लाजून गोरीमोरी गुलाबी परी लाजरी…

झाडांना भावना असतात, झाडंही घडत असलेल्या बाह्य घटनांतून शिकत असतात, आपलं राहणीमान बदलू शकतात ह्या सगळ्या अकल्पनीय गोष्टी अगदी अलीकडे शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनाद्वारे सिद्ध केल्या आहेत. आणि हे सगळं या लाजळूच्या झाडांमुळे शक्य झालं.

Story: त्या फुलांच्या गंधकोषी । आसावरी कुलक |
03rd December 2021, 10:45 Hrs
लाजून गोरीमोरी गुलाबी परी लाजरी…

डोडोंग आणि ऐशा नवराबायको, त्यांना मूलबाळ नव्हते. बऱ्याच प्रार्थनेनंतर त्यांना एक मुलगी झाली, त्यांनी तिचे नाव मारिया ठेवले. अतिशय सुंदर आणि सद्गुणी मुलगी होती मारिया, पण लोकांना घाबरायची, लाजायची म्हणून दूरच रहायची लोकांपासून. आत दडून रहायची. ती १२ वर्षांची झाली. एकदा गावात दरोडेखोर आले अशी बातमी उठली. सगळे लोक दडून बसू लागले. डोडांग आणि ऐशाने मारियाला बागेत लपवले आणि स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसले. दरोडेखोरांना दोघेही सापडले आणि त्यांनी दोघांच्या डोक्यात काठी घातली, आणि दोघेही बेशुद्ध पडले,जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मारियाला शोधू लागले पण ती काही सापडली नाही, ते रडू लागले, शोधू लागले. शोधताना डोडांगच्या पायाला काटे बोचले, बघतो तर काय मारियाला लपवलेल्या ठिकाणी एक झाड उगवून आलंय, त्याची पानं हात लावल्याबरोबर मिटत होती, त्यांना कळलं की आपली मुलगी झाड झाली आहे, ऐशा धाय मोकलून रडू लागली, तर काय आश्चर्य तिच्या प्रत्येक आसवाबरोबर त्या झाडावर सुंदर गुलाबी फुलं उमलली, त्यांनी त्या झाडाला नाव दिलं मकाहिया म्हणजेच touch me not किंवा आपली लाजरी, लाजाळू, लाजवंती, लजकी आणि हिंदीतली छुइमुई हे झाड, philippines देशातली ही लोककथा मला नव्यानेच कळली, गूगल बाईकडून. दवात भिजलेल्या गार सकाळी जमिनीवरच्या हिरव्या गालिच्यावर गुलाबी हसरी फुलं बघितली आणि ही कथा खरीच वाटली मला.

छोटीछोटी गुलाबी गेंदेदार गोंडस फुलं उमलू लागली की, अस्तित्व कळतं झाडाचं, आजूबाजूला प्रचंड गवत, इतर नडणी आणि काढायला जावं तर ही लाजरीची काटेदार झाड. ऑफिसच्या वाटेवर चालत येताना रस्त्यावरती उनाडक्या करत येते मी शाळकरी मुलीसारखी, आणि मोबाईलवर क्लीक करत असते, निसर्गाची नवलाई अगदी शाळकरी मुलीसारखी टिपते.

खरंतर तसं लक्षात येत नाही हे झाड पटकन, पण स्पर्श झाल्यावर पान पटापट मिटू लागली की कळत, आणि हो याचे काटे भयानक ओरबडतात पायाला.

शास्त्रीयदृष्ट्या, शेंगा येणाऱ्या किंवा leguminous कुळातील हे छोटे झाड, शास्त्रीय नाव mimosa pudica pudica म्हणजे लाजणारे झाड, नडणी म्हणून येणारे झाड आपल्या रोजच्या बघण्यातले असले तरी जगभरातल्या प्रयोगशाळेत यावर प्रयोग चालू आहेत, त्याच्या लाजण्याच्या गुणामुळे. ही पानं लाजतात म्हणजे नक्की काय होतं, तर या पानाच्या देठापाशी pulvinus नावाचा फुगीर भाग असतो, पानांना स्पर्श झाला की रासायनिक प्रक्रिया होऊन पाण्याची पातळी उतरते आणि दाब कमी होतो, त्यामुळे पानं मिटतात, स्वतःचं रक्षण करण्यासाठी निसर्गाकडून हे अलौकिक वरदानच मिळालेलं आहे लाजरीला. 

