गोमंतकीय मराठी कादंबरीतील राजकीय संदर्भ

‘मांडवी! तू आटलीस’ या कादंबरीत वास्तवाच्या आधारावर उभी केलेली काल्पनिक प्रतिसृष्टी असली तरी तत्कालीन अनेक राजकीय संदर्भ या कादंबरीत जागोजागी विखुरले आहेत.

Story: लोकमुद्रा।डॉ. विद्या प्रभुदेसाई |
09th January 2022, 12:32 Hrs
गोमंतकीय मराठी  कादंबरीतील राजकीय संदर्भ

इ.स. १८८६ मधील सूर्याजी सदाशिव महात्म्ये यांच्या ‘वेषधारी पंजाबी’ या पहिल्या कादंबरीनंतर इतर साहित्य प्रकारांबरोबरच गोमंतकात कादंबरी या प्रकारानेही चांगलेच मूळ धरले. आरंभी क्षीण स्वरुपात आपली वाट शोधणारी गोमंतकातील कादंबरी मुक्तिनंतरच्या काळात तर चांगलीच बहरली. मुक्तिपूर्व काळात एकूण सुमारे पाचशे ते सहाशे कादंब-या प्रसिद्ध झाल्या. यातील बहुतेक सर्वच कादंब-या मुंबईत राहणा-या गोमंतकीयांकडून लिहिल्या गेल्या. या काळात प्रामुख्याने सा.घ. कंटक, वासुदेव खांडेपारकर, नीळकंठ वागळे, शंकर वैद्य, मो.ग. रांगणेकर, बाळकृष्ण वैद्य, ना. के. शिरोडकर, र. वि. सरमळकर, चंद्रकांत काकोडकर, गुरुनाथ नाईक, व्यंकटेश अनंत पै रायकर, लक्ष्मणराव सरदेसाई, बा. भ. बोरकर, बा. द. सातोस्कर अशा लेखकांप्रमाणेच कुमुदिनी प्रभावळकर, प्रेमा कंटक, नलिनी मुळगावकर या आणि अशा काही लेखिकांचाही अंतर्भाव आहे. कित्येक लेखक बहुधा त्या काळात  गरज म्हणून गोमंतकाबाहेर राहत असले तरी त्यांच्या बहुतेक कादंब-यामध्ये प्रामुख्याने तत्कालीन गोमंतकातील सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय संदर्भ आले आहेत. प्रामुख्याने मुक्तिपूर्व गोवा आणि मुक्तिनंतरचा गोवा अनेक कादंब-यांमध्ये प्रभावीपणे आला आहे. गोवामुक्तिलढा, या लढ्याचे स्वरुप, या लढ्याचा जनसामान्यावर होणारा परिणाम, त्यामुळे गोमंतकाचे बदललेले आर्थिक आणि सांस्कृतिक जीवन या आणि अशा प्रकारच्या तत्कालीन गोमंतकातील  सामाजिक तसेच राजकीय घडामोडींचे आणि संघर्षाचे वास्तव चित्रण या काळातील बहुतेक कादंब-यांमध्ये आले आहे.

या काळात प्रकाशित झालेल्या अनेक कादंब-यांमध्ये गोवा मुक्तिलढा आणि त्यातील अंत:प्रवाहाचे नेमके दर्शन घडते. गोमंतकाच्या राजकीय इतिहासात १८ जून इ.स. १९४६ या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. डॉ. राममनोहर लोहिया यांनी या दिवशी सभाबंदीचा कायदा मोडून केलेल्या सत्याग्रहाने गोमंतकाच्या मुक्तिसंग्रामाला एक वेगळे वळण दिले हे ऐतिहासिक सत्य आहे. साहजिकच या काळातील कित्येक कादंब-यांमध्ये या ऐतिहासिक सत्याचा संदर्भ आला आहे.

