एक वाढदिवस विसरलेला ….

माईंनी शोकेसमधला अल्बम काढला. एक एक फोटो पाहतापाहता त्या सात-आठ वर्षे मागे गेल्या. आठवणींचे पाऊसथेंब टप् टप् बरसू लागले. त्या आठवणींच्या श्रावणधारा कधी झाल्या कळलंच नाही. आठवणी या वारूळातल्या मुंग्यांसारख्या असतात. किती आहेत याचा बाहेरून अंदाज येत नाही पण एक निघाली की पाठोपाठ अनेक बाहेर निघत राहतात!

Story: ललित । अपूर्वा कर्पे, कुडचडे- गोवा. ८३९� |
03rd December 2021, 10:44 pm
एक वाढदिवस विसरलेला ….

वसंतरावांनी त्यांना आवडलेली, शोकेसमध्ये लावलेली सिल्कची साडी आणली होती. ती नेसल्यावर ते कौतुकाने म्हणाले होते, ‘अजूनही किती छान दिसतेस गं तू !’ आजही माई मनोमन लाजल्या. वसंतरावांच्या फोटोकडे पाहिले, तेही हसल्याचा भास झाला त्यांना. पुन्हा एकदा त्या भूतकाळात गेल्या. परेशचाही फोन सकाळीच आला होता अमेरिकेहून…सून, नातवंडे, सगळे बोलले… फोन ठेवेपर्यंत केदार फॅमिलीसह आला…किती हसलो, किती गडबड, अनुही आलीच. पोरांचा गोंधळ, केदारनं आग्रह करून बाहेरच नेलं सर्वांना. संध्याकाळी बीचवर मुलं खेळली. मोठ्ठयांनी  गप्पा मारल्या. मग भेळ नि आईस्क्रीम खाऊन सगळे पांगले. घरी येऊन नातवंडांनी दिलेली ग्रीटिंग कौतुकाने पाहताना दिवसाची सांगता झाली. नाही म्हणता आजही माईच्या डोळ्यात अश्रू तरळून गेले.

‘अगं बाई ! सात वाजले की !’ लगबगीने माई बाथरूमकडे धावल्या. केदारनं त्याच्या घरप्रवेशाला घेतलेली साडी त्या नेसल्या. गळ्यात नाजूक मोत्यांची माळ व मॅचींग कानातले, मोत्यांची काकणे पण हौसेने घातली. त्या बाहेर आल्या. केदारला पुरणपोळी फार आवडते व त्याच्या बायकोला, रत्नाला कटाची आमटी, अनुसाठी स्वस्तिक मधून जिलब्या आणून ठेवल्या होत्या, नातवंडांना आईस्क्रीमही आणून ठेवली होती. जावईबापुना शुगर फ्री आईस्क्रीम आणायलाही त्या विसरल्या नाहीत. केकही ऑर्डर करून आणला होता. रत्नासाठी एगलेस केकही आणला होता. बारीक चिरलेल्या बटाट्याची कांद्यात परतलेली भाजी परेशला व केदारला फार आवडायची. कुकरमध्ये पुरणासाठी डाळ व बटाटे लावून त्या निवांतपणे देवघराकडे वळल्या. देवापुढे तुपाचा दिवा लावला, धूपबत्तीच्या सुगंधाने घरदार दरवळ व नि मनही प्रसन्न झालं. नीत्याचा जप व स्तोत्र म्हणून त्यांनी हात जोडले… मुलाबाळांसाठी आयुष्य, आरोग्य मागितलं.

इतक्यात लक्ष्मी आली. तिला स्वयंपाकाच्या सूचना देऊन त्या फोनकडे आल्या. फोन चालू आहे ना? रिसिव्हरसारखा ठेवला आहे ना? त्यांनी खात्री करून घेतली नि त्या वर्तमानपत्र उघडून  बसल्या. अक्षरावर नजर फिरत होती पण मेंदूत काहीच शिरत नव्हतं. आज रविवार, मुलं सरप्राईज द्यायला दुपारीच येतील! हलकल्लोळ माजेल घरभर…एक वस्तू जाग्यावर राहणार नाही!… पुढील आठ दिवस माई त्या तशाच विखुरलेल्या ठेवत, तेवढाच मुलाबाळांच्या अस्तित्वाचा आभास …

त्यांनी तिसऱ्यांदा  मुलांच्या स्वच्छ करून घेतलेल्या खोल्यांची दारं खिडक्या उघडून, कोंदट वास तर येत नाही ना? याची खात्री करून घेतली. उगाच स्वच्छ धुतलेल्या बेडशीट्स सारख्या केल्या. उघड्या खिडकीजवळ जाऊन मोकळा श्वास घेतला. ‘अगं बाई! चमेलीचं झाड बावल्यासारखं वाटलं… अनू पाहिल तर चप्पल काढायच्या अगोदर पाईप चालू करून येईल !'

“लक्ष्मी गॅसवरचं काम झालं तर पोळ्या करायला घ्यायच्याआधी जरा झाडांना पाणी घाल बाई, अनु आल्या आल्या कावायला नको !” एव्हाना पुरण शिजल्याचा वास दरवळू लागला होता…आता केदार हुंगतच  किचनमध्ये घुसेल. त्या स्वत:शीच मंद हसल्या… गॅलरीत जाऊन दूरवर पाहून आत आल्या.

