कोविडच्या दहशतीतून दिलाशाकडे

रोज जेवढे रुग्ण सापडत आहेत, त्याच्या दुप्पट बाधित बरे होत आहेत. ही स्थिती अशीच सुधारत राहिली तर दिवाळीपर्यंत रोज सापडणाऱ्या रुग्णांची संख्या आणि सक्रिय रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल.

Story: अग्रलेख |
28th October 2021, 12:34 am
कोविडच्या दहशतीतून दिलाशाकडे

कोविडची दुसरी लाट ओसरतेय, असे म्हणण्याइतपत सकारात्मक चित्र सध्