आल.. ईझ.. वेल् !

Stress म्हणजेच तणाव हा आपल्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा आणि अपरिहार्य घटक आहे. कोणत्याही कामाला किंवा परिस्थितीला आपल्या मनातून आणि शरीरातून येणारा प्रतिसाद म्हणजेच तणाव. आपल्या आयुष्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या आव्हानांना आपण कशा पद्धतीने सामोरे जातो यावरच आपल्या जीवनाची गुणवत्ता अवलंबून असते. म्हणूनच आज या लेखात या चित्तवेधक अशा तणावाबद्द्ल जाणून घेऊया.

Story: समुपदेशन । विभा आळगुंडगी, फोंडा ७७०९६ |
03rd December 2021, 11:22 Hrs
आल.. ईझ.. वेल् !

बाॅसने प्रोजेक्टची अंतिम मुदत २ दिवसात असल्याचे घोषित केल्याक्षणी अविनाशची पार धांदलंच उडाली. मनोज मात्र उत्साहित झाला. समोर येणारे कोणतेही आव्हान स्वीकारण्याची वृत्ती आणि नेहमीच तयारी. हाच स्वभाव मनोजसाठी अशा परिस्थितीत उत्तेजित होण्याचे कारण ठरायचा. अविनाशला मात्र नेहमीच्या व्यतिरिक्त आलेल्या अगदी साध्या आव्हानांनाही तोंड देता देता नाकी नऊ यायचे. शेवटी व्हायचे तेच झाले - मनोजने विनासायास प्रोजेक्ट पूर्ण केला आणि तिकडे अविनाशला मात्र उच्च रक्तदाबाच्या गोळ्या घेतच दिवस घालवावे लागले.

 Stress म्हणजेच तणाव हा आपल्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा आणि अपरिहार्य घटक आहे. कोणत्याही कामाला किंवा परिस्थितीला आपल्या मनातून आणि शरीरातून येणारा प्रतिसाद म्हणजेच तणाव. आपल्या आयुष्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या आव्हानांना आपण कशा पद्धतीने सामोरे जातो यावरच आपल्या जीवनाची गुणवत्ता अवलंबून असते.  

वेगवेगळ्या प्रकारचे तणाव आपल्या आयुष्यात सदैव येत असतात. त्यातले काही प्रकार आपण जाणून घेणे आवश्यक आहे.

तीव्र ताण (acute stress) हा एक अल्पकालीन ताण असतो. तो सकारात्मक असूनही अनेकदा त्रासदायक ठरू शकतो. दैनंदिन जीवनात आपल्याला बहुतेक वेळी याच तणावाचा सामना करावा लागतो.

दीर्घकाळचा ताण (chronic stress) हा तणाव कधीही न संपणारा आणि अटळ वाटतो. उदाहरणार्थ अनुकंपनीय विवाह किंवा नोकरीचा ताण वगैरे. याप्रकारचे ताण अत्यंत क्लेशकारक अनुभवांमुळे किंवा बालपणातील आघातांमुळे देखील उद्भवू शकतात.

Eustress हा एक वेगळ्या प्रकारचा सकारात्मक ताण असतो. हा‌ आपल्याला आपली कामे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात मदत करतो आणि आम्हाला उत्साहीही ठेवतो. उत्कंठापूर्ण आणि रोमांचक उपक्रमांसाठी आपल्या शरीरात तयार होणाऱ्या adrenaline या रसायनाशी Eustress प्रकारचा ताण संबंधित आहे.

 तणावाची अनेक चिन्हे आणि लक्षणे असतात. ही लक्षणे साधारणपणे ४ भागांमध्ये विभागली जाऊ शकतात. मानसशास्त्रीय लक्षणे म्हणजे लक्ष केंद्रित करण्यात अडचण, चिंता, तसेच गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचण वगैरे असू शकतात.

भावनिक लक्षणे म्हणजे रागावणे, चिडचिड होणे, मूडी असणे किंवा निराश होणे वगैरे.

