वास्को स्पोर्ट्स क्लबची वेळसाववर मात


28th October 2021, 11:51 pm
वास्को स्पोर्ट्स क्लबची वेळसाववर मात

पणजी : कर्णधार फ्रानिस्को फर्नांडिसच्या दोन गोलांच्या जोरावर वास्को स्पोर्ट्स क्लबने सेल्वल गोवा प्रोफेशनल लीगच्या सामन्यात वेळसाव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबचा ४-२ गोलने पराभव केला. हा सामना धुळेर स्टेडियम, म्हापसा येथे गुरुवारी खेळवण्यात आला होता.
फ्रान्सिस्कोव्यतिरिक्त विजेत्या संघातर्फे अॅल्सन फर्नांडिस आणि सॅवलॉन फर्नांडिस यांनी गोल केले तर पराभूत संघातर्फे शेल्डन परेरा आणि वेलिटो क्रुझ यांनी प्रत्येकी एक गोल केला.
वास्को एससीने सामन्याला आक्रमक सुरूवात केली. केविन लोबोने बाक्सच्या आतून मारलेला एक फटका वेळसावचा गोलरक्षक जीत गुप्ताने अडवत चेंडूला कॉर्नरमध्ये ढकलले. सामन्याच्या ३ऱ्या मिनिटाला वेळसावच्या बचावपटूने दिलेल्या पासमुळे वेळसाव संघात खळबळ माजली. त्याचा पास गोलरक्षकाच्या डोक्यावरून गेला मात्र चेंडू गोलपोस्टमध्ये जाण्यापासून वाचला आणि वेळसावने सुटकेचा नि:श्वास सोडला.
वेळसावने ३४व्या मिनिटाला शेल्डन परेराच्या गोलच्या जोरावर डेडलॉक तोडण्यात यश मिळवले. वेलिटोची फ्री किक बाक्सच्या बाहेर घालवण्यात वास्को एससीच्या कुलदीपला यश आले मात्र हा चेंडू शेल्डनसमोर गेला व त्याने या संधीचा फायदा घेत आपल्या संघासाठी पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.
वास्को एससीने दुसऱ्या सत्रात जोरदार मुसंडी मारली. ५२व्या मिनिटाला वास्कोच्या संघाने ‘सेट-पीस’वर बरोबरी साधली. फ्रान्सिस्कोने दिलेल्या पासवर अॅल्सन परेराने शानदार हेड करत बरोबरीचा गोल केला.
सामन्याच्या ५८व्या मिनिटाला वास्कोने फ्रान्सिस्को फर्नांडिसच्या गोलच्या जोरावर सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. ही आघाडी मात्र केवळ चारच मिनिटे टिकू शकली. वेळसावने ‘सेट-पीस’वर बरोबरी साधली व सामना २-२ असा बरोबरीत आणला.
वेळसावने गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्या व याचा फटका त्यांना बसला. वास्कोतर्फे सॅवलोन फर्नांडिसने गाेल करत आपल्या संघाला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली तर ८१व्या मिनिटाला फ्रान्सिस्को फर्नांडिसने आपला दुसरा तर संघाचा चौथा गोल करत वास्कोला ४-२ असा विजय मिळवून दिला.