गोव्यात ‘ओमिक्रॉन’चे पाच विदेशी संशयित!

नमुने चाचणीसाठी पाठवले पुण्याला


07th December 2021, 12:15 am
गोव्यात ‘ओमिक्रॉन’चे पाच विदेशी संशयित!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : जहाजातून गोव्यात आलेल्या पाच रशियन प्रवाशांना कोविडच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचा संशय आहे. या पाचही जणांचे नमुने चाचणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल येत्या बुधवार किंवा गुरुवारी मिळेल. त्यानंतरच पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
केपटाऊन येथून ३१ ऑक्टोबर रोजी निघालेल्या जहाजातून काही रशियन प्रवासी गोव्यात आले होते. २९ नोव्हेंबर रोजी त्यांतील एकात प्रथम कोविडची लक्षणे दिसून आली. त्यानंतर जहाजातील २१ प्रवाशांची चाचणी करण्यात आली होती. त्यांतील काहींचे अहवाल बा​धित आले. पण, त्यांतील पाच जणांचा २१ नोव्हेंबर रोजी रशियाशी संपर्क आला होता. त्यामुळे त्या पाच जणांना ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचा संशय आहे. या पाचपैकी तिघांचे कासावली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विलगीकरण करण्यात आले आहे. इतरांना जहाजातच ठेवण्यात आले आहे, असे डॉ. बेतोडकर यांनी सांगितले. पुण्यातील प्रयोगशाळेतून चाचणी अहवाल आल्यानंतरच संबंधित पाच रशियन प्रवाशांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही, ते स्पष्ट होईल. त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, इतर देशांमध्ये थैमान घालण्यास सुरुवात केलेल्या कोविडच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने भारतातही प्रवेश केला आहे. त्यामुळे केंद्रासह भारतातील सर्वच राज्यांतील सरकार आणि प्रशासनांनी सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. गोवा सरकारने एमपीटी तसेच दाबोळी विमानतळावर येणाऱ्या पर्यटकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. तर, केंद्राने निश्चित केलेल्या १३ देशांतून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवसांचे विलगीकरण अनिवार्य केले आहे. राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार वाढू नये, यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आरोग्य खात्याला पुन्हा सतर्क केले असून, मुख्यमंत्री अशा घटनांवर लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा