आमदार जोशुआ यांच्याकडे वचनबद्धतेचा अभाव

काँग्रेस उमेदवार सुधीर कांदोळकर यांना रायन ब्रागांझा यांचा पाठिंबा


21st January 2022, 12:42 am
आमदार जोशुआ यांच्याकडे वचनबद्धतेचा अभाव

म्हापसा येथे पत्रकार परिषदेत काँग्रेस उमेदवार सुधीर कांदोळकर यांना पाठिंबा व्यक्त करताना रायन ब्रागांझा. सोबत मायकल लोबो, विजय भिके व इतर. (उमेश झर्मेकर)


प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा ‍: म्हापसा मतदारसंघाला वचनबद्ध अशा नेत्यांची गरज आहे. आमदार जोशुआ डिसोझा यांच्यात ती क्षमता दिसत नाही. लोकप्रतिनिधींची जबाबदारी पेलण्यास ते असमर्थ आहेत. कोविडच्या काळात जोशुआ हे घाबरून घरी बसले. तर वयस्कर असूनही सुधीर कांदोळकर हे लोकसेवेत होते. यातूनच, आमदारांची गुणवत्ता व जबाबदारी दिसते, अशी टीका करीत भाजपचे नेते तथा माजी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी म्हापशातील काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
गुरुवारी मरड-म्हापसा येथे कांदोळकर यांच्या प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते मायकल लोबो, उमेदवार सुधीर कांदोळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भिके, गटाध्यक्ष अ‍ॅड. शंशाक नार्वेकर, नगरसेवक आनंद भाईडकर, नगरसेविका अन्वी कोरगांवकर, कमल डिसोझा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गुरुवारी दुपारी भाजपने म्हापशाची उमेदवारी आमदार जोशुआ डिसोझा यांना जाहीर केली. त्यानंतर संध्याकाळी रायन ब्रागांझा काँग्रेस उमेदवार सुधीर कांदोळकर यांना जाहीररीत्या आपला पाठिंबा व्यक्त केला. माजी नगराध्यक्ष असलेले ब्रागांझा यांचा पालिका प्रभाग ९ तसेच इतर प्रभागांमध्ये प्रभाव आहे. नगरसेविका डॉ. केयल ब्रांगाझा यांचे ते बंधू असून त्यांच्या या भूमिकेमुळे आमदार जोशुआ व भाजपला मोठा धक्का असल्याचे म्हापशातील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
ब्रागांझा म्हणाले, आपण भाजपचा राजीनामा दिलेला नाही. पक्षावर आपला रोष नसून माझा मी निर्णय पक्ष नेतृत्वाला कळविला आहे. शिवाय जोशुआ डिसोझा यांच्याशी माझे वैयक्तिक वैरत्व किंवा नाराजी नाही. पण, म्हापशाच्या विकासाठी आपण सुधीर कांदोळकर यांंना पाठिंबा दिला आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
म्हापसावासीयांना बदल घडविण्याची संधी
माझ्यासाठी राष्ट्र व म्हापसा प्रथम आहे. म्हापशाच्या विकासासाठीच मी निषेध म्हणून आमदार जोशुआ डिसोझा यांच्या विरोधात जात आहे. गेल्या २५ वर्षांपासून म्हापशातील विकासाला चालना मिळालेली नाही. आमदार डिसोझा यांनी आपल्या अडीज-तीन वर्षांच्या कारकिर्दीत काहीच केले नाही. या निवडणुकीत म्हापशात बदल घडविण्याची संधी जनतेला आहे. म्हापसावासीयांनी डिसोझा यांच्याकडून हिशोब मागावा, असे आवाहन ब्रागांझा यांनी केले.

सुधीर कांदोळकर यांना पाठिंबा देण्याचा माझा निर्णय हा वैयक्तिक स्तरावरील आहे. नगरसेविका डॉ. केयल ब्रागांझा या माझ्या बहिणीला राजकारणात फक्त सहा महिनेच झाले आहेत. ती अद्याप नवखी आहे. कांदोळकर यांंना पाठिंबा द्यायचा की नाही, हा तिचा वैयक्तिक निर्णय असेल. आपण त्यात हस्तक्षेप करणार नाही. _रायन ब्रागांझा, माजी नगराध्यक्ष      

हेही वाचा