डिचोली तालुक्यात मतदानाचा उत्साह

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आमदार चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट यांनी बजावला मतदानाचा हक्क

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th May, 01:08 am
डिचोली तालुक्यात मतदानाचा उत्साह

डिचोली : तालुक्यात मये, डिचोली आणि साखळी या तिन्ही मतदारसंघात सकाळपासून उत्साही वातावरणात मतदान झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आमदार चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट यांनी मतदानाचा हक्क बजावला.

कोठांबी पाळी येथील बूथ क्र. ४७ येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सुलक्षणा सावंत यांच्यासह त्यांचे वडील पांडुरंग सावंत आदींनी मतदान केले. निवडणूक आयोगाने विविध ठिकाणी पर्यावरणपूरक व नावीन्यपूर्ण अशी मतदान केंद्रे उभारल्याने चांगल्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया या भागात संपन्न झाल्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.


मंगळवारी सकाळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मेणकुरे येथे मतदान केले. कुंभारवाडा येथील बूथवर मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मतदान केले.


कारापूर येथील मतदान केंद्रावर माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे तसेच विद्यमान आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी मतदान केले.

सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. काही ठिकाणी मतदान यंत्र व इतर बाबतीत थोडासा विलंब सोडला तर एकूण प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पाडली. सकाळच्या सत्रात काही बूथवर बरीच गर्दी दिसून आली.

नवमतदारांनी उस्फूर्तपणे मतदान केले. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य जनतेने मतदान प्रक्रियेत आपली भूमिका बजावली. मतदान केंद्रावर विकलांग, ज्येष्ठ व इतर मतदारांसाठी सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. उपनिर्वाचन अधिकारी रमेश गावकर, विमो दलाल तसेच सचिन देसाई या अधिकारी तसेच वाहतूक पोलीस व इतर अधिकाऱ्यांनी आपापल्या परीने उत्तम व्यवस्था केली होती. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात संपन्न झाली.

विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी तसेच स्वयंपूर्ण गोवा, आत्मनिर्भर गोवा अंतर्गत आगामी पाच वर्षांत नव्या उमेदीने पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा डबल इंजिन विकासासाठी सज्ज होणार आहे. राज्यातील दोन्ही जागांवर भाजप उमेदवारांचा विजय निश्चित असल्याची खात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.