चावडी-काणकोण येथे मतदान यंत्रणेत बिघाड

मतदारांच्या तक्रारीनंतर मतयंत्राची तपासणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th May, 01:06 am
चावडी-काणकोण येथे मतदान यंत्रणेत बिघाड

काणकोण : येथील नगरपालिका क्षेत्रातील पाळोळे मतदान केंद्रात तिन्ही बूथवरील मतदान प्रक्रिया होत असल्याने येथे मोठी गर्दी होती. इतर ठिकाणी किरकोळ गर्दी दिसत होती. चावडी बूथ ७ या मॉडल बूथवर मतदान यंत्रणेत बिघाड झाल्याचा संशय एका मतदाराने व्यक्त केल्यानंतर काही वेळ मतदान बंद ठेवण्यात आले. मात्र, मतदान यंत्राची तपासणी केल्यानंतर पुन्हा मतदानाला सुरुवात करण्यात आली.

विकलांग व ज्येष्ठ नागरिकांनीही मतदान केंद्रात येऊन मतदान केल्याचे पाहायला मिळाले. खोतीगाव पंचायतीमधील आवळी या स्थलांतरित केलेल्या व ३९८ मतदार असलेल्या बूथवर ११ वा. अधिकतम २९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी आमोणे बूथवर मतदान केले. त्यांनी सर्व ५९ ही बूथवर जाऊन पाहणी केली. मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांसह इंडी आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही निवडणूक गंभीरतेने घेतलेली पाहायला मिळाली.

काणकोण पालिकेचे नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, शांबा देसाई, नगरसेवक धीरज नाईक गावकर, गास्पार कुतिन्हो यांनी अधिक मतदान होण्याच्यादृष्टीने आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना व मतदारांना प्रोत्साहित केले.

मंगळवारी सकाळी ५९ ही बूथच्या खुल्या जागेत निर्वाचन आयोगातर्फे प्रत्येकी पाच रोपटी लावण्यात आली. तर चाररस्ता येथील माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर पर्रीकर बगल मार्गाच्या खुल्या जागेत व नगर्से पुलाजवळील खुल्या जागेत सुमारे दीडशे फुलझाडे लावण्यात आली. यावेळी काणकोणचे निर्वाचन अधिकारी मधु नार्वेकर, विनायक वळवईकर, नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, नगरसेवक हेमंत नाईक गावकर, पत्रकार बबेश बोरकर, संजय कोमरपंत, शिक्षक यांनी फुलझाडे लावली. फुलझाडांच्या देखभालीसाठी काणकोण नगरपालिका तसेच चाररस्ता येथील मल्लिकार्जुन विद्यालयाचे सहकार्य घेण्यात येईल, असे विनायक वळवईकर व मधु नार्वेकर यांनी सांगितले.