व्हाॅट्सअॅप पदवीधारकांची ‘ट्रोल’धाड

एरव्ही सोशल मीडियावर आपले पोस्ट बरेचसे सात्त्विक असतात, पण आणीबाणीच्या प्रसंगी आपला मूळ स्वभाव सर्व छटांसह प्रकट होतो. तुम्हाला काय वाटते?

Story: विचारचक्र । कुलदीप कामत |
07th December 2021, 12:00 am
व्हाॅट्सअॅप पदवीधारकांची ‘ट्रोल’धाड

करोनाच्या कालखंडात सगळ्यांत जास्त नुकसान जर कुठल्या क्षेत्राचे झाले असेल तर ते शिक्षणक्षेत्राचे. ह्या दोन वर्षात ‘पुढे ढकलण्याच्या’ नीतीचे दूरगामी परिणाम आपल्याला भोगावे लागण्याची शक्यता आहे. शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्ते व साहित्यिक श्री. नामदेव माळी यांनी ‘प्राैढ साक्षरता अभियान राबवावे लागू नये म्हणून’ शीर्षकाचा साधनामध्ये लेख लिहिला आहे, तो मुळातून वाचण्याजोगा आहे. विद्यार्थी पास झाले पण शिक्षणव्यवस्था नापास झाली, असे म्हणायची वेळ येऊ नये यासाठी काही ठोस पावले उचलण्याची निकड जागवते आहे.      

आजच्या लेखाचा विषय मात्र वेगळा आहे. आपण सगळ्यांनी कुठल्या ना कुठल्या विषयात पदवी घेतलेली असेल किंवा घेत असू. या दरम्यान विद्यापीठाच्या सर्व सोपस्कारातून आपण गेलेलो असू. पण आज एक विद्यापीठ कुठल्याही नियम, अटी, पात्रता याची तमा न बाळगता अधिकाधिक विद्यार्थ्यांना आपल्या कक्षेत घेत सर्वांना सुज्ञ करून सोडत आहे. ‘जे जे आपणांसी ठावे ते ते इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन । रामदासांचे शब्द त्या विद्यापीठाचे घोषवाक्य आहे. राज्य घटनेने केवळ ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाचा हक्क बहाल केला आहे. ह्या विद्यापीठाचे सर्व शाखांतील ज्ञान, सर्व वयोगटातील ज्ञानपिपासू विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे व्रत घेतले आहे बरे ! आपल्याला मिळालेले ज्ञान हे आपणां जवळ ठेवावे, त्याचा उपयोग फक्त आपल्याच भल्यासाठी करावा असला कोतेपणा, करंटेपणा ह्या विद्यापीठाचे विद्यार्थी कधीही दाखवत नाही. उलटपक्षी कधी एकदा आपल्याला मिळालेले ज्ञानामृत दुसऱ्याला पाजू याची तळमळ लागलेली असते. इतके सगळं संकिर्तन केल्यानंतर त्या विद्यापीठाचे नाव आेळखा असे विचारणे, म्हणजे ‘तेरा नाम क्या है बसंती’ ह्या शोले चित्रपटातील डायलाॅग सारखे होईल. ह्या विद्यापीठाचे नाव ‘व्हाट्सअॅप विद्यापीठ’.      

नेकी कर, दर्जा में डाल’ असे संत कबीर म्हणून गेले. व्हाॅट्सअॅप विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ‘कुछ भी कर आैर व्हाॅट्सअॅप पर डाल’ हा नवा मंत्र देशाला दिला आहे. इतके सर्व सुविधायुक्त विद्यापीठ असून सुद्धा ह्या विद्यापीठाचा आपण सर्वांनी शिष्यत्व पत्करून ह्या ज्ञानप्रवाहात झोकून द्यावे की नाही! पण नाही - आपला करंटेपणा, गरज नसताना प्रश्न पडण्याची जन्मजात खोड काही जात नाही, पण ते सोडा, कुठल्याही विद्यापीठात असे नाठाळ विद्यार्थी असतातच की! म्हणून काही विद्यापीठाची प्रतिष्ठा कमी होत नाही. ह्या विद्यापीठाची खरी शान आहेत ते विद्यापीठाचे मनस्वी विद्यार्थी मग प्रश्न असा राहतो, ह्या विद्यार्थ्यांना आेळखायचे कसे? त्याची काही लक्षणे बघूया. सर्वप्रथम व्हाॅटस्अॅप वर आलेल्या प्रत्येक मॅसेजवर तुमची नितांत श्रद्धा असते. तो मॅसेज, माहिती खरीच असल्याच्या जाणिवेने बिनदिक्कत इमाने इतबारे ती माहिती तुम्ही फाॅरवर्ड करत असता. आपल्या समाजसुधारकांना जेवढे आपल्याला फाॅरवर्ड नेता आले नाही, त्याची कैक परीने आपला देश फाॅरवर्ड झाला आहे. कारण इथे प्रत्येकजण काही ना काही फाॅरवर्ड करण्यात गुंतलेला आहे. लक्षण दुसरे - हे मॅसेजेस आेळखीचे आहेत तर पाहा. नेहरू कुटूंब काश्मिरी पंडित नसून मुसलमान आहे. ‘महात्मा गांधी व पं. नेहरूचें वेगवेगळ्या महिलांसमवेतेचे फोटो, भारतीय राष्ट्रगीताला यूनोची सर्वोत्तम राष्ट्रगीतांची स्वीकृती, नासा ने सुर्याकडे पाठविलेला उपग्रहांकडून ‘आेम’ च्या प्रतिध्वनीची नोंद.

वरील मॅसेज तुम्हाला कधी ना कधी आलेले असतीलच, जर आले नसतील तर ह्या विद्यापीठामध्ये तुमची इयत्ता बरीच खालची आहे. पण त्यावेळी हे मेसेज येऊन पाठविणाऱ्याचे धन्यवाद न देता फाॅरर्वड केले नसतील, तर तुम्ही विद्यार्थी म्हणून मठ्ठ आहातच पण तुमच्या देशभक्ती विषयी ही शंका घेण्यास जागा आहे.      

आता पुरे! झाला तेवढा उपहास बस झाला! असं कां व्हावं ? तदन खोटारडे, अतिरंजित मेसेज आपल्याला खरे का वाटतात. त्याची शहानिशा करावी असे आपल्याला का वाटत नाही, एकदा गोव्यातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डाॅ. नारायण देसाई यांनी या संदर्भात आपले विचार सांगितले होते. ते म्हणाले, ‘मुळातच आज वाचन कमी झाले आहे. एखादी गोष्ट साकल्याने समजून घ्यावी इतकी फुरसत कोणाला नाही. विषयाची गुंतागुंत समजून घेण्यापेक्षा विषयाचे सुलभीकरण करणे, ते गोष्टीकडे धर्माच्या दृष्टीने, पाहणे, सुष्ट-दुष्ट अशी विभागणी करणे आणि यच्चयावत गोष्ट देशप्रेमाशी जोडणे सोपे जाते. त्यामुळे आपल्या आकलन क्षमतेचे आगमनच इतके सुमार असल्याकारणाने आपल्याला सतत असल्या मॅसेजची तिकड भासते. तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा पदार्थ असतो. धूम्रपान केल्यानंतर हे निकोटीन मेंदूमधील विशिष्ट भाग उत्तेजित करतो. धूम्रपान करणाऱ्याला त्यामुळे बरे वाटते. पुढे मग त्याचीच सवय होते. ही निकोटीनची उत्तेजना त्याला सर्वसामान्यांपेक्षा आपण वेगळे आहोत ही तात्पुरती का होईना, आेळख देत असते; तंबाखूच्या व्यसनासारखेच व काहीसे इथे होत नाही का ?      

आता व्हाॅट्सअॅपच्या भांवडांविषयी बोलुया. ज्येष्ठ बंधू फेसबूक, धाकटी बहिण twitter. इथे trolling ची दहक्षत आहे. आपल्याला न पटलेल्या विचारांचे खंडन करण्याएेवजी, तो विचार मांडणाऱ््याचेच खंडन करणे, त्याला शिव्याशाप, वैयक्तिक उणीदुणी काढून मनस्ताप देणे याला मी योजलेला शब्द ‘ट्रोलधाड’ (कसा वाटतो?).      

ट्रोलघाड करणारे बऱ्याचदा भारतीय संस्कृती, धर्म याचे कडवे अभिमानी असतातच, त्याचबरोबर देशभक्तीची लखलखती तलवार त्यांच्या हाती असते. त्यामुळे देह, देव, अन् धर्मापायी म्लेछांची खांडोळी करण्यासाठी ते दिवसरात्र फेसबूकवर फसफसतात, नाही तर twitter वर टिवटिवत असतात. भारतीय संस्कृतीच्या थोर रसिकांनी हे समजून घेतले पाहिजे की, भारताला खंडन, मंडनाची दीर्घ परंपरा आहे. देशाच्या प्राचीन परंपरेचा अभिमान बाळगताना ह्या गोष्टीचे भान असू नये का?      

ह्या ट्रोलघाडी विषयी दोन शक्यता संभवतात. पहिली ह्या ट्रोलधाडीचे गट अहंमगंड किंवा न्यूनगंडातून तयार होत असतात. कधी कधी असेही होते, न्यूनगंडातून आलेला अहंमगंड अधिक आक्रस्ताळा असतो पण, शेवटी ‘गंड’ कधी ना कधी गळून पडणार. सर्वसामान्यांना हे सोसवत नाही. मोठ्या प्रेमाने जोपासलेला गंड वितळणे हे आपले अस्तित्व वितळले असे त्यांना वाटते. त्यातून हा थयथयाट दिसतो. याचा दुसरा अर्थ असा, तो मुद्दा विचार प्रस्तुत लेखात मांडलेला असतो, तो विचार मनोमन पटलेला असतो. पण तो विचार आपल्या सोयीचा नसतो. ‘सत्यनिष्ठ’ असणे हा रोकडा व्यवहार आहे. मानवी जीवन विचार ह्या सतत उत्क्रांत होत जाणाऱ्या गोष्टी आहेत. एका विशिष्ट बिंदूशी थांबणे अभिप्रेत नाही. आपले अनुभव, जाणिवांच्या प्रगल्भतेबरोबर त्यात सुधारणा होणे अगदी स्वाभाविक आहे. पण हा बदल स्विकारायला परिपक्वता लागते. मनाचा व वृत्तीचा मोकळेपणा लागतो. तो नसेल तर गतिशुन्यतेचाच जयजयकार करण्यास आपण धन्यता मानतो.      

दुसरी शक्यता :- वाहन चालकाच्या प्रकृतीचे प्रतिबिंब, तो वाहन चालवत असताना पडते, असे म्हणतात हे बऱ््याच अंशी खरे आहे. सोशल मीडियावर व्यक्त होत असताना असेच काहीसे होत नाही का? एरव्ही सोशल मीडियावर आपले पोस्ट बरेचसे सात्त्विक असतात, पण आणीबाणीच्या प्रसंगी आपला मूळ स्वभाव सर्व छटांसह प्रकट होतो. तुम्हाला काय वाटते? वैयक्तिक जीवनातील वैकल्य, संताप, चीड, इतकंच नव्हे, तर विकृतीचे सुद्धा या माध्यमातून दर्शन घडते.

 देशाचे थोर समाजसुधारक र. धों. कर्वे यांनी वैयक्तिक टीका आणि शिष्टाचार ह्या लेखातील विचार ट्रोलधाडी घालणाऱ्या व ट्रोलघाडीत बळी पडलेल्यांना उपयुक्त व मननीय आहेत. शिव्या देणाऱ्या लेखकांना पुष्कळ वेळा हे कळत नाही, की शिव्या देण्याने त्या देणााऱ््याचा कमीपणा व्यक्त होतो, ज्याला शिव्या दिल्या त्याचा होत नाही. ज्याला समर्पक उत्तर देता येत नाही किंवा मुद्देसूद टीका करता येत नाही, तोच शिव्या देण्याचा मार्ग पत्करतो; एरवी शिव्या देण्याचे कारण काय? कधी असेही होते, की एखाद्याचा स्वभावच शिवराळ असतो म्हणून तो शिव्या देतो पण याचा अर्थ तरी हाच की त्याला मनाचा तोल सांभाळता येत नाही आणि तो क्षुल्लक कारणावरून संतापतो. हाही शिव्या देणाऱ््याचाच कमीपणा आहे आणि शिवाय अशा मनुष्याच्या शिव्या लिखाणात येण्याचे कारण नाही. मनुष्य संतापून बोलताना एखादे वेळी मनाचा तोल जाऊन तो शिव्या देईल. आणि कित्येक प्रसंगी ते क्षम्यही ठरेल, पण लिहिताना जास्त विचार करायला वेळ असतो, लिखाण पुन्हा वाचून पाहता येते, तेव्हा लिहिताना देखील ज्यांना तोल सांभाळता येत नाही ते लेखक नालायक आहेत, असे म्हणणे भाग आहे.       

तात्पर्य : ट्राेलधाडीला फारशी किंमत देण्याची गरज नाही.      

बैल हा माणसापेक्षा जास्त ताकदवान आहे. बैलाची धडक माणसाला जायबंदी करून शकते. क्वचित प्रसंगी त्यामुळे मुत्यूही आेढवू शकतो, पण त्यामुळे बैल माणसापेक्षा श्रेष्ठ ठरत नाही.