चोर्ला घाटात बेळगावहून येणार ट्रक दरीत कोसळला


02nd December 2021, 12:06 am
चोर्ला घाटात बेळगावहून येणार ट्रक दरीत कोसळला

चोर्ला घाटात कोसळलेला ट्रक.

प्रतिनिधी। गोवन वार्ता       

वाळपई : चोर्ला घाट परिसर सध्यातरी धोकादायक बनू लागलेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक कठडे नसल्यामुळे वाहनांना सातत्याने अपघात होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. मंगळवारी रात्री बेळगावहून गोव्याकडे येणारा १४ चाकी ट्रक सरळ दरीत कोसळला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.       

समोरून येणाऱ्या वाहनांना वाट देत असताना हा अपघात घडला. त्या ट्रकच्या चालकाने रस्त्याच्या बाजूला गाडी घेतल्यामुळे त्याला रस्त्याचा अंदाज आला नाही व वाहन रस्त्यावरून सुमारे वीस मीटर खाली पडले. यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ट्रक चालक व इतरांनी प्रसंगावधान राखून आपला जीव वाचविला. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. 

त्या ट्रकमध्ये औद्योगिक वसाहतीमधील एका फॅक्टरीचे सामान होते. अपघातात सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त किमतीच्या सामानाचे नुकसान झाले आहे.दरम्यान, यंदा पावसाळ्यात अनेकवेळा दरडी कोसळल्यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून रस्त्यावरील माती काढून बाजूला टाकण्यात आली होती. मात्र उर्वरित माती अजूनही रस्त्यावरच आहे. यामुळे रात्री-अपरात्री वाहन चालकांना याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही माती हटविणे गरजेचे आहे.