डॉ. मंजुनाथ देसाई : एक अविस्मरणीय जीवन प्रवास

कार्डिऑलॉजी डिपार्टमेंट जो हृदयरोगतज्ज्ञ विभाग आहे, तो विभाग सुसज्ज बनविण्यासाठी त्यांच्यामध्ये नावीन्यपूर्ण बदल घडविण्यासाठी डॉ. मंजुनाथ आणि इतर डॉक्टर्सचा अनुभव कामी आलेला आहे.

Story: . उषा दीपक नार्वेकर । (सहाय्यक लेखा अधि� |
25th November 2021, 11:19 pm
डॉ. मंजुनाथ देसाई : एक अविस्मरणीय जीवन प्रवास

माझ्या आयुष्यात अनेक व्यक्तिमत्त्वे संपर्कात आली. काही व्यक्तिमत्त्वे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारी. कलाकार, पत्रकार, अधिकारी, डॉक्टर्स वगैरे माझ्या संपर्कात आले. पण एक व्यक्ती अशी माझ्या संपर्कात आली की, ज्याची आठवणच चिरस्मरणीय ठरणार आणि ज्यांनी आपल्या जीवन प्रवासात वेगळं असे कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं, ती व्यक्ती म्हणजे आमचे सर्वांचे प्रिय असे डॉ. मंजुनाथ देसाई. डॉ. मंजुनाथ हे नाव घेताच अंगामध्ये एक स्फूर्ती येते. त्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून रुग्णांसाठी आपल्या जिवाची पर्वा न करता, अमोल असे कार्य केलेले आहे. त्यांच्या अद्भुत कार्याला तोड नाही. माझी जेव्हा गोवा मेडिकल कॉलेजमध्ये नेमणूक झाली, तेव्हापासून कार्यालयीन कामासाठी अनेक डॉक्टरांशी संपर्क आला. इंटर्न, ज्युनियर रेसिडेन्ट, सिनियर रेसिडेन्ट, असिस्टंट प्रोफेसर्स, लेक्चरर, नर्सेस व इतर संपूर्ण कर्मचारी वर्ग यांच्याशी स्नेहसंबंध वृद्धिंगत होत गेले.            

डॉ. मंजुनाथ यांची भेट म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. त्यांच्या एडमिनिस्ट्रेटीव व त्यांच्या कार्डिऑलॉजी विभागातील कामगार व स्टार्फ नर्सेस यांच्या पगारासाठी त्यांनी माझ्याकडे सर्वात प्रथम संपर्क साधला होता. त्यांच्या पगारात उशीर का होतो हे अभ्यासानंतर मी त्यांना लगेचच संपर्क साधून माहिती दिली होती. तेथून ओळख वाढत गेली. जेव्हा जेव्हा डॉक्टर मंजुनाथनी कामे सांगितली, तेव्हा तेव्हा ती मी लगेचच डॉक्टरांना माहिती द्यायचे. मला आठवते की एक दिवस डॉ. मंजुनाथ कॅबिनमध्ये आले आणि तेथील काम पाहून सहजच म्हणाले, अरे बापरे, तुमची कामे पाहून असे वाटतेय की आम्हीच बरे आहोत. पहा किती हा त्यांचा साधा स्वभाव. किती प्रेमळ होते आमचे हे डॉक्टर. डॉ. मंजुनाथ म्हणजे आश्वासक असे डॉक्टर होते. त्यांना कधी चिडलेले पाहिलेच नाही. थंड स्वभावाचे, निरंतर रुग्णांवर ध्यान, काळजी घेणारे, आपल्याच प्रोफेशनात गुंग झालेले. सगळेच काळजाचे रुग्ण फक्त आणि फक्त डॉ. मंजुनाथांनाच शोधायचे. त्यांच्याचकडून ऑपरेशनची तारीख घ्यायला बघणारे. ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर्सना ठराविक तासांच्या वर काम करता येत नाही, तर हे आमचे डॉ. मंजुनाथ नऊ, दहा तासांच्या वर काम करायचे असे ऐकण्यात येते. ते खरोखरच सामान्य जनतेसाठी देवदूतच होते. त्यांच्याकडे रुग्ण तपासायला गेला की तो रुग्ण त्यांच्या सांगण्यानेच अर्धा बरा व्हायचा. मग त्यांचे जे काही चेकिंग, तपासणी असायची ते व्यवस्थितपणे करायचे. त्यांच्या हाताला एवढा गुण होता की, पेशंट लगेच बरे होऊन घरी जायचे. हृदयरोगतज्ज्ञ विभागाचे ते प्रमुख होते. ऑफिसमध्ये त्यांना हा लहान तो मोठा असा भेदभाव त्यांनी कधी केला नाही. त्यांना वेळ नसतानाही ‘‘बरे मुगो’’, ‘‘बरो मरे’’  अस मंजुळ आवाजात उजवा हात हालवून प्रेमाने वेळ काढून सगळ्यांची विचारपूस करायचे. ते खरेच सामान्य व्यक्ती नव्हतेच. म्हणून डॉ. मंजुनाथ हे गोव्यातील प्रतिथयश आणि यश संपादन करणारे डॉ. आहेत असे सर्वांना वाटते. 

