केपेत आमदार-नगरसेवकात बाचाबाची

महिलेच्या नावावर दुसऱ्यानेच मतदान केल्याचा प्रकार उघड

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th May, 01:04 am
केपेत आमदार-नगरसेवकात बाचाबाची

केपे : केपे मतदारसंघातील काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्टा व भाजपचे नगरसेवक दयेश नाईक यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. बूथ दहावर एक महिला मतदान करण्यास गेली असता तिच्यापूर्वीच तिचे मतदान कोणी दुसराच व्यक्ती करून गेल्याने काही काळ या बूथवर गोंधळ माजला. नंतर काही वेळाने टेन्डर वोट पेपरवर मतदान करण्यात आले. यासंबंधी केपे तालुक्याचे ईआरओ यांना विचारले असता त्यांनी चुप्पी साधली. केपे मतदारसंघात ७८.५१ टक्के मतदान झाले.

केपे मतदारसंघात सकाळपासून प्रत्येक बूथवर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते काम करताना पहायला मिळाले. आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी फातर्पा पंचायतीत बूथ नं. २६ वर मतदान हक्क बजावला. माजी उपमुख्यमंत्री चद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी बेतूल पंचायतीत बूथ ३१ वर मतदानाचा हक्क बजावला.

केपे मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाला आघाडी देण्यासाठी आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी बरीच मेहनत घेतली. दुसऱ्या बाजूने माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर हे ठिकठिकाणी फिरताना दिसले. पंचायत क्षेत्राबरोबर पालिका क्षेत्रातही ते व त्यांची पत्नी सावित्री कवळेकर काम करत भाजपला आघाडी देण्याचा प्रयत्न करताना दिसल्या.

दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान कॉंग्रेस उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस आले होते. यावेळी मतदान केंद्राबाहेर एल्टन डिकॉस्टा व नगरसेवक दयेश नाईक यांच्यात क्षुल्लक कारणावरून शाब्दीक बाचाबाची झाली.

पालिका क्षेत्रातील एका बूथमधे एक महिला मतदान करण्यात आली असता त्या महिलेच्या नावावर पूर्वी कोणीतरी मतदान करून गेल्याने गोंधळ माजला. त्यानंतर काही वेळाने त्या महिलेचे टेन्डर वोट करून घेतले. मात्र, यासंबंधी ईआरओ यांना विचारले असता ते काही बोलले नाही. याच बूथवर रात्री ७.४५ वा. पर्यंत सर्वजण उपस्थित होते.

पालिका क्षेत्रातील २०० मी. अंतर्गत काही दुकाने सकाळी सुरू होती. नंतर ती बंद करण्यात आली.