साखळीचा किल्ला ठरणार आकर्षण : डॉ. सावंत

३ कोटी खर्चून होणार नूतनीकरण : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी


07th December 2021, 11:55 pm
साखळीचा किल्ला ठरणार आकर्षण : डॉ. सावंत

साखळी येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या नूतनीकरण कामाचा प्रारंभ करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वरद सबनीस व इतर.            

प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली :
साडेचारशे वर्षांचा संपन्न ऐतिहासिक वारसा लाभलेला साखळीचा किल्ला हा साखळी शहराच्या वैभवाचा केंद्रबिंदू ठरणार असून पर्यटनाच्या दृष्टीने तसेच ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांच्यासाठी हा किल्ला अभ्यासाचे केंद्र बनले, अशा प्रकारच्या विविध संकल्पना घेऊन त्याची उभारणी होणार आहे. याबरोबरच साखळीतील जैन मंदिर व इतर पुरातन वास्तूंचे नूतनीकरण करून साखळी आदर्श शहर होणार असून साखळीसाठी हा ऐतिहासिक किल्ला भूषण ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
साखळी बाजार परिसरात असलेल्या ऐतिहासिक जुन्या किल्ल्याचे सुमारे पावणेतीन कोटी रुपये खर्चून पुरातत्व व पुराभिलेख खात्यातर्फे नूतनीकरण होणार असून त्याची पायाभरणी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी खात्याचे अधिकारी तसेच वरद सबनीस, शुभदा सावईकर, गोपाळ सुर्लकर, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, रश्मी देसाई, यशवंत माडकर आदी उपस्थित होते.
साखळी बाजारातील दुकाने, गाडे इतर ठिकाणी हलवून किल्ल्याच्या कामाला चालना देण्यास सहकार्य केल्याने आता या ऐतिहासिक किल्ल्याचे नूतनीकरण होणार असून या ठिकाणी आर्ट गॅलरी, किल्ल्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती देणारे संग्रहालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय आदी अनेक व्यवस्था या ठिकाणी केल्या जाणार आहेत. हे काम दीड वर्षात पूर्ण केले जाणार आहे. साखळी राज्यातील आदर्श शहर होत असून बहुतेक सर्व योजना या ठिकाणी झालेल्या आहेत. काही पूर्णत्वाकडॆ आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
वरद सबनीस यांनी किल्ल्याच्या उभारणीबाबत ऐतिहासिक माहिती दिली. डॉ. सावंत यांच्या हस्ते पायाभरणी व कामाचा शुभारंभ करण्यात आला.