म्हणून निवडण्यासाठी सांगितले गेले. उत्पल काय भूमिका घेतात ते पहावे लागेल. उत्पलने बंड केले तर ते उत्पल आणि भाजप या दोघांनाही तितकेच नुकसानकारक ठरू शकते. डिचोलीसारख्या ठिकाणी भाजपला उमेदवार निवडण्यास कठीण जात आहे. सभापती राजेश पाटणेकर यांनी उमेदवारी नाकारल्यामुळे तिथे भाजपची मोठ्या प्रमाणात मते असतानाही उमेदवार सापडत नाही अशी स्थिती आहे. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे डिचोलीशी नेहमी चांगले नाते राहिले आहे त्यामुळे उत्पलला तिथले मतदार स्वीकारू शकतात असे भाजपला वाटत असल्यामुळे त्यांनी उत्पलला डिचोलीतून उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. या निवडणुकीत इतर कुठल्या मुद्यावरून जेवढी भाजपला डोकेदुखी झालेली नाही तेवढी उत्पलच्या विषयावरून झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी जे भाषा आंदोलनानंतर 'फसवले गेलो' असे म्हणून गप्प बसलेले आणि पर्रीकरांच्या विरोधात तोंड उघडण्याची हिंमत दाखवत नव्हते, त्यातील काहीजण आता अचानक उत्पलच्या मुद्द्याचा आधार घेऊन भाजपवर टीकेची झोड उडवत आहेत. भाजपला हा घरचा आहेर सर्वात जास्त डोकेदुखीचा ठरत आहे. त्यातच आता उमेदवारांची यादी आल्यानंतर अनेक ठिकाणी बंडही होत आहे, त्यामुळे मतदानाला वीस बावीस दिवस राहिलेले असताना भाजपसमोर या कालावधीत अंतर्गत धुसफूस थांबवण्याचे आव्हान असेल.