२६ मतदारसंघांत एकच दावेदार!

आठ ठिकाणी एकापेक्षा जास्त इच्छुक; भाजपची पहिली यादी उद्या येणार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
15th January 2022, 12:13 Hrs
२६ मतदारसंघांत एकच दावेदार!

पणजी : ४० पैकी २६ मतदारसंघांत भाजपचा एकच दावेदार आहे. सात मतदारसंघांत दोन, एका मतदारसंघात तीन दावेदार आहेत. मडकईतील उमेदवाराची निवड अजून झालेली नाही. तर, दक्षिणेतील पाच मतदारसंघांत अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ३६ मतदारसंघांतील उमेदवारांची नावे निश्चित केली असून, त्यांची यादी दिल्लीतील संसदीय समितीकडे पाठवून देण्यात आली आहे. येत्या सोमवारपर्यंत अंतिम उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते, असे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले आहेत. निवडणूक समन्वय समितीने दिल्लीला पाठवलेल्या यादीत २६ मतदारसंघांत एकच दावेदार असल्यामुळे २६ नावांची पहिली यादी सोमवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
मांद्रे, डिचोली, पणजी, कुंभारजुवे, सावर्डे, सांगे आणि काणकोण या सात मतदारसंघांत दोन दावेदार, तर सांताक्रूझमध्ये तीन दावेदार आहेत. या आठपैकी मांद्रे, पणजी, सांताक्रूझ, काणकोण या चार मतदारसंघांतील आमदार काँग्रेसमधून आलेले, तर सावर्डेतील आमदार मगो पक्षातून आलेला आहे. या मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारीवर याआधी निवडून आलेले निष्ठावंतही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे यातील कोणाला उमेदवारी द्यावी, याबाबत भाजप नेत्यांमध्ये संभ्रम असल्याने त्यांनी सर्वच इच्छुकांची नावे संसदीय समितीकडे पाठवली आहेत. संसदीय समिती सर्व नावांचा विचार करून अंतिम उमेदवार घोषित करणार आहे.
मडकईतून भाजपने दोन नावे पाठवली आहेत. त्यात महिला आयोगाच्या अध्यक्ष विद्या गावडे सतरकर यांचे नाव असल्याचे समजते. परंतु, येथील उमेदवारीवर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. याशिवाय नुवे, कुडतरी, बाणावली, नावेली आणि वेळ्ळी या दक्षिण गोव्यातील पाच मतदारसंघांत अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा, वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्स तसेच कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले होते. परंतु, २०१९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर इतर सात आमदारांसमवेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या तिघांपैकी क्लाफासियो डायस भाजपच्या उमेदवारीवर लढण्यास तयार आहेत. पण, विल्फ्रेड डिसा व फिलीप नेरी यांना भाजप उमेदवारीवर जिंकून येण्याची खात्री नसल्याने त्यांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला असून, भाजपने त्यांना पाठिंबा देण्याची हमी दिल्याची माहिती भाजपमधील ज्येष्ठ नेत्याकडून मिळाली आहे.

एकच दावेदार

- पेडणे : प्रवीण आर्लेकर
- थिवी : नीळकंठ हळर्णकर
- ताळगाव : जेनिफर मोन्सेरात
- म्हापसा : जोशुआ डिसोझा
- शिवोली : दयानंद मांद्रेकर
- साळगाव : जयेश साळगावकर
- कळंगुट : गुरुदास शिरोडकर
- पर्वरी : रोहन खंवटे
- हळदोणा : ग्लेन टिकलो
- सांतआंद्रे : फ्रान्सिस सिल्वेरा
- फातोर्डा : दामू नाईक
- मये : प्रेमेंद्र शेट
- साखळी : डॉ. प्रमोद सावंत
- पर्ये : विश्वजीत राणे
- वाळपई : दिव्या राणे
- प्रियोळ : गोविंद गावडे
- फोंडा : रवी नाईक
- शिरोडा : सुभाष शिरोडकर
- मुरगाव : मिलिंद नाईक
- वास्को : दाजी साळकर
- दाबोळी : मॉविन गुदिन्हो
- कुठ्ठाळी : आंतोनियो वाझ
- कुंकळ्ळी : क्लाफासियो डायस
- मडगाव : मनोहर आजगावकर
- केपे : चंद्रकांत कवळेकर
- कुडचडे : नीलेश काब्राल

एकापेक्षा जास्त दावेदार

- मांद्रे : दयानंद सोपटे/लक्ष्मीकांत पार्सेकर
- डिचोली : राजेश पाटणेकर/शिल्पा नाईक
- पणजी : बाबूश मोन्सेरात/उत्पल पर्रीकर
- कुंभारजुवे : पांडुरंग मडकईकर/सिद्धेश नाईक
- सांताक्रूझ : टोनी फर्नांडिस/अनिल होबळे/आग्नेल डिकुन्हा
- सावर्डे : दीपक प्रभु पाऊस्कर/गणेश गावकर
- सांगे : सुभाष फळदेसाई/सावित्री कवळेकर
- काणकोण : इजिदोर फर्नांडिस/रमेश तवडकर
- मडकई : अजून उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. येथून महिला आयोगाच्या अध्यक्ष विद्या गावडे सतरकर यांचे नावही चर्चेत आहे.

येथे देणार अपक्ष उमेदवारांना पाठिंबा
नुवे
कुडतरी
बाणावली
नावेली
वेळ्ळी