नदाल ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत


19th January 2022, 11:24 pm
नदाल ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत

मेलबर्न : आपल्या २१व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या शोधात असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. नदालने बुधवारी वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या यानिक हाफमनचा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.       

दुसरीकडे, महिला एकेरी गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अॅशले बार्टीने आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवत एकतर्फी विजय नोंदवत स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. बार्टीला विजयासाठी जास्त प्रयत्न करावे लागले नाहीत. तिने प्रतिस्पर्ध्याला सहज हरवले      

जागतिक क्रमवारीत ५व्या क्रमांकावर असलेल्या नदालने १२६व्या क्रमांकावर असलेल्या जर्मन खेळाडूचा ६-२, ६-३, ६-४ असा पराभव केला. त्याने हा सामना दोन तास ४२ मिनिटांत जिंकला. पुढील दौऱ्यात नदालची गाठ स्लोव्हाकियाच्या अॅलेक्स मोल्कन आणि स्पेनच्या पाब्लो अंदुजार यांच्यातील विजेत्याशी होईल.       

बार्टीने रॉड लेव्हर एरिना येथे जागतिक क्रमवारीत १४२व्या क्रमांकावर असलेल्या लुसिया ब्रॉन्झेटीचा ६-१, ६-१ असा सहज पराभव केला. तिला सलग सहाव्या वर्षी या स्पर्धेची तिसरी फेरी गाठण्यात यश आले. बार्टीने गेल्या ४८ सामन्यांमध्ये आपली सर्व्हिस गमावलेली नाही.       

पहिल्या फेरीत फक्त एक गेम गमावलेल्या बार्टीचा पुढील सामना इटालियन ३०व्या मानांकित कॅमिला ज्योर्गीशी होईल. तिने चेक प्रजासत्ताकच्या तेरेजा मार्टिनकोव्हाचा ६-२, ७-६ असा पराभव केला. आठव्या मानांकित पॉला बडोसानेही इटालियन पात्रता खेळाडू मार्टिना ट्रेव्हिसनचा ६-०, ६-३ असा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

अझारेंका, स्वितोलिना यांनीही मारली बाजी

दोन वेळची ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन व्हिक्टोरिया अझारेंका हिने जिल टिचमनचा ६-१, ६-२ असा पराभव केला. अमेरिकेच्या मॅडिसन कीजने रोमानियाच्या जॅकलिन क्रिस्टीनचा ६-२, ७-६ असा पराभव केला. युक्रेनच्या १५व्या मानांकित एलिना स्विटोलिना हिनेही तिसर्या फेरीत प्रवेश केला. तिच्या प्रतिस्पर्धीने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. फ्रान्सच्या हार्मोनी टॅनने माघार घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा स्वितोलिना ६-३, ५-७, ५-१ अशी आघाडीवर होती. २१वी मानांकित अमेरिकेची जेसिका पेगुला आणि युक्रेनची मार्टा कोस्ट्युएक यांनीही आगेकूच करण्यात यश मिळवले.