ब्रा का घालावी ?

बऱ्याच जणींना जर विचारले की मुलींनी ब्रा का घालावी? खरोखरच ते गरजेचे आहे का? तर एक सहज सोप्पं उत्तर मिळते, की तुमच्या स्तनांना आधार देण्यासाठी ब्रा ही महत्त्वाची ठरते, त्यामुळे ब्रा घालावी. खरंच? फक्त एवढाच एक उद्देश आहे का यामागे?

Story: आरोग्य । सीमा खंडाळे ९१३६२८७१७१मा खं� |
03rd December 2021, 10:53 pm
ब्रा का घालावी ?

मुलगी म्हटली की तिची एक हटके स्टाईल आलीच! तिच्या विविध कलेक्शनमध्ये स्टायलिश टी-शर्टस, स्लीव्हलेस टॉप्स, लांब मोहक टँक टॉप, मोहक पंजाबी सूट असे सगळे प्रकार दिसतील. याचबरोबर तुम्हाला प्रत्येक मुलीच्या  कपाटात "ब्रा" हे अंतरवस्त्रही  सापडेल.॰

'ब्रा' किंवा 'ब्रेसीयर'! बऱ्याच जणींना जर विचारले की मुलींनी ब्रा का घालावी? खरोखरच ते गरजेचे आहे का? तर एक सहज सोप्पं उत्तर मिळते, की तुमच्या स्तनांना आधार देण्यासाठी ब्रा ही महत्त्वाची ठरते, त्यामुळे ब्रा घालावी. खरंच? फक्त एवढाच एक उद्देश आहे का यामागे? तसे बघितले तर मागच्या काही दशकांपासून ब्राने स्वतःचे एक वेगळे महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे! त्यामागील विविध कारणांचा आज आपण विचार करूयात. 

१) स्तनाचे वजन योग्य प्रकारे सांभाळणे:

स्त्रीचे स्तन तंतुमय पेशींनी व स्नायूंनी बनलेले असतात. हे स्नायू स्तनांच्या वजनाला नैसर्गिकरित्या आधार देतात. परंतु, कालांतराने ते सैल पडतात, त्यांना ब्राच्या साहाय्याने आधार दिल्यास ते व्यवस्थित आकारात राहतात. जेव्हा तुम्ही व्यवस्थित आरामदायी ब्रा घालता, तेव्हा पट्ट्या खांद्यावर स्तनांना आणि पाठीला आधार देतात. तुमच्या स्तनांचे वजन समानरितीने सांभाळले जाते व  त्यामुळे स्तन डगमगत नाहीत. 

२) आरामदायी वाटते:

हल्लीच्या धावपळीच्या जीवनात दैनंदिन कामांत विविध हालचालींचा समावेश होतो. शारीरिक हालचालींदरम्यान तुमचे स्तन वर-खाली होणे स्वाभाविक आहे, त्यामुळे गैरसोय होते आणि अस्वस्थता वाटते. अशा वेळी मुलींनी ब्रा घालण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे ही अस्वस्थता कमी करणे. एक ब्रा आपल्या स्तनांना अवास्तव हलण्यापासून  सांभाळून घेते व अत्यंत आवश्यक असा आराम देते. तुमच्या स्टाईलला आणि गरजेला जमेल अशी ब्रा घातल्याने स्तनांच्या अनावश्यक हालचालींमुळे होणारा त्रास आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. 

३) आत्मविश्वास वाटणे:

योग्य ब्राची निवड करणे महत्वाचे आसते. आपल्या स्तनांच्या आकारानुसार, योग्य मोजमापात घेतलेली ब्रा आपल्या पाठीला, मणक्यांना योग्य आधार देऊन आराम देण्यास मदत करते. बर्‍याच मुलींना स्पोर्ट्स ब्रा आणि पोश्चर करेक्शन ब्रा योग्य वाटतात. योग्य ब्रा घातल्यास उठताना, बसताना, मोकळेपणाने वावरताना एक वेगळाच आत्मविश्वास मुलींमध्ये दिसून येतो. योग्य प्रकारची ब्रा परिधान केल्याने तुम्हाला स्वतःला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवतो.   

४)ड्रेसला सुशोभित करते:

योग्यरित्या, अचूक पध्दतीने  निवडलेली तुमची ब्रा शरीराची आकृती उत्तम प्रकारे दर्शविते आणि तुम्हाला तुमचा चालण्या बोलण्यातला आत्मविश्वास दाखवण्यास मदत करते. तुम्ही कोणत्याही पोशाखात बिनधास्त वावरू शकता. परिपूर्ण योग्य अंतर्वस्त्र तुमच्या पोशाखाची शोभा वाढवते आणि तुम्हाला एक अतुलनीय लय  व आत्मविश्वास देते हे नक्की!

५) स्तनांचे आरोग्य राखण्यास मदत होते:

ब्रा घालण्यामागे  सौंदर्य वाढवण्याच्या  दृष्टीने जरी काही कारणे असतील तरी, त्यातून मिळणाऱ्या आरोग्यविषयक फायद्यांकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. भारी शारीरिक हालचालींदरम्यान ब्रामुळे स्तनांच्या पेशींना व स्नायूंना होणारे नुकसान टाळता येते. हे वेदना कमी करते आणि तुमच्या अंतर्भागातील त्वचेच्या आरोग्याची काळजीही घेते. तसेच ब्रा घातल्याने अजून एक महत्त्वाचा फायदा मिळतो, तो म्हणजे स्तनांखालील घामामुळे होणारा ओलावा शोषून घेतला जातो व तुम्हाला दिवसभर आरामदायी आणि कोरडे  राहण्यास मदत होते व त्यामुळेही खूप बरे वाटते.