लक्ष्मणराव सरदेसाई यांची इ.स. १९४७ मध्ये प्रकाशित झालेली    ‘मांडवी! तू आटलीस’ ही एकमेव स्वतंत्र कादंबरी आहे. एकोणतीस प्रकरणी या कादंबरीत अशोक या क्रांतिकारी नायकाचा आंतर्बाह्य संघर्ष चित्रित झाला आहे. कादंबरीच्या कथानकात नाजूक प्रेमकहाणी गुंफत असतानाच लेखकाने या प्रेमकहाणीसाठी राजकीय वातावरणाची पार्श्वभूमी दिली आहे. सामाजिकदृष्ट्या ख्रिश्चन असूनही   मानसिकदृष्ट्या हिंदू  असलेली अशी लीना ही या कादंबरीची नायिका आहे. त्या काळात गोमंतकात पोर्तुगीज धार्जिणा असा एक समाजगट अस्तित्वात होता. योगायोगाने अशा पोर्तुगीज धार्जिण्या समाजगटाचा प्रतिनिधी असलेल्या श्रीमंत वडिलांची लीना ही मुलगी आहे तर कादंबरीचा नायक अशोक हा ध्येयवादाने प्रेरित झालेला राष्ट्रवादी विचारांचा कृतिशील तरुण आहे. दुस-या महायुद्धानंतर गोमंतकात जो अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता त्याविषयीचे अनेक उल्लेख या कादंबरीत आले आहेत. कथानकाच्या एका प्रसंगात कादंबरीची नायिका लीना हिला भुकेने व्याकुळ झालेली बाई भेटते. तिच्या मांडीवर असलेले तिचे लहान मूल याच अन्नदुर्भिक्ष्याचा बळी ठरले होते. लिनाने दिलेले पैसे ती नाकारते आणि पैसे दिले तरी अन्न मिळत नाही हे कठोर वास्तव ती बोलून दाखवते. या कादंबरीत दीड महिना तांदळाची साधी पेजही न मिळालेली ही बाई, हे गोमंतकातील तत्कालीन वास्तव आहे.  गोमंतकात ही अशी अन्नान्न परिस्थिती होण्यास गोमंतकावर राज्य करणारी पोर्तुगीज सत्ता कारण होती असाही संदर्भ या कादंबरीत आला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे तांदळाची टंचाई होणार हे माहीत असूनही सरकारने त्यासाठी कोणतीही आगाऊ तरतूद करुन ठेवली नाही. इतकेच नव्हे तर काही बडे व्यापारी मोठ्या प्रमाणात तांदळाचा पुरवठा करायला तयार असताना पोर्तुगीज सरकारने यासाठी हेतुपुरस्सर त्यांना परवाने दिले नाहीत. त्यामुळेच ब्रिटिश सरकारने जेव्हा तांदळाच्या निर्यातीवर बंदी आणली तेव्हा अन्नाविना गोमंतकातील जनतेचा उदरनिर्वाह होणे मुश्किल झाले. ज्यांची  भातशेती  होती अशा जमीनदारांना या संकटाची झळ लागली नाही. परंतु बहुजन समाज मात्र अन्नाविना तळमळत होता. तरीही पोर्तुगीज सरकार या विषयात पूर्णपणे उदासीन होते. असेही काही तत्कालीन संदर्भ या कादंबरीत आले आहेत.

सक्तीचे धर्मांतर आणि धर्मसमीक्षण सभा या दोन गोष्टींनी गोमंतकीय समाज आणि सांस्कृतिक जीवनाकडून बरीच वसूली केल्याची नोंद गोमंतकाच्या राजकीय इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास लक्षात येते. आमिषे दाखवून, स्वखुशीने वा बळजबरीने कोणत्याही प्रकाराने एखादा भाटकार ख्रिस्ती झाला म्हणजे त्याच्या भाटात राहणारे वा त्याच्याकडे काम करणारी गावडा कुळे आपोआप ख्रिस्ती म्हणून गणली जात असत. अर्थात त्याना  धर्मांतरित व्हावे लागतच असे अन्यथा त्यांना निराधार होऊन पोर्तुगीज सरकारच्या प्रत्यक्ष जुलूम अत्याचाराचे बळी होणे प्राप्त असे.  अशा  परस्पर ख्रिस्ती झालेल्या ज्या गावड्यांना पुन्हा हिंदू व्हायचे असेल त्यांच्यासाठी शुद्धीकरणाची प्रक्रियाही त्याकाळात गोव्यात झाली होती. या प्रक्रियेची प्रतिक्रिया म्हणून पोर्तुगीज सरकारच्या आदेशानुसार भाटकार अशा शुद्धीकरण केलेल्या गावड्यांना आपल्या भाटातून हाकलून देत असत त्यामुळेच त्यातून आणखी एक वेगळाच सामाजिक प्रश्न त्याकाळात गोमंतकात  निर्माण  झाल्याचे इतिहास सांगतो. या कादंबरीत हे सर्व संदर्भ घेऊन कथानक उभे केले आहे. कथानकातील अशा शुद्धीकरण केलेल्या गावड्यांना जेव्हा या कादंबरीतील परैरा हा भाटकार घालवून देतो तेव्हा कादंबरीचा नायक अशोक आणि नायिका लीना यांच्या प्रयत्नामुळे हरिबाब हा गोमंतकीय हिंदू जमीनदार त्या गावड्यांना आपल्या भाटात राहण्यासाठी जागा

देतो. हा ऐतिहासिक संदर्भही या कादंबरीत आला आहे.

एकुणच कादंबरीत वास्तवाच्या आधारावर उभी केलेली काल्पनिक प्रतिसृष्टी असते या वैशिष्ट्याला अधोरेखित करणारे अनेक राजकीय संदर्भ गोमंतकीय कादंबरीत जागोजागी विखुरले आहेत. पोर्तुगीजकालिन राजकीय संदर्भ लक्ष्मणराव सरदेसाई वा तत्कालीन अनेक कादंबरीकारांच्या कादंब-यांमध्ये आले आहेत. हे संदर्भ म्हणजे सामाजिक आणि राजकीय दस्तऐवज आहेत असे एका मर्यादेपर्यंत म्हणता येते.