जुने गोवेतील बांधकामाची परवानगी रद्द करा

अन्यथा जनता निर्णय घेईल : लोबो

|
26th November 2021, 12:09 Hrs
जुने गोवेतील बांधकामाची परवानगी रद्द करा

फोटो : मायकल लोबो
प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : धार्मिक, वारसास्थळांचे जतन करणे काळाची गरज आहे. जुने गोवा येथील चर्चच्या आवारातील बेकायदा बांधकामाची परवानगी दोन दिवसांत रद्द करावी. नाही तर जनता त्यावर निर्णय घेईल, असा इशारा मंत्री मायकल लोबो यांनी दिला. हडफडे येथील सात खुरीस चॅपेलच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वक्तव्यावरून त्यांनी जुने गोवा प्रकरणात उडी घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
वारसास्थळांवरील अतिक्रमणाविरोधात चळवळ सुरू आहे. जुने गोवा येथे लोक साखळी उपोषणाद्वारे लढा देत आहेत. त्यांनी हाक दिल्यास ३ लाख लोक जमा होतील. तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी काळजी घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर हा विषय निकाली काढून सदर जागा पूर्वपदी आणून द्यावी. लोकांनी या बेकायदा प्रकाराच्या विरोधात संघटित व्हावे, असेही मंत्री लोबो म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी अशा बेकायदा गोष्टींना पक्ष पाठबळ देत नसल्याचे आपल्याला सांगितले आहे. याविषयी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. धार्मिक व वारसास्थळांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहू. या बांधकामास नगर नियोजन खाते व किनारी भाग व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री हे बेकायदा बांधकाम पाडण्याचा आदेश देतील, असा आपल्याला विश्वास आहे, असेही लोबो म्हणाले.