‘गोवन वार्ता’चा दिवाळी अंक उद्यापासून बाजारात

१६८ पानांचा संपूर्ण अंक ग्लेझ स्वरूपात होणार उपलब्ध


28th October 2021, 11:00 pm
‘गोवन वार्ता’चा दिवाळी अंक उद्यापासून बाजारात

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दिवाळी अंकांच्या परंपरेत अल्पावधीतच स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केलेला ‘गोवन वार्ता’चा दिवाळी अंक शनिवारपासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. ‘गोवन वार्ता’ने यंदा प्रथमच १६८ पानांचा संपूर्ण दिवाळी अंक ग्लेझ स्वरूपात वाचकांसाठी उपलब्ध करून दिला असून, अंकाच्या माध्यमातून गोव्याचे अंतरंग उलगडण्याचा, तसेच गोव्यातील दिवाळी अंकांची परिभाषा बदलून टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
गेली सुमारे दीड वर्षे करोना महामारीच्या अंधाऱ्या काळातून बाहेर पडत असलेला गोवा मुक्तीचा हिरकमहोत्सव साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर, ‘गोवन वार्ता’ने विविध क्षेत्रांतील गोव्याच्या श्रीमंतीचा आढावा या दिवाळी अंकाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ पत्रकार गंगाराम म्हांबरे, पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर, प्रसिद्ध लेखिका पिरोज नाईक, प्रीती केरकर, पत्रकार किशोर नाईक गावकर, कविता आमोणकर, प्रा. सदानंद मळीक आदींच्या लेखांतून गोव्याची समृद्धी वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रा. नीलेश बोर्डे यांनी लेखन केले असून, माजी आयएएस अधिकारी दौलत हवालदार यांनी चार्ली चॅ​प्लिनच्या प्रसिद्ध पात्राचा प्रवास उलगडला आहे. डॉ. मधू घोडकिरेकर यांचे ‘करोना’चे मनोगत, महेश धर्माधिकारी यांनी घेतलेली प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेची मुलाखत, कर्नल (निवृत्त) अनिल आठल्ये यांनी घेतलेला तालिबानी धसक्याचा वेध, पत्रकार सचिन खुटवळकर यांचे दाक्षिणात्य सिनेसृष्टीसंदर्भातील सखोल विश्लेषण आणि सचिन दळवी यांनी घेतलेल्या क्रीडा क्षेत्राच्या आढाव्यातून वाचकांना विविधांगी साहित्याचे दर्शन या दिवाळी अंकातून होणार आहे.
‘सैराट’फेम नागराज मंजुळे, योजना यादव, अजय कांडर, दत्तप्रसाद जोग, परेश नाईक, डॉ. प्रा. जयप्रभू कांबळे आदींसह गोवा आणि गोव्याबाहेरील दिग्गज कवींच्या दर्जेदार कविता अंतर्मुख करायला लावणाऱ्या आहेत. तर, दामोदर मावजो, रमेश घाडी, चंद्रकांत गावस आणि दयाराम पाडलोस्कर यांच्या कथांनी दिवाळी अंकाची उंची आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
.................................
दमदार विषय आणि कसदार आशयाद्वारे वाचनप्रेमींना दिवाळीच्या फराळासोबतच मेंदूलाही सकस खाद्य देण्याचा प्रयत्न ‘गोवन वार्ता’ दिवाळी अंकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यामुळे गोवा आणि गोव्याबाहेरील वाचकांकडून अंकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास ‘गोवन वार्ता’चे संपादक पांडुरंग गावकर यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा