स्वदेशी आणि हिंदू मेळा!

Story: विज्ञानाची सोनपावले | सिद्धी महाजन |
16th January 2022, 12:51 Hrs
स्वदेशी आणि हिंदू मेळा!

"लज्जय भारत यश गाईबो कि कोरो"

"जिच्यासमोर माझे मुख लज्जेने खाली गेले आहे, असा मी माझ्या मातृभूचे गुणगान कसे गाऊ?"

स्वातंत्र्य पूर्व काळातील प्रसिद्ध बंगाली कवी संगीतकार ज्ञानेंद्रनाथ ठाकूरांनी लिहिलेले हे गीत. जणू देशाचे उज्ज्वल भविष्य पाहण्यासाठी तळमळणाऱ्या त्या काळातील राष्ट्रीय नेत्यांचे स्वगतच. रविंद्रनाथांचे थोरले चुलतभाऊ आणि बंगालच्या सुप्रसिद्ध ठाकूर घराण्यातील ' मेजादादा' म्हणजेच आदरणीय मधला भाऊ अशी ओळख असणारे ज्ञानेंद्रनाथ हे एक राष्ट्रीय विचारांचे कलाकार होते. कलकत्ता विद्यापिठाची प्रवेश परीक्षा सर्वप्रथम उत्तीर्ण होणाऱ्या आणि कालिदासाच्या कित्येक नाटकांचे बंगालीत भाषांतर करणाऱ्या या अत्यंत प्रज्ञावंत व्यक्तीला आपल्या बुद्धिमत्तेचा स्वार्थासाठी उपयोग न करता देशासाठी काहीतरी भरीव योगदान द्यायचे होते. त्यातून उदयाला आली, 'हिंदू मेळा' ही संस्था.

हिंदू मेळा ही एक सामाजिक-सांस्कृतिक संस्था होती.याची स्थापना 1867 मध्ये ज्ञानेंद्रनाथ ठाकूर, द्विजेंद्रनाथ ठाकूर, राजनारायण बसू आणि नवगोपाल मित्र यांनी केली.  चैत्र संक्रांतीच्या दिवशी (बंगाली वर्षाचा शेवटचा दिवस) स्थापन झाल्यामुळे याला 'चैत्र मेळा' असेही म्हणत.  गणेद्रनाथ ठाकूर हे त्याचे संस्थापक सचिव होते.  हिंदू मेळ्याने बंगालच्या सुशिक्षित वर्गामध्ये जागृती निर्माण केली, आणि देशवासियांना देशासाठी विचार करण्यास प्रवृत्त केले.

ही संस्था कोणत्याही धार्मिक उद्देशाच्या पूर्ततेसाठी बनवले गेली नव्हती. या हिंदू मेळ्याने देशभक्ती आणि स्वदेशी उद्योगांना चालना देण्याचे काम करण्याचे काम केले.  भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे पुनरुज्जीवन करणे, देशवासीयांचे प्रबोधन करणे, राष्ट्रभाषा विकसित करणे, विविध नावीन्यपूर्ण कल्पनांचे उन्नयन करणे, ही त्यांची उद्दिष्टे होती.ब्रिटिशांच्या सांस्कृतिक अरेरावीचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय समाज सक्षम झाला पाहिजे, हा त्याचा उद्देश होता.

किती चैतन्याने भारलेली असे ही जत्रा! या जत्रेत देशभक्तीपर गीते, कविता आणि व्याख्याने सादर होत. या माध्यमातून भारताच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात येत असे.  देशी कला, देशी हस्तकला, ​​देशी व्यायाम आणि कुस्तीचे प्रदर्शन मांडले जाई. यामध्ये अखिल भारत सामील होत असे, आणि बनारस, जयपूर, लखनौ, पाटणा आणि काश्मीर इत्यादी ठिकाणच्या कलात्मक वस्तू, हस्तकला इत्यादी प्रदर्शित करण्यात येत असत. 

आता आपण येऊ कलकत्त्यात. सितानाथ घोष नावाचा एक सावळा, किडकिडीत मुलगा कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेता झाला.त्याला विज्ञान विषयात अतिशय रुची होती,पुढे काहीतरी नवीन करण्याची, नवा वैज्ञानिक शोध लावण्याची महत्वकांक्षा होती. पण काही आरोग्यविषयक कारणाने सितानाथ वैद्यकीय शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. त्यांनी खाजगीरित्या विद्युत भौतिकी आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले आणि 'हिंदू पत्रिका' या कलकत्त्याच्या नामवंत मासिकाच्या संपादक पदाची जबाबदारी स्वीकारली. सितानाथ घोष यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान सोपे करुन सांगण्याची हातोटी वादातीत होती.त्यांनी बरेच वैज्ञानिक शोधनिबंध प्रसिद्ध केले. पण १८७१ मध्ये भरलेल्या हिंदू मेळाव्यात मांडलेली पॉवरलूम आणि एयर पंप त्यांच्या प्रतिभेचा सर्वात मोठा आविष्कार होता.

