अमेरिका-रशिया यांच्यात स्पर्धा; यूक्रेनवर युद्धाची छाया

Story: विश्वरंग | संतोष गरुड |
08th December 2021, 12:01 am
अमेरिका-रशिया यांच्यात स्पर्धा; यूक्रेनवर युद्धाची छाया

महासत्ता होण्याच्या असुरी महत्त्वाकांक्षेपोटी पाश्चात्य देशांनी विसाव्या शतकात दोन महायुद्धे लादून भीषण नरसंहार केला. अलिकडे वैश्विक राजकारणातील घटना पाहिल्यास या देशांनी पुन्हा महासत्तेसाठी स्पर्धा सुरू करून तिसऱ्या अतिभीषण महायुद्धाचा शंखनाद केला आहे की काय, अशी शंकेची पाल आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या मनात चुकचुकू लागली आहे.      

‘महासत्ता’ पद हातातून निसटू नये, यासाठी सध्या अमेरिकेची धडपड सुरू आहे. तर अमेरिकेला शह देण्यासाठी चीन आणि रशिया यांची चंग बांधला आहे. चीनने त्यादृष्टीने पावले टाकण्यास आरंभही केला आहे. याच कारणाने तैवानच्या मुद्यावरून अमेरिका-चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. आता यूक्रेनच्या मुद्यावरून अमेरिका आणि रशिया आमनेसामने आले आहेत. जगाच्या बहुतांश भागात कडाक्याची थंडी जाणवत असताना यूक्रेनमधील वातावरण चांगलेच तापले आहे.       

गेल्या आठवड्यात रशियाने जवळजवळ ९० हजार सैनिक पूर्व यूक्रेनच्या सीमेवर तैनात केल्याने अमेरिका आणि यूरोपियन देशांवर चिंतेचे ढग जमा झाले आहेत. इतकेच नव्हे तर, यूक्रेनच्या केसाला धक्का लागल्यास रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे. यावरून विषयी किती गंभीर आहे, याचा अंदाज येईल. आता यूक्रेनवर अमेरिकेचे इतके प्रेम उफाळून का आले आहे, असा प्रश्न निर्माण होतो. तर हा प्रेमाचा विषय नसून प्रतिष्ठेचा विषय आहे. याचे मूळ दुसरे महायुद्ध संपाल्यानंतर १९४५ ते सोव्हियत रशियाचे विघटन होईपर्यंत म्हणजे १९९१ पर्यंत अमेरिका आणि रशिया यांच्यात झालेले शीतयुद्ध यात आहे.       

दुसऱ्या महायुद्धात अमेरिका आणि रशिया ही दोन्ही मित्र राष्ट्रे होती. यांनीच युद्ध जिंकले होते. पण अमेरिकेला रशियाच्या साम्यवादाचा आधीपासूनच प्रचंड तिटकारा होता. त्यात अमेरिकेने जपानवर जेव्हा परमाणू बॉम्बचा वापर केला, तेव्हा रशियाही हादरला. कारण इतके संहारक अस्त्र बनवताना मित्राने म्हणून जराही विश्वासात घेतले नाही, ही बाब रशियाच्या वर्मी लागली. इथूनच त्यांच्यात कट्टर शत्रूता निर्माण झाली. अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी रशियाने पावले टाकायला सुरुवात केली. तेव्हाच अमेरिकेनेही सोव्हियत रशियाला नष्ट करण्यासाठी कारवाया सुरू केल्या. अर्थात या कारवाया प्रत्यक्ष युद्धभूमीवर नव्हत्या तर सोव्हियत रशियातील प्रदेशांमध्ये होत्या. या प्रदेशांना स्वातंत्र्याची स्वप्ने दाखवून अमेरिकेने नियोजनबद्धरित्या सोव्हियतमध्ये अराजकता निर्माण केली. शेवटी १९९१ मध्ये रशियाचे १५ तुकडे झाले. यातील एक तुकडा म्हणजे यूक्रेन.       

एका बलाढ्य राष्ट्राचे अशाप्रकारे विघटन झाल्याने अमेरिकेने न लढताच युद्ध जिंकले. हाच राग रशियाचा मनात आजही खदखदत आहे. १९९१ पासून खदखदणारा हा राग २०१४ पासून रशियात उफाळून येत आहे. २०१४ साली रशियाने सैनिकी कारवाई करत यूक्रेनचा क्रिमिया भाग पुन्हा काबिज केला. या प्रकारामुळे रशियाला ‘जी-८’ संघटनेतून बाहेर काढण्यात आले आहे. पण या घटनेमुळे यूक्रेन घाबरला आहे. यूक्रेनची ही दशा पाहून अमेरिकेने त्यांना नाटोमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला आहे. याच कारणाने संतापलेल्या रशियाने पुन्हा यूक्रेनच्या सीमेवर लष्कर उभे केले आहे. 

अमेरिकेने हा प्रस्ताव मागे घ्यावा, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. काहीही असो, या दोन बलाढ्य देशांच्या प्रतिष्ठेपायी यूक्रेनचे अस्तित्व मात्र धोक्यात आले आहे, असे म्हणणे गैर ठरणार नाही.