२४ तासांत ३ लाख नवे बाधित!

देशात कोविडचा वेगाने प्रसार; केंद्राने व्यक्त केली चिंता


20th January 2022, 11:40 pm
२४ तासांत ३ लाख नवे बाधित!नवी दिल्ली : देशात करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १९ लाख २४ हजार ०५१ इतकी झाली आहे. तर ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या एकूण ९ हजार २८७ इतकी झाली आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये ३.६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गेल्या २४ तासांत करोनाचे ३ लाखांवर नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने गुरुवारी सायंकाळी दिल्लीत पत्रकार परिषद घेत देशातील करोनाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, दिल्ली आणि उत्तर प्रदेश ही ‘चिंता वाढवणारी राज्ये’ आहेत. आम्ही या राज्यांमध्ये केंद्रीय आरोग्य पथके पाठवली आहेत आणि परिस्थितीचा सतत आढावा घेत आहोत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.

आशियाई देशांमध्ये ४ आठवड्यांत करोनाच्या रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. भारतातही करोनाच्या रुग्णसंख्येत मोठी उसळी दिसून येत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे १० राज्यांमध्ये त्यात महाराष्ट्र टॉपवर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, दिल्ली आणि राजस्थान ही राज्ये टॉप टेनमध्ये आहेत. कारण या राज्यांमध्ये करोनाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, असे राजेश भूषण म्हणाले.

प्रभावी लसीमुळे मृत्यू कमी

देशात देण्यात येत असलेल्या करोनावरील लसी प्रभावी आहेत. लसीकरणामुळे करोना मृत्युंचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. करोनाच्या या तिसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांची संख्या आणि मृत्युही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत, अशी माहिती आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी यावेळी दिली. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत ३० एप्रिल २०२१ मध्ये ३ लाख ८६ हजार ४५२ नवीन रुग्ण आढळून आले होते. तर ३,०५९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी करोनाचे ३१ लाख अॅक्टिव्ह रुग्ण होते, असे राजेश भूषण यांनी सांगितले.

मुलांच्या लसीकरणाचा प्रश्न अधांतरीच

शास्त्रीय पुरावे मिळाल्यानंतर लसीकरणाची व्याप्ती आणखी वाढवली जाईल. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर १५ वर्षांखालील मुलांचे लसीकरण करायचे की नाही? याचा निर्णय घेतला जाईल, असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट केले. यामुळे सध्या हा प्रश्न अधांतरीच आहे. तसेच मार्केटमध्ये दोन लसी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याबाबतची शिफारस सीडीएससीओ ने औषध नियंत्रकांकडे केली आहे. याबाबत अंतिम निर्णय हा नियंत्रक घेईल, असेही राजेश भूषण यांनी सांगितले.

केरळमध्ये वाढली भीती

तिरुवअनंतपुरम : केरळमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. राज्यात या व्हेरिएंटमुळे बाधित रुग्ण वाढत असून गेल्या २४ तासांत ऑक्सिजन बेड्स आणि आयसीयू बेड्सची मागणी अचानक वाढल्याने तो चिंतेचा विषय ठरला आहे. राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येचाही स्फोट झाला आहे. राज्यात गुरुवारी ४६ हजारांवर नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे तर ३२ रुग्ण दगावले आहेत. यामुळे केरळ सरकार सतर्क झाले आहे. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी नागरिकांना आपण ‘सुपर स्प्रेडर’ बनणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. पुढचे तीन आठवडे राज्यासाठी क्रिटिकल आहेत, असे म्हटले आहे.

लसीकरणाचा १६० कोटींचा टप्पा

देशात करोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरणाचे खूप मोठे योगदान आहे. अशात करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी देशात सुरू करण्यात आलेल्या लसीकरणाच्या मोहिमेत देशाने १६० कोटी डोसचा टप्पा पार केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून गुरुवारी दिली आहे.