महिलांचे आर्थिक नियोजन (भाग 2)

लॉकडाऊनच्या काळात रोख व्यवहाराला पर्याय म्हणून फोन पे, गूगल पे, पेटीएमसारखे पर्याय लोकांना ओळखीचे झाले. अश्या माध्यमातून खर्च करताना आकर्षक व्हाउचर कार्ड्सचे गाजर दाखवून कधी कॅश बॅक तर कधी स्क्रॅच कार्ड्सना भुलून आपण खर्च करत सुटतो. कॅश बॅक हे खर्चाच्या १% सुद्धा नसते.त्यामुळे खर्च करताना बेतानेच घ्यावे.( पुढे वाचा )

Story: तिचे नियोजन । सी.ए.राधिका काळे |
03rd December 2021, 10:48 Hrs
महिलांचे आर्थिक नियोजन (भाग 2)

याव्यतिरिक्त आणखीन एक नियोजन सद्य परिस्थितीत खूप महत्त्वाचे आहे. आपण आत्ता कुठे करोनाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडतोय. ह्या दोन वर्षांच्या काळात सर्वांच्या जीवनात उलथापालथ झाली. आर्थिक गणिते बिघडली. काहींच्या नोकऱ्या गेल्या, उद्योग धंदे मंदावले, पगारात कपात झाली. मग अश्या वेळी बहुतेक लोकांनी आपली शिल्लक गंगाजळी वापरली. पण हे योग्य आहे का? पुन्हा जर अशी परिस्थिती उद्भवली तर आपण काय करू शकतो? तर अश्या गोष्टी ह्या जीवनात घडतीलच असे गृहीत धरून पुढे जायचे. पण तयारीनिशी. अश्या परिस्थितीसाठी जे नियोजन केले जाते त्याला 'आपत्कालीन निधी' असे म्हणतात. साधारणत: आपला महिन्याचा खर्च आपल्याला तर माहीतच असतो. अश्या खर्चाच्या १० पट रक्कम एकत्र ठेवायची. जेणेकरून जरी १० महिने आपल्याला नोकरी नसली, व्यवसाय चालला नाही, तर व्यवस्थित टिकाव लागू शकेल. हा १० महिन्यांचा कालावधी पर्याय शोधण्यासाठी आपण वापरू शकतो. आता हा निधी ठेवायचा कुठे? तर अश्या ठिकाणी गुंतवायचा जिथून निकड असते तेव्हा हातात लगेच पैसा आला पाहिजे. म्हणजे 'फिक्स्ड डिपॉजिट' हा उत्तम पर्याय आहे.

त्यानंतर करोनाने आपल्याला आणखीन एक शिकवण दिली आहे. आपली तब्येत सांभाळायची. जे लोक करोनाग्रस्त झाले त्यांना विचारा. करोनाने जेवढे तब्येतीचे नुकसान झाले नाही, तेवढे नंतर झाले. करोना  झाल्यानंतर तब्येतीच्या तक्रारी वाढल्या आहेत. उपचार आले म्हणजे खर्चही आले आणि खर्च आले म्हणजे नियोजन करावेच लागणार! ह्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे 'मेडिक्लेम'  किंवा 'हेल्थ इन्शुरन्स'. वर्षातून एकदा किंवा काही कंपन्यांच्या पॉलिसीप्रमाणे २ वर्षातून एकदा भरावा लागतो. हा विमा उतरवताना काळजीपूर्वक सर्व तपशील वाचावेत, जेणेकरून कुठल्या आजारांबाबतीत किंवा खर्चाबाबतीत परतावा मिळतो हे कळणे  सोपे जाते. ह्यात आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे, क्रिटिकल इलनेस केअर .ह्या विम्या अंतर्गत काही रोगांसाठी संरक्षण मिळते. महिलांमध्ये हल्ली ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वीकल कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे असा विमा उतरवल्यास आर्थिक ताण निश्चित येणार नाही. 

आपल्याकडे अजून एक गैरसमज आहे. लाईफ इन्शुरन्स  म्हणजे जीवन विमा करणे म्हणजे गुंतवणूक. नोकरी लागली की एक तर नातेवाईक किंवा मित्र मंडळी किंवा कार्यालयातील कर्मचारी जे कोणी विमा एजन्ट असतात ते मागे लागतात आणि आपण कसलाही विचार न करता विमा उतरवतो. जीवन विमा हा व्यक्तीच्या मृत्यूनंतर वारसांना मिळणारा असतो. त्यामुळे जर आपल्यावरतीच जर कुटुंबातील सदस्य अवलंबून असतील तरच जीवन विमा उतरून घ्यावा. ह्यात आणखीन एक प्रकार असतो त्याला आपण टर्म इन्शुरन्स म्हणतो. हा विमा आयुष्यातील काही वर्षे म्हणजे १० ते ३० वर्षांपर्यंत विमा कवच देतो. ह्यात परतावा काहीही नसतो. परंतु ह्याचा हफ्ता अत्यंत कमी असतो.

बचतीची गुंतवणूक करताना आम्हा स्त्रियांच्या अगदी हृदयाजवळचा पर्याय म्हणजे सोने. ह्यात बचत करणे आपल्याला खूप आवडते. परंतु गुंतवणूक म्हणून जर आपण हा पर्याय निवडला तर दागिने खरेदी न करता सोन्याच्या नाण्यावर किंवा सोन्याचे बिस्कीट यावर भर द्यावा. जेणेकरून विक्री करणे सोपे जाते आणि विक्री करताना वजावट होत नाही. तसेच गोल्ड बॉंडसुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकतो. परंतु स्त्रीसुलभ स्वभावानुसार सोने विकणे हे स्त्रियांच्या खूप जीवावर येते. त्यामुळे भावनिकदृष्ट्या जर विचार केला, तर ह्या पर्यायात गुंतवणूक किती करावी हे प्रत्येक महिलेने आपल्या स्वभावानुसार ठरवावे. गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट हा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे. पण याचे पूर्ण ज्ञान असेल तरच इथे उडी मारावी. कारण इथे चढ-उतार खूप होत असतात. त्यामुळे जोखीम  भयंकर असते. ह्यापेक्षा इक्विटी म्युच्युअल फंड हा त्यामानाने सुरक्षित पर्याय आहे.

शेवटी सर्वांनी  एक लक्षात ठेवावे. आपला कष्टाचा पैसा आहे. तो कुठे वापरावा, कसा वापरावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु सर्वतोपरी जोखीम लक्षात घेऊनच पैसा गुंतवावा. गुंतवणूक अगदी छोट्या छोट्या रकमेपासूनसुद्धा केली तरी हरकत नाही. आपली आई, आजी काटकसर करून घरखर्चातून पैसे वाचवून डब्यात, फडताळात ठेवायच्या. जेव्हा गरज पडायची तेव्हा हाच पैसा घराच्या कामी यायचा. त्यांचे थोडे कसब आजच्या पिढीला शिकून घ्यावे लागेल. थेंबे थेंबे तळे साचे हे विसरू नये आणि ही  स्त्री घर सांभाळून, मुले, त्यांची आजारपणे, सगळी नातीगोती, पै पाहुणे सांभाळत, कसरत करत संसार सांभाळत असते. त्यामुळे नियोजन हे तिच्या रक्तातच असते म्हणा ना! तिच्यासाठी  आर्थिक नियोजन करणे हे काही फार कठीण नाही. त्यासाठी थोडी शिकण्याची वृत्ती, थोडा आधुनिकतेकडे कल ठेवला तर हे कामसुद्धा ती समर्थपणे पेलेल ह्यावर सर्वांचे एकमताच होईल. हो ना?