१८७१ ला भरलेल्या पाचव्या हिंदू मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट होते यांत्रिक शोधांचे प्रदर्शन भरवणे. सितानाथ घोष यांनी या मेळ्यात आपले विणकामाचे यंत्र किंवा पॉवरलूम मांडले होते. या यंत्रात सूत तीन ठिकाणी गुंडाळले जात असे, मात्र त्यात काही त्रुटी होत्या.त्यांनी स्वतः बनवलेला हवेच्या दाबावर चालणारा पंपही त्यांनी या प्रदर्शनात मांडला होता अन् त्याचे प्रात्यक्षिक दाखवले होते. तंत्रज्ञानाचा हा अस्सल स्वदेशी आविष्कार पाहून अनेकजण प्रभावित झाले.

त्यांच्या या शोधांची वाहवा झाली, मात्र त्यांच्या विणकामाच्या यंत्राने त्यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली.अनेक श्रीमंत व्यक्तींनी, उदा बेटिया प्रांताच्या राणीने योग्य मोबदल्याच्या बदल्यात ते यंत्र विकत घेण्याची तयारी दाखवली. मात्र सितानाथ यांना आपल्या ज्ञानाचा सौदा करायचा नव्हता.त्यानंतर त्यांनी काही व्याख्याने दिली, त्यातील काही व्याख्याने विद्युत आणि चुंबकीय शक्ती या विषयांवर आधारित होती.त्यांच्या या व्याख्यानांनी प्रभावित होऊन देवेंद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या प्रसिद्ध अशा 'तत्वबोधिनी पत्रिके'चे संपादकपद सितानाथ घोष यांना देऊ केले.या मासिकातून त्यांनी विपुल लेखन केले आणि आपले शोधनिबंध प्रकाशित केले. अनेकांना विज्ञान तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन केले.त्यांनी लिखाणासाठी वापरल्या जाणाऱ्या तसेच छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईचाही शोध लावला होता.याचे हक्क त्यांनी आपला मित्र अमृतलाल रॉय यांना देऊ केले, ज्यांनी नंतर AL Roy's ink या उत्पादनामार्फत बाजारात प्रसिद्धी मिळवली.

सितानाथ यांनी विद्युत चुंबकीय क्षेत्राचा वापर करून बनवलेल्या हीलिंग मशिनवर काही संशोधन केले होते, त्यामध्ये त्यांनी अनेक रुग्णांवर चुंबकीय शक्तीचे प्रयोग केले. रॉय हे खऱ्या अर्थाने तंत्रज्ञ होते, कारण त्यांनी तंत्रज्ञान या शब्दाचा अर्थ जाणला होता. तंत्रज्ञान म्हणजे नेमके काय? तंत्रज्ञान म्हणजे विज्ञानाचा योग्यरितीने उपयोजित वापर करणे. त्याचा समाजाला उपयोग होईल या दृष्टीने प्रयत्न करणे. अनेक नवनवीन प्रयोग करणाऱ्या, विज्ञान प्रसाराचे महत्त्वाचे काम करणाऱ्या सितानाथ घोष यांनी आपले ज्ञान नुसते पुस्तकांपुरते न ठेवता प्रायोगिक तत्त्वावर वापरले, त्यामुळे त्यांचे योगदान कालातीत आहे.

बेलगाचिया येथे भरलेल्या आणि ज्ञानेंद्रनाथ टागोर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुसऱ्या वार्षिक मेळ्यामध्ये (१८६८), सत्येंद्रनाथ ठाकूर यांनी रचलेले देशभक्तीपर गीत - गाओ भारतेर जॉय गायले गेले.  बंकिमचंद्रांच्या लेखणीतून बंदे मातरम हे गीत स्रवेतोपर्यंत हे अजरामर गीत अक्षरशः राष्ट्रीय गीत बनले होते.  १८७५ च्या वार्षिक मेळाव्यात, रवींद्रनाथ टागोरांनी त्यांची स्वतःची कविता - 'हिंदू मेलर उपहार 'वाचली. १८८० आणि १८९० च्या दशकातील नवीन आणि जटिल समस्यांना तोंड देत हिंदू मेळा हळूहळू नष्ट झाला. परंतु स्वदेशीचा जो भाव त्याने बंगाली लोकांच्या मनात रुजवला होता तो अव्याहत टिकून राहिला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात पेटलेल्या स्वदेशी चळवळीची ही ठिणगी होती.