बार्देशमध्ये काही ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड

शांततेत मतदान : भाजप नेत्यांनी लावली ताकद पणाला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th May, 12:56 am
बार्देशमध्ये काही ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड

म्हापसा : बार्देश तालुक्यात मंगळवारी शांततेच मतदान पार पडले. विधानसभेप्रमाणे लोकसभा निवडणुकीत मतदारांमध्ये उत्साह नसला तरीही मतदानाची टक्केवारी समाधानकारक आहे. तालुक्यात दिवसभर स्थिर मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदानात खंड पडला. राजकीय नेत्यांनी सकाळच्या सत्रातच मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदान केले. बार्देशातील मतदान टक्केवारीचा आलेख पाहिल्यास दिवसाअखेर टक्केवारीने वेग घेतला.

गेल्या काही वर्षांपासून लोकसभा निवडणुकीत या तालुक्यातील मतदार नेहमीच भाजपच्या बाजूने उभे राहिले आहेत. यावेळी देखील काही लोकांचा कल भाजपच्या बाजूनेच दिसला. पण अल्पसंख्याक मतदारांची भूमिका वेगळी दिसली. मात्र, सायलंट वोटिंगचा करिष्मा यावेळी विजयी उमेदवारासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.


कळंगुट, हळदोणा, शिवोली व थिवी या मतदारसंघातील अल्पसंख्याक मतदारांमध्ये राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीबाबत नाराजीचा सूर जाणवत होता. पहिल्यांदाच कळंगुटमधील ख्रिस्ती मतदार लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडले. ही टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडते, हे ४ जूनला निकालावेळी स्पष्ट होईल. रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे उमेदवार मनोज परब यांच्या मतांवर उत्तरेतील विजयी उमेदवाराचे एकूणच मताधिक्क्य अवलंबून राहणार आहे.

या निवडणुकीत भाजपने श्रीराम मंदिर उभारणी, ३७० कलम रद्द करणे तसेच विकसित भारताच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली. उत्तर गोव्यातील २० पैकी १८ आमदार हे सत्ताधारी भाजपचे आहेत. तर बार्देशातील सात मतदारसंघांपैकी ६ आमदार हे भाजपचे आहेत. हळदोणाचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांच्या खांद्यांवरच बार्देश तालुक्यासह उत्तर गोव्याची जबाबदारी होती.

काँग्रेस पक्षाने महागाई, म्हादई, आरक्षण या गोव्यातील ज्वलंत अशा मुद्द्यांवर निवडणूक लढविली. रिव्हॉल्युशनरी गोवन्सला गत विधानसभा निवडणुकीत १० टक्के मताधिक्य मिळाले होते. तर आमदार वीरेश बोरकर यांच्या रुपात त्यांचा एक प्रतिनिधी विधानसभेत पोहोचला. आरजीने या लोकसभा निवडणुकीत गोव्याची अस्मिता टिकवून ठेवण्यासह येथील जमिनींच्या संरक्षणावर जोर दिला.

देशात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता येणार यात शंकाच नाही. मतदारांचा प्रतिसाद पाहून एक गोष्ट स्पष्ट येते की, मतदार राजा भाजपच्या बाजूने राहिला. उत्तर व दक्षिण मतदारसंघात कमळ फुलेल. तर देशात भाजप ३७० तर एनडीए मिळून ४०० पार जागा सहज मिळवेल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.  

म्हापशातून भाजपला यावेळी आघाडी मिळेल यात दुमत नाही. हा मतदारसंघ मागील २५ वर्षे भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला राहिल्याने भाजपची सरशी नक्कीच. मोदींच्या करिष्मासह भाऊंवर मतदार विश्वास दाखवतील, असे उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी सांगितले.  

यंदा रिव्हॉल्युशनरी गोवन्सला जिंकण्याची शक्यता अधिक आहे. कारण लोक गोव्यातील राजकारणाला कंटाळले आहेत. गोमंतकीयांना बदल हवा आहे. लोकांना संसदेत स्थानिक प्रश्न व विषय मांडलेले हवेत. हे काम केवळ आरजीपीच करू शकते, याची जाणीव गोवेकरांना आहे, असे आरजीपी उत्तर गोवा उमेदवार मनोज परब यांनी सांगितले.  

मतदार लोकशाही उत्सवात भाग घेण्यास उत्साही दिसले. मतदारांचा मला पाठिंबा असून मी ४० ते ५० हजारांच्या मताधिक्क्यांनी जिंकणार यात शंका नाही, असे उत्तर गोवा काँग्रेस उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांनी सांगितले.  

हात धुतल्यावर गेली शाई!

डिझायनर रेबोनी शहा यांनी शाईच्या गुणवत्तेशी संबंधित तक्रार दाखल करुन साल्वादोर द मुंद येथील मतदान केंद्राच्या अधिकाऱ्याला पत्र लिहिले. शहा म्हणतात की, मतदानाची शाई हात धुतल्यावर लगेच निघून जाते. यावर त्वरित कारवाई करा अन्यथा लोक पुन्हा मतदान करू शकतील. 

ठळक घडामोडी :

- मतदान केंद्रांवर मतदारांसाठी उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून शीतपेयांची व्यवस्था केली होती. परंतु बहुतेक बूथवर सकाळी ११ नंतर शीतपेय पोहोचली. बूथवर कुलरची सोय होती.

- पिंक बूथवर मतदारांना निवडणूक आयोगाकडून कापडी पिशव्यांचे वितरण. तसेच वैद्यकीय सुविधांची सोय.

- सकाळी ११ पर्यंत बऱ्यापैकी मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. दुपारच्या वेळी वेग मंदावला असला तरी दुपारी ३ नंतर मतदार घराबाहेर पडले.

- म्हापशातील मरड येथील सरकारी संकुल मतदान केंद्र क्र. १० वरील ईव्हीएम मशीन दुपारी बंद पडून तांत्रिक समस्या उद्भवली. त्यामुळे काहीवेळ मतदान प्रक्रियेत व्यत्यय आला. पेडे म्हापसा येथील एका मतदान केंद्रावर सुरुवातीलाच बॅटरीमुळे किंचित विलंब झाला.

- अपंग व्यक्तीसाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअर तसेच खास रिक्षाची व्यवस्था केली होती. काही मतदान केंद्रावर स्थानिक कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन लावले होते.

- भाजपचे सूक्ष्म संघटन व व्यवस्थापन हे काँग्रेस व आरजीपीच्या तुलनेत मजबूत.

- भाजपने मंत्री, आमदार, नगरसेवक, पंचसदस्यांची संपूर्ण ताकद निवडणुकीत झोकून दिली. दुपारनंतर भाजपने आपल्या मतदारांना घरातून बाहेर काढण्याचे काम केले.

- काँग्रेस व आरजीपीच्या अनेक मतदान केंद्रांवर पोलिंग एजंटही फिरकले नाहीत.