माईंनी शोकेसमधला अल्बम काढला. एक एक फोटो पाहता पाहता त्या सात-आठ वर्षे मागे गेल्या. आठवणींचे पाऊसथेंब टप् टप् बरसू लागले. त्या आठवणींच्या श्रावणधारा कधी झाल्या कळलंच नाही. आठवणी या वारूळातल्या मुंग्यांसारख्या असतात. किती आहेत याचा बाहेरून अंदाज येत नाही पण एक निघाली की पाठोपाठ अनेक बाहेर निघत राहतात!

लक्ष्मीनं त्यांना जागं केलं, "माई, मी निघते बरं का! दोन वाजून गेले, घरी मुलं वाट बघत असतील आणि कटाची आमटी तुम्हाला हवी तशी झाली की नाही बघा ! आणि वाढताना गरम करा परत. तुपाच्या भांड्यात तुप काढायचंय…” लक्ष्मी जाऊन बराच वेळ झाला तरी माई अल्बमच बघत होत्या …शेवटी पोटात कावळे कोकलू लागले तेव्हा ‘कुठे पोचली मंडळी? कदाचित, रविवार म्हटल्यावर आठवड्याची कामं काढून बसले असतील. वेळ झाल्यावर संध्याकाळी जाऊ असं म्हणाले असतील. बहुतेक!' आपलेच विचार पटल्यासारख्या माई गुडघ्यावर हात ठेवून उठल्या. ताटात काहीबाही वाढून घेत त्या चिवडत चिवडतच जेवल्या. ‘ पुरणपोळ्या संध्याकाळीच मुलांबरोबर खाऊ ‘… असे म्हणत त्यांनी हॅाटपॅाट नीट बंद केला, सगळे आवरून, खोबऱ्याचा रस फ्रीजमध्ये ठेवून त्यांनी पाठ टेकवली.

जरा डोळा लागतो न लागतो तोच फोनची रिंग वाजली. ताडकन् उठत त्या फोनकडे धावल्या. ‘परेशचा फोन!!…आता नुकतेच सहा वाजले असतील तिथे, पण याला धीर धरवेल तर ना?’ असं बडबडत उत्साहाने त्या फोनकडे गेल्या. रिसीव्हर कानाला लावला. "हॅलो !!झोप मोड झाली का माई? अहो, आज सोसायटीची मिटींग आहे…वर्षाचे पैसे पण भरायचे आहेत. तुमचे पण भरायचे आहेत ना?…येऊ न्यायला?" पलीकडून शेजारची पुष्पा बोलत होती. “ नको,  मी बघते नंतर !! …” तुटकपणे बोलून माईंनी  रिसीव्हर खाली ठेवला. परत गादीवर पडल्यावर कधी झोप लागली कळलच नाही…

जाग आली तेव्हा पाच वाजले होते. घड्याळ पाहून त्या ताडकन उठल्या …'बाई गं ! किती गाढ झोप लागली! फोन येऊन गेला की काय ?’  त्यांनी कॉलर आयडी चेक करून पाहिला. शेवटचा फोन पुष्पाचाच  होता. ‘अरे बापरे!! काय वेळ घालवतेय मी!!’ माईने फ्रेश होऊन, साडी नीट केली. केक फ्रीजमधून बाहेर काढून ठेवला. चहा करून घेतला. गॅलरीतल्या खुर्चीवर बसुन चहा प्यायला. बराच वेळ गेला. आत येऊन त्यांनी टीव्ही चालू केला. अनु केदार आले तर चुकामुक व्हायला नको म्हणून त्या आज फिरायला गेल्या नाहीत. परत एकदा फोनकडे जाऊन त्यांनी रिसिव्हर सारखा ठेवला आहे की नाही ते पण पाहिलं. इतक्‍यात बेल वाजली. लगबगीन  माईने दार उघडलं, दारात  शेजारच्या कामत वहिनी. "माई, अहो आज फिरायला येणार नाही का? बरं वाटत नाही का? अगंबाई! कुठं बाहेर निघालात?” आस्थेने चौकशी करत कामत वहिनी टेकल्या. माई त्यांना बस म्हणाल्या असत्या, पण आज मुलं येणार होती व ते क्षण तिला भरभरून घ्यायचे होते. त्यांचं लक्ष नाही हे कामत वहिनींच्या लक्षात आलं  त्याही पटकन उठल्या.

साडेसहालाच माई दिवा लावायला उठल्या. दिवा लावल्यानंतर त्यांना हायसं वाटलं, मुलं आली की निवांत गोष्टी करता येतील. रोजच्या सिरियल्स पाहतानाही त्यांचं लक्ष नव्हतं. नऊ वाजता  त्यांनी गॅलरीत पाचवी फेरी मारली. खाली नेहमीच्याच गाड्या होत्या. ‘रात्रीचंच सरप्राइज द्यायचं ठरवलं वाटतं लबाडांनी!!’ चपाती व बटाट्याची भाजी खाऊन त्या टीव्ही जवळ बसल्या. ‘मुलं आल्यावर आग्रह करून एकतरी पुरणपोळी खायला लावतीलच, आजकाल जास्त खाणं पचतं  कुठे??’

दहा वाजल्यावर पेंगुळलेल्या डोळ्यांनी माई सोफ्यावरच डुलक्या घेऊ लागल्या. झोप अनावर झाली तेव्हा त्यांनी दारे खिडक्या लावून घेतल्या. मुख्य दरवाजावर मात्र त्या चिठ्ठी लावायला विसरल्या नाहीत. ‘मला उठवा ,मी जागीच आहे.’