 डॉ. मंजुनाथांचे स्नेही डॉक्टरांकडेही चांगले संबंध होते. डॉ. गुरुप्रसाद नाईक हे सुद्धा बऱ्यापैकी हृदयरोगतज्ज्ञ आहेत. नेहमीच हसऱ्या चेहऱ्याचे. डॉ. अमर प्रभुदेसाई, डॉ. जॉयल कार्डोझो, डॉ. जगन्नाथ कोलवाळकर, सी.व्ही.टी.एस.चे प्रमुख डॉ. शिरीष बोरकर वगैरे आपलं काम खुप इमानदारीने करणारे मी स्वत: पाहिलेले आहे. कार्डिऑलॉजी डिपार्टमेंट जे हृदयरोगतज्ज्ञ विभाग आहे, तो विभाग सुसज्ज बनविण्यासाठी त्यांच्यामध्ये नावीन्यपूर्ण बदल घडविण्यासाठी डॉ. मंजुनाथ आणि इतर डॉक्टर्सच्या अनुभव कामी आलेला आहे. 

परदेशात जाऊन पूढचं शिक्षण घेऊन ‘गोल्ड मॅडल संपादन केलेले आमचे डॉ. मंजुनाथ. खुपच हुशार, खुपच कष्टाळू. असे ऐकण्यात येते की ऑपरेशन करून घरी गेल्यावर जर का त्यांना फोन आला, तर ते परत हॉस्पिटलमध्ये यायचे व रुग्णांना तपासायचे. एकदा असे झालं की, डॉ. मंजुनाथजींनी कर्मचाऱ्याला फोन केला. तो फोन न लागल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्या कर्मचाऱ्याला त्यांनी आपला स्वत:चा मोबाईल दिला आणि जेव्हा जेव्हा डॉक्टर फोन करतील, तेव्हा तेव्हा हजर राहण्यास सांगितले. आता तो कर्मचारी मोबाईल पाहून डॉ. मंजुनाथांची आठवण काढून रडतो. कार्डिओलॉजीतले सगळेच स्टाफ, कर्मचारी मेहनती. डॉ. मंजुनाथ यांनी त्या सगळ्यांना कामाची सवय लावली होती. जेव्हा ते आजारी होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर कधी आजारपण दिसलेच नाही. मुख्य अतिथी म्हणून जर का कार्यक्रमाला बोलवलं तरी ते दुसऱ्यांना बरं वाटते म्हणून जायचे व त्यांच्या येण्याने सगळे लोक खूष व्हायचे. स्वत: ते चंदनासारखे झिजले, दुसऱ्यांना सुख देण्यासाठी.            

हल्लीच वाचनात आले की, बोरी गावचा रस्ता आहे, त्याला डॉ. मंजुनाथ देसाईंचे नाव देण्यात येणार आहे. तेथील पंचायतीचा हॉल आहे, त्यालाही डॉ. मंजुनाथ देसाई यांचे नाव देण्यात येणार आहे. कार्डिऑलॉजी विभागाला डॉ. मंजुनाथ देसाई यांचे नाव द्यावे असा प्रस्तावही येत आहे. गोव्यातील किती तरी लोकांनी व हितचिंतकांनी डॉ. मंजुनाथ यांच्यावर प्रसारमाध्यमातून लेख लिहिलेले आहेत व त्यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. डॉ. मंजुनाथ देसाई निघुन गेले पण त्यांच्या जाण्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्डिऑलॉजी विभागात न भरून देणारी पोकळी निर्माण झाली आहे. सर्वांची मायेने व आपुलकीने विचारपूस करणारे, सर्वांना हवेहवेसे वाटणारे डॉ. मंजुनाथ देसाई म्हणजे एक स्वप्नवत व्यक्तिमत्त्व होतं.