माझी प्रेरणा माझे बाबा

माझे बाबा म्हणजे आमचा अदृश्य असा कणाच आहे. त्यांच्या हसतमुखी चेहऱ्यामुळे नवीन गोष्टी करण्याचा विश्वास येतो. अशा माझ्या बाबांबद्दल जेवढं म्हणून लिहावं तेवढं कमीच.

Story: माझे बाबा । इंदू लक्ष्मण परब, मेणकूरे |
20th November 2021, 12:01 am
माझी प्रेरणा माझे बाबा

‘संकट काहीही येवो, त्या संकटाला तोंड द्यायचे' असं लहानपणीच बाबांनी मला शिकवलं. घरात सगळ्यात मोठा मुलगा असलेला माझा बाबा जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा सगळ्यात लहान बनला. सगळ्यात मोठा मुलगा म्हणजे अनेक गोष्टींना सामोरे जावेच लागते. बाबा धरून ती ४ भांवडे. एक आत्या म्हणजे बाबांची बहिण व २ काका म्हणजे बाबांचे भाऊ. पूर्वी , म्हणजे बाबांच्या लहानपणी सर्वजण साधारण पन्नास साठ लोक एकत्र वावरायचे. आता सगळेच वेगळे झाले.   

०१ जुलै, १९६५ मध्ये माझ्या बाबांचा जन्म झाला. त्यावेळी माझ्या आजोबांचे बाबा वारलेले ,त्यामुळे त्यांचे नाव बाबांना ठेवण्यात आले. लक्ष्मण नामदेव परब, पण कुणीच त्यांना लक्ष्मण म्हणत नसत. बाबांच्या आजोबांना 'मा' म्हणत असत त्यामुळे नावाबरोबर त्यांना 'मा' पण म्हटलं जाऊ लागलं. अर्थातच अजूनही म्हणतात.  लहानपण म्हटलं तर अगदीच कष्टाळू. परिस्थिती हालाखीची नव्हती, पण वडिलोपर्जित जमीन असल्याकारणाने शेती करणे भागच होते. लहान वयातच शेती शिकले, माड, पोफळी, अगदी केळीचीही लागवड केली. शिक्षण म्हटलं तर जेमतेम दहावी झाली, कारण शेतीमध्ये लक्ष घालून अभ्यास करणं त्यांना जमलं नाही. पण ते जे काम करतात ते काम अगदी चोखपणे करतात. 

बाबांना शिवणकामाची खूप आवड होती ,त्यामुळे शाळा संपल्यावर त्यांनी शिवणकाम करण्यास सुरुवात केली. सुरूवातीला गावतच एकजण शिवणकाम करत असत, त्यांच्याकडे जाऊन ते काम शिकू लागले. नंतर ते स्वतः शिवू लागले. पुढे ते म्हापशाला कपडे शिवू लागले. मेणकूरेहून रोज रोज म्हापश्याला जाणे परवडत नसे , त्यामुळे त्यांनी घराकडेच कपडे शिवायला सुरुवात केली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण त्या सगळ्या अडचणींवर मात करून बाबांनी स्वतःची ओळख निर्माण केली. नीटनेटकं काम व शिलाईसुध्दा अप्रतिम , त्यामुळे लोक बाबांकडे कपडे घेऊन येत असत . अनेकजण बाबांकडे आजही येतात, कारण त्यांना बाबांचे शिवणकाम फार आवडतं. बाबांना शेतीचीही आवड आहे. मिरच्या , हळसांदे, चवळी अशा प्रकारची वेगवेगळी पिकं घेतात. 

बाबांचं लग्न झालं . त्यामुळे जबाबदाऱ्या वाढल्या. पण कधीच आपल्याकडे हे नाही, ते नाही, अशी रडगाणी कुणालाच ऐकवली नाही; की कोणाकडे काही मागितले नाही. माझा जन्म तर त्यांच्यासाठी आनंदाची पर्वणाच होता . कारण ते सर्वात मोठे असूनही माझ्यासाठी नेहमी लहान बनत गेले. काही हवं नको ते आपल्याकडे काही असो वा नसो काही कमी पडू दिलं नाही. घरात मी मोठी व एकूलती एक .  त्यामुळे माझ्याबरोबर खेळायला कोणच नसे. मग  मी बाबांकडे बसत असे. त्यांची एक खुर्ची होती. त्या खुर्चीला पाटीप्रमाणे जागा होती तिथे ते मला बाराखडी लिहायला बसवत. बालवाडी ,केजीमध्ये ते मला पोहचवायला येत ते पण उचलून घेऊन. त्यांनी माझी अजूनही केजीची पुस्तकं जपून ठेवली आहेत. 

बाबा म्हणजे सगळ्यांचीच आवडती व्यक्ती. तसेच ते कडक शिस्तीचे. एकदा काय त्यांना  राग आला ,की मग  कोणाचीच त्यांच्यासमोर जाण्याची हिंमत होत नाही. पण स्वभावाने खूपच भाबडे..स्वतः त्यांना शिक्षण घेता आलं नाही, पण आम्हाला त्यांनी शिकवलं . कोणत्याच गोष्टीला नाही म्हटलं नाही. त्यांच्या शब्दाबाहेर आम्ही कधी गेलो नाही पण कुठेही जायच्या अगोदर जातो म्हणून सांगितलं तर कधीच नाही म्हटलं नाही. आमच्या घरात कुणीच माझ्यापूर्वी नाटकामध्ये काम केलं नव्हतं. माझ्यातली आवड पाहून त्यांनी मला नाटकात काम करू नको म्हणून कधीच सांगितले नाही. किंवा लोक काय म्हणतील याचा विचार केला नाही. मला प्रोत्साहन देतच गेले.माझ्यामध्ये वाचनाची आवडही त्यांच्यामुळेच आली. ते पेपर आणत व तो पेपर मला मोठ्याने वाचायला लावत, त्यामुळे आपोआपच माझ्यात  वाचनाची आवड निर्माण झाली. 

मी जे काही माझ्या आयुष्यात आजपर्यंत करू शकले, ते माझ्या आईबाबांच्या मिळालेल्या पाठिंब्यामुळे, त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे. बाबांना कधीच आम्ही आजारी पडलेलं पाहिलं नाही. मे महिन्यात ते ही पाहायला मिळालं आणि सर्वच जण घाबरून गेलो . विंचू चावला म्हणून निमित्त आणि अजूनही ते बरे झाले नाहीत. आम्ही सगळेच घाबरलो . कारण अचानक असं घडलं की काय करायचे ते सुचतच नाही आणि बाबांना असं काहीतरी होणार हा कोणाच्याच मनात विचार आला नाही.  ते दिवस आठवले म्हणजे अंगावर अजूनही काटा उभा राहतो. तरी पण ते खचले नाहीत. प्रत्येक संकटांना ते सामोरे गेले. 

माझे बाबा म्हणजे आमचा अदृश्य असा कणाच आहे. त्यांच्या हसतमुख चेहऱ्यामुळे नवीन गोष्टी करण्याचा विश्वास येतो. अशा माझ्या बाबांबद्दल जेवढं म्हणून लिहावं तेवढं कमीच. आईबद्दल आपण  खूप लिहितो, खूप बोलतो पण बाबांबद्दल आपण  व्यक्त होऊ शकत नाही. आई हा  घराचा  पाया असला तरी बाबा घराचं छप्पर आहे, कारण बाबांशिवाय आपण काहीच नाही. घराला घरपण बाबांंमुळेच येतं.