भवति भिक्षां देहि

अक्षरशः लोकांच्या घरादारात झोळी पसरून भिक्षा मागितली. भिक्षुक हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी होते. भिक्षा देणारे त्यांच्या माताभगिनी होत्या. अचंबित करणारा असा हा उपक्रम सरकारी प्राथमिक विद्यालय आंबेशी-पाळी शाळेतर्फे आयोजित करण्यात आला.

Story: असे उपक्रम अशी शाळा | संकेत सुरेश नाईक |
04th December 2021, 11:58 pm
भवति भिक्षां देहि

विश्व पातळीवर सतावत असलेल्या कचर्‍याची विल्हेवाट या  समस्येवर सर्व स्तरावर युध्दपातळीवर काम चालू आहे याची जाणीव सर्वांना आहे.  पर्यावरण मंत्रालयातर्फे  विविध उपक्रम, अभियान, प्लास्टिक निर्बंधविषयक कार्यक्रम आखून कचर्‍यासंबंधित समस्या संपुष्टात आणण्याचा प्रयत्न चालू आहे. नगरपालिका, पंचायत, विविध सरकारी-निम सरकारी-गैर सरकारी संस्था, व्यक्तिगत पातळीवर कचर्‍यासंदर्भात कामकाज सुरु आहे. शाळा महाविद्यालयातील अभ्यासक्रमात ‘कचरा, स्वच्छता, कचरानिर्मिती, कचरा कमी करणे, प्रदूषण ’ आदि अध्ययन निष्पत्ती पूर्ण होण्यासाठी भाषा, मूल्यवर्धन, परिसर अभ्यास इत्यादी विषयात घटक-उपटक तयार करून शिकवले जातात. चार भिंतीच्या आत शिकवली जाणारी ही निष्पत्ती येणे आवश्यक आहे. 

सध्या शिक्षण खात्यातर्फे स्वच्छतेसंदर्भात  मासिक, त्रैमासिक पद्धतीने परिपत्रके शैक्षणिक संस्थांना येतात. त्यानुसार कार्यक्रम आखून अनेक शिक्षणसंस्था ते परिपत्रक तडीस नेताना दिसतात. 'स्वच्छता हिच सेवा', स्वच्छता पंधरावाड़ा, एकेरी वापरातील प्लास्टिक मुक्त भारत, स्वच्छता अभियान यासारख्या देशव्यापी मोहिमे अंतर्गत प्लास्टिक प्रतिबंधात्मक यावर  विशेष भर देऊन विविध कार्यक्रम सरकारतर्फे राबविले जात आहे. 

‘स्वच्छता हिच सेवा’ या मथळ्याचे परिपत्रक शिक्षण खात्यातर्फे आमच्याही शाळेत आले होते. सदर परिपत्रकानुसार शाळेतर्फे पालक शिक्षक संघाने उपक्रम आयोजित करण्याचे ठरविले. शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम, प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी उपक्रम आयोजित केला. वाड्यावर हिंडून विद्यार्थ्यांनी हातात झोळी घेऊन, लोकांच्या दारात मुखाने “भवति भिक्षाम देही!” म्हणत चक्क प्लास्टिक कचऱ्याची भिक्षा मागावी असा उपक्रम हाती घेण्याचे ठरविले .  

'अक्षरशः लोकांच्या घरादारात झोळी पसरून भिक्षा मागितली. भिक्षुक हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी होते. भिक्षा देणारे त्यांच्या माताभगिनी होत्या. अचंबित करणारा असा हा उपक्रम सरकारी प्राथमिक विद्यालय आंबेशी-पाळी शाळेतर्फे आम्ही आयोजित केला गेला.  गांधी जयंतीचे औचित्य साधून "भवति भिक्षाम देहि" हा स्वच्छता उपक्रमांविषयी वादविवाद झाले तरीही उपक्रम मार्गी लावला. कचर्‍याचे पृथक्करण करून आपण ओला व सुका कचरा वेगळा करणे, एकेरी वापरातील प्लास्टिक गोळा करणे, प्लास्टिकाचे  दुष्परिणाम यावेळी लोकांना मुलांतर्फे  सांगण्यात आले. प्लास्टिक कच‍र्‍याचा वापर कमी  व्हावा किंवा बंद व्हावा हे सर्वांना वाटते त्यामुळे शाळेत आलेल्या परिपत्रकांच्या अनुषंगाने किंवा विविध शालेय दिनांचे औचित्य साधून वेशभूषा स्पर्धा, घरातील प्लास्टिक कचरा गोळा करून शाळेत आणून देणे,  मुलांना घेऊन सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविणे, स्वच्छता रॅली, टाकाऊपासून टिकावू स्पर्धा आयोजित करणे, कापडी-कागदी पिशव्या तयार करणे व ती नातेवाईकांना आपल्या वाढदिवसाला भेट देणे,  'बी अ वेस्ट वॉरियर' नावाने विद्यार्थ्यांचा पालकांचा शाळेतर्फे सम्मान करणे, कचारा व्यवस्थापन अभ्यासकांच्या मदतीने कार्यशाळा आयोजित करणे, गावात उत्सवावेळी मुलांचे पथनाट्य आयोजित करून लोकांमध्ये जनजागृती करणे यासारखे उपक्रम आपण आयोजित करू  शकतो. 

पुनर्वसन-साळ  व आंबेशी पाळी सरकारी प्राथमिक शाळेतर्फे यासारखे कार्यक्रम आयोजित करून यांचा प्रत्यय विद्यार्थ्यांना आणून दिला. डिचोली येथील शिरगाव शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका योगिता पुनाळेकर आणि त्यांच्या सहाय्यक शिक्षिका जागृती नाईक व सुमिता फडते आदींनी मिळून पालकांच्या साहाय्यने प्लास्टिकमुक्तीचा अजब उपक्रम  राबविला. घरात  किंवा घराशेजारील अस्ताव्यस्त पडणारे प्लास्टिक, प्लास्टिकच्या बाटल्या आदी कचरा साठवून  ठेवण्यास  सांगितले. पर्यावरण रक्षणांचा संदेश मुलानां देण्यात आला. 

कचरा निर्मूलन करणारे विविध उपक्रम आपण राबवू शकतो त्यासाठी गावची  पंचायत किंवा गैर सरकारी संस्थाची, महिला मंडळ, व्यक्तिगत जाणकारांची मदत घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. प्राथमिक इयत्तेपासून घनकचरा व्यवस्थापन ह्या विषयावर मुलांना मार्गदर्शन करणारा वरील उपक्रम विद्यार्थ्यांच्या आजन्म स्मरणार्थ व कृतीत राहणारा असाच आहे.