मूर्ती लहान कीर्ती महान श्रीजा फडते

श्रीजाने सर्वप्रथम रंगमंचावर एक बडबडगीत सादर केले. तिच्या पहिल्याच सादरीकरणाबद्दलचा व सभाधीटपणाचा एक प्रेरक किस्सा तिच्या पालकांनी सांगितला.

Story: मार्ग नवा, ध्यास नवा । सुश्मिता मोपकर |
16th January 2022, 12:47 Hrs
मूर्ती लहान कीर्ती महान श्रीजा फडते

डाॅ. के. ब. हेडगेवार विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकणारी कुंडई येथील श्रीजा गौरेश फडते. शिक्षणात हुशार असणाऱ्या श्रीजाने आजवर वर्गातील पहिला क्रमांक सोडला नाही. आपल्या  शैक्षणिक तसेच कलात्मक गुणांमुळे दरवर्षी 'स्टुडंट ऑफ द इयर'ची ट्राॅफी हुकू नाही दिली. चित्रकलेची व वाचनाची आवड असणारी श्रीजा देव-देवतांची चित्रे काढण्यात रमते. तसेच शालेय पुस्तकांव्यतिरिक्त तिने जवळजवळ २०० पुस्तके वाचली आहेत. प्रत्येक विषयात तिला रुची आहे पण त्यातल्या त्यात भाषा, गणित आणि भुगोल हे विषय तिच्या जास्त आवडीचे आहेत. तिला बुद्धीबळ खेळायलाही आवडते.

अभिनयाची तिला विशेष आवड. वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अखिल गोवा पातळीवरील वेशभूषा स्पर्धेत ती सहभागी व्हायची व बक्षिसेही मिळवायची. जसजशी ती मोठी होत गेली तसतशी ती सानेगुरुजी कथाकथन स्पर्धा, शणै गोंयबाब कथामाळ सर्त, भगवद्गीता पाठांतर स्पर्धा, मनाचे श्लोक अशा विविध स्पर्धांमध्ये जाऊन तालुका तसेच राज्य पातळीवरदेखील तिने बक्षिसे मिळविली आहेत. 

गायनाचीही आवड असल्याने गायनाचे सुरुवातीचे शिक्षण अभिनव कलामंदिर, फोंडा ह्या संस्थेतील श्री नितीन ढवळीकर यांच्याकडे झाले. तसेच पहिलीच्या वर्गात असल्यापासून तिने गोव्याच्या नामवंत शास्त्रीय गायिका मुग्धा गावकर यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे घेण्यास प्रारंभ केला. गायनाबरोबरच नाटकात भूमिकाही तिने केल्या आहेत. परंपरेने चालत आलेल्या संगीत नाटकांचा या चिमुकलीने मनापासून आस्वाद नि प्रत्यक्ष अनुभव घेतला. आतापर्यंत तिने सं. राम जन्मला गं सखे, सं. सत्याग्रही, सं. कान्होपात्रा, सं. कट्यार काळजात घुसली, सं. हे बंध रेशमाचे, सं. सुवर्णतुला, सं. जय जय गौरीशंकर अशा नाटकांत आपली भूमिका चोख नि यशस्वीपणे बजावली. 'सं. सत्याग्रही' या नाटकात तिने ध्रुवाची भूमिका साकारली, 'सं. कान्होपात्रा' या नाटकात कान्होपात्राची, 'सं. कट्यार काळजात घुसली' मध्ये छोटा सदाशिव , 'सं. हे बंध रेशमाचे'त रोशन, 'सं. जय जय गौरीशंकर'मध्ये श्रृंगीची भूमिका केली आहे. कै. किशोरीताई हळदणकर स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या महिला संगीत नाट्यस्पर्धेत 'संगीत सुवर्णतुला' या नाटकात नारदाची भूमिका तिने उत्तमरित्या वठवली. या भूमिकेस (पुरुष विभागात) उत्कृष्ट गायक म्हणून तिला पारितोषिक घोषित करण्यात आले आहे. तसेच स्टार प्रवाह वरील "मी होणार सुपरस्टार" 'छोटे- उस्ताद' मध्ये ती सिलेक्ट झाली होती. ऑडिशनच्या निमित्ताने आपली कला मुंबईला जाऊन तिला सादर करता आली.

श्रीजाने सर्वप्रथम रंगमंचावर एक बडबडगीत सादर केले. तिच्या पहिल्याच सादरीकरणाबद्दलचा व सभाधीटपणाचा एक प्रेरक किस्सा तिच्या पालकांनी सांगितला. ते म्हणाले, श्रीजा जवळजवळ अडीज वर्षांची असताना ते तिला गावातील एका सांस्कृतिक कार्यक्रमास घेऊन गेले होते. कार्यक्रमास बरीच गर्दी होती. श्रीजाची आई तिचा हात धरुन कार्यक्रम बघत उभी असता श्रीजाने तिचा हात सोडला नि थेट धावत रंगमंचावर जाऊन थबकली. कधीही स्टेज न बघितलेल्या श्रीजाने माईकही कधी हातात धरला नव्हता. असे असूनही ती तिथे एक बडबडगीत सादर करुन खाली आली. अशावेळी सगळे प्रेक्षक तर थक्कच झाले असणार आणि आयोजकांनीही तिच्या धाडसास दाद दिली. 'श्रीजाचं हे बडबडगीत स्पर्धेचं नसून ते उत्स्फुर्तपणे गायिलेले बडबडगीत होतं' असे त्यांनी जाहीर केल्याचे तिची आई अभिमानाने सांगते. तिचा हाच उत्साह तिच्या आई-वडिलांनी हेरला आणि तिला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित केले. त्या क्षणापासून आजपर्यंत त्यांनी तिच्यातील कलागुणांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम चोख बजावले आहे आणि सोबत तिला नेहमी भरभरून प्रोत्साहन दिले. 

अशी ही चिमुकली आपणा सर्वांसाठी एक प्रेरणा ठरली आहे. ती म्हणते, " आपण नेहमी सत्याची बाजू धरुन जीवनात पुढे गेलो पाहिजे. तसेच, जिद्द आणि चिकाटी जर असेल तर माणूस कोणत्याच क्षेत्रात मागे उरत नाही."