शारीरिक लक्षणांमधे उच्च रक्तदाब, वजनात बदल, वारंवार सर्दी किंवा संक्रमण. तसेच मासिक पाळी किंवा कामवासनेतील बदल इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

वर्तणूक लक्षणे म्हणजे स्वत: ची काळजी न घेणे, आवड आणि छंद जोपासण्यासाठी वेळ न काढणे. तसेच परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी मादक द्रव्यांवर अवलंबून राहणे, अंमली पदार्थांचे सेवन करणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

 तणाव जरी अपरिहार्य असला तरी त्याला आपण आवर घालू शकतो. आपल्याला नक्की कोणत्या गोष्टी तणाव देऊ शकतात आणि तणावाचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे. तरच आपण आपल्या मानसिक आरोग्याची जबाबदारी घेऊन आपल्या जीवनावर होणारा तणावाचा परिणाम कमी करू शकतो. तणावांचा सामना करण्यासाठी काही टीप्स जाणून घेऊया.

प्रदीर्घ काळापर्यंत त्रासदायक आणि तणावपूर्ण वेळ घालवून शेवटी थकवा आणि काम करण्याची क्षमता कमी होत आहे ही भावना निर्माण होणे याला burnout म्हणतात. उच्च पातळीचा ताण बर्नआउट होण्याचे कारण बनू शकतो. बर्नआउटमुळे हाती घेतलेले काम करताना थकवा जाणवू शकतो, उदासीनता येऊ शकते. दैनंदिन जीवनात जर भावनिक थकवा जाणवू लागला तर तणावावर नियंत्रण मिळवण्याचा मार्ग शोधण्याची वेळ आली आहे असे समजावे. अशा वेळी आपल्याला  burnout कोणत्या कारणाने होतोय हे ओळखणे गरजेचे ठरते. कारण त्यानेच आपण तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठीची पावले उचलू शकतो.

नियमित शारीरिक व्यायाम करण्याचा प्रयत्न करावा. शारीरिक हालचालींचा आपल्या मेंदूवर आणि शरीरावर मोठा प्रभाव पडतो. व्यायामामुळे ताणतणाव कमी होतात आणि मानसिक आजाराशी संबंधित अनेक लक्षणे सुधारतात हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

मुद्दामहून स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ काढावा. तणाव व्यवस्थापनासाठी आपल्या दैनंदिन जीवनात नियमित स्व-काळजी उपक्रमांचा समावेश करणे आवश्यक आहे. आपल्या मनाची, शरीराची, आत्म्याची काळजी कशी घ्यावी आणि आपले जीवन तणावमुक्त होण्यासाठी स्वतःला सुसज्ज करणे महत्त्वाचे आहे.

आपल्या जीवनात Mindfulness म्हणजेच सजगतेचा सराव करावा. मागच्या भागात आपण mindfulness कशाप्रकारे आपल्या जीवनाचा भाग बनवू शकतो याबद्दल जाणून घेतलेच आहे. सजगतेच्या नियमित सरावाने आपण आपल्या आयुष्यातील ताणतणाव बर्ऱ्याच अंशी कमी करू शकतो.

आयुष्यात प्रत्येकजण काही प्रमाणात तणाव अनुभवत असतोच. तथापि आपण ज्या पद्धतीने तणावाला प्रतिसाद देतो त्यावर आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अवलंबून असते. काही वेळा तणाव दूर करण्यासाठी समोर असलेली तणावपूर्वक परिस्थिती बदलणे आवश्यक असते, तर कधीकधी समोरच्या परिस्थितीला आपण कशाप्रकारे सामोरे जातो, हा बदल आवश्यक असतो. आपले मन खूप शक्तिशाली असते. ते समोरच्या परिस्थितीला किती महत्त्व देते आणि कशाप्रकारे त्याचा अर्थ काढते यावरच आपले जीवनाचे ताणतणाव ठरत असते.

 तर या चंचल आणि विलक्षण अशा मनाला हलकेच गोंजारून  शांत करूया आणि तणावमुक्त जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करूया.