अख्ख्या जगभर हे झाड सापडतं. औषधातही वापरलं जातं बहुतांश ठिकाणी, त्वचा रोग, पोटातल्या समस्या यावर मूळ, पान यांचा उपयोग होतो, तसेच ह्रदयरोग, मुतखडा इत्यादीसाठी ग्रामीण भागात याचा वापर होतो. फुलं फुलून गेल्यावर छोट्याछोट्या शेंगा धरतात, यांची राख करून वेगवेगळ्या रोगांवरती उपचारात वापरली जाते. या झाडाचा अजून एक उपयोग म्हणजे बाकीच्या शेंगा येणाऱ्या झाडाप्रमाणे हे झाड हवेतील नत्र जमिनीत आणण्याच काम करते. अतिशय महत्त्वाचं असं हे काम, यांच्या मुळाशी असलेल्या छोट्याछोट्या गाठीमध्ये बॅक्टरिआ रहातात, आणि ते हे काम करतात, संशोधनातून असेही लक्षात आलंय की धोकादायक अश्या रसायनांचे प्रदूषण असलेल्या मातीच्या  ढिगऱ्यातून विषारी घटक शोषून घेण्यासाठी हे झाड अत्यंत उपयुक्त आहे, झाडांना भावना असतात, झाडंही घडत असलेल्या बाह्य घटनांतून शिकत असतात, आपलं राहणीमान बदलू शकतात ह्या सगळ्या अकल्पनीय गोष्टी अगदी अलीकडे शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनाद्वारे सिद्ध केल्यात आणि हे सगळं या लाजळूच्या झाडांमुळे शक्य झालं. वनस्पतीशास्त्र शिकताना किंवा शाळेत विज्ञान शिकताना  निसर्गातील प्रतिसादाच्या बद्दल शिकताना लाजरी हेच उदाहरण म्हणून शिकवलं जातं,

मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण या झाडाला तंतोतंत लागू पडते. काटेदार गालीचातून डोकावणारे फुलतुरे गोंडस शाळकरी मुलांप्रमाणे भासतात, पोलका डॉट्स असलेल्या फ्रीलच्या फ्रॉक घातलेल्या गोड मुली, जत्रेत मिळणारे म्हातारीचे केस (candy floss), किंवा टीव्हीवरल्या लडाख प्रातांत दाखवण्यात येणाऱ्या गुबगुबीत गालांच्या हिमालयीन मुलांसारखे अगदी,  जवळ गेल्यावर कळत की ब्रशसारख्या केसाळ फुलावर छोटे पांढरे पराग कण असतात, संध्याकाळी मात्र अगदी चोळामोळा होऊन बसतात ही फुलं, युद्धात अडकलेल्या केविलवाण्या मुलांसारखी काही वर्षांपूर्वी लाजरी नावाच्या साडीचा ब्रँड ही आला होता, आणि त्याची जाहिरात लागायची टीव्हीला लाआआ जरी असं गोड आवाजात ते जिंगल लागलं की ही फुलं यायची डोळ्यासमोर एखादया लाजऱ्या मुलीला लाजरीची छुइमुई ची उपमा देतात, 

छुइमुई सी तुम दिखती हो,

फुलों जैसी हसती हो...

असं एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणतो...

पण या लाजरीचं कर्तृत्व मात्र अफाट आहे जग व्यापणारं, म्हणूनच दिसतं त्यावर आडाखे न बांधता अंतरंगात घुसून कर्तृत्व पारखण कधीही योग्य...  माणसांच्या बाबतीतही असंच असतं/ असावं नाही का?