आपचे उमेदवार होणार शपथबद्ध

पक्ष न बदलण्याच्या पत्रावर करणार स्वाक्षरी : केजरीवाल


07th December 2021, 12:18 am
आपचे उमेदवार होणार शपथबद्ध

फोटो : अरविंद केजरीवाल
पणजी : गोव्याला आमदार खरेदी आणि पक्षांतराचा इतिहास आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार कायदेशीर शपथपत्रावर स्वाक्षरी करतील. ते पक्ष बदलणार नाहीत, असे आश्वासन आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले.
केजरीवाल म्हणाले की, आमदार खरेदी आणि पक्षांतर ही गोव्याच्या राजकारणातील सर्वांत मोठी समस्या आहे. दररोज कोणीतरी पक्ष बदलल्याची बातमी येते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आप उमेदवार एका शपथपत्रावर स्वाक्षरी करणार आहेत. ते पत्र मतदारांमध्ये वितरित केले जाईल. मतदारांना ते आश्वासन देतील की, ते इतर पक्षांत जाणार नाहीत. कोणी पक्ष बदलल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
‘मी निवडून आलो तर मी माझा पक्ष सोडणार नाही आणि भ्रष्टाचार करणार नाही. पक्ष सोडला तर मी कायदेशीर कारवाईला जबाबदार आहे, असे लिहून आप उमेदवार शपथपत्रावर स्वाक्षरी करतील. त्यानंतर मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला हे प्रतिज्ञापत्र वितरित केले जाईल, असे केजरीवाल म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आप दिल्लीच्या राजकारणात येण्यापूर्वी, दिल्लीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला होता. दिल्लीतील २०१३ सालच्या पक्षाच्या पहिल्याच निवडणुकीच्या वेळी आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध अशाच प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करून ते मतदारांत वितरित केले होते. भारतीय राजकारणात मतदार खरेदी-विक्री नवीन नाही. पक्षांतराचा विषाणू संपूर्ण देशात पसरला आहे. पक्षांतराच्या जोरावर एकच पक्ष सत्तेवर येत आहे. त्यामुळे पक्षांतरविरोधी कायदा कडक होणे आवश्यक आहे.
__
गोव्यात सध्या फक्त दोनच विषय ऐकायला मिळत आहेत, ते म्हणजे पक्षांतर आणि युती. शिक्षणाचा दर्जा सुधारणे, पाणीपुरवठा चांगला करणे किंवा स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे यांवर बोलणारा एकही नेता नाही. या राजकारणाला गोवेकर कंटाळले आहेत. ‘आप’ गोव्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन गोव्यात आली आहे.
_ अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय संयोजक, आप

हेही वाचा