मगो-तृणमूल युती निश्चित

पक्षाच्या सर्व्हेनुसारच निर्णय घेतल्याचे मगो अध्यक्ष दीपक ढवळीकरांकडून स्पष्ट


06th December 2021, 11:51 pm
मगो-तृणमूल युती निश्चित

फोटो : युती निश्चित झाल्यानंतर मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना पुष्पगुच्छ देताना तृणमूलच्या खासदार तथा गोवा प्रभारी महुआ मोईत्रा आणि खासदार लुईझिन फालेरो. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाने तृणमूल काँग्रेसशी युती करण्याचे निश्चित केले आहे. युतीसंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात असून तृणमूलने मगोला बारा मतदारसंघ देण्याचेही मान्य केले आहे, अशी माहिती मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली.
सोमवारी पणजीतील पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मगो-तृणमूल युतीला पक्षाच्या केंद्रीय समितीने सोमवारच्या बैठकीत मान्यता दिली. मगोने तीन-चार महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. निवडणुकीबाबत पक्षाने अंतर्गत सर्व्हेही केला होता. मगो-तृणमूलची युती झाल्यास दोन्ही पक्षांना फायदा होणार असल्याचे सर्व्हेतून सिद्ध झाले होते. त्यामुळेच आम्ही तृणमूल काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचे निश्चित केले. सद्यस्थितीत मगो आणि तृणमूल काँग्रेस या दोनच पक्षांनी युतीचा निर्णय घेतला आहे. पण, पुढे आप व इतर पक्षही आमच्यासोबत येऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फोंडा, शिरोडा, मडकई, प्रियोळ, पेडणे, मांद्रे, सावर्डे, कुडचडे, हळदोणा, दाबोळी, डिचोली आणि मये या बारा जागा मगोला देण्याचे तृणमूलने मान्य केले आहे. पुढील काळात यात वाढही होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
मगोने भाजपशी युती का नाकारली किंवा भविष्यात सत्तास्थापनेसाठी भाजपला गरज भासल्यास मगो पाठिंबा देणार का, असे प्रश्न विचारले असता, १९९९ मध्ये मगोने हात देऊन भाजपला गोव्यात आणले. पण, त्यानंतर भाजपने सातत्याने मगो पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. आमचे आमदार फोडले. तरीही आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत राहिलो. पण आता ते शक्य नाही. त्यामुळेच आम्ही येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युतीसाठी होकार दिला नाही, असे दीपक ढवळीकर यांनी नमूद केले. राज्यात भाजप बळकट असल्याचा दावा नेते करत आहेत. पण, त्यांच्याकडून मगो, गोवा फॉरवर्ड तसेच काँग्रेस या पक्षांचे आमदार फोडण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्यातून या पक्षाकडे पात्र उमेदवार तसेच भक्कम संघटना असल्याचे अजिबात दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसचे तर अस्तित्वच दिसत नाही. निवडणूक येईपर्यंत काँग्रेसचे किती आमदार पक्षात राहतात, हाच प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेससोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
.......................................................
बॉक्स
येत्या १३ रोजी युतीवर शिक्कामोर्तब
तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी १३ डिसेंबर रोजी गोव्यात येत आहेत. त्यांच्या या भेटीत मगो-तृणमूल काँग्रेसच्या युतीवर शिक्कामोर्तब होईल. या युतीत इतर पक्ष येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असेही दीपक ढवळीकर म्हणाले.
............................................
बॉक्स
प्रेमेंद्र शेट मगोसोबतच!
मगोचे मयेतील निश्चित उमेदवार प्रेमेंद्र शेट भाजपात जाणार असल्याच्या बातम्या आम्हाला प्रसिद्धी माध्यमांतून ऐकायला मिळाल्या. यात कोणतेही तथ्य नाही. प्रेमेंद्र शेट अजूनही मगोसोबत असून, ते आमच्या संपर्कातही आहेत. प्रेमेंद्र मगोसोबतच राहतील, असा विश्वासही दीपक ढवळीकर यांनी नमूद केला.
.............................................
बॉक्स
आमदार अपात्रता प्रकरणी लवकर निकाल यावा
आमदार अपात्रता याचिकांबाबत येत्या निवडणुकीआधी सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल आल्यास २०२२ मध्ये आमदार पक्षांतर करणार नाहीत. ज्यांना पक्ष सोडायचा आहे त्यांना राजीनामा देऊनच बाहेर पडावे लागेल. त्यामुळे अपात्रतेसंदर्भात लवकरात लवकर निकाल यावा, अशी मगोची अपेक्षा आहे, असेही दीपक ढवळीकर म्हणाले.
.............................................
सावईकरांचा निशाणा; दीपकचे प्रत्युत्तर
- मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मगो-तृणमूल युती निश्चित असल्याचे स्पष्ट केल्यानंतर भाजप नेते तथा माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी सोशल मीडियावर ‘भाऊ, त्यांना माफ करा’ असे वाक्य लिहून मगोवर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.
- दीपक ढवळीकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. इतर पक्षांचे उमेदवार चोरून निवडणूक लढवू पाहत असलेले भाजप नेते निराश झाले आहेत. त्यातून ते अशाप्रकारची वक्तव्ये करत आहेत. मुळात भाऊसाहेब बांदोडकर आम्हाला माफ करण्याऐवजी स्फूर्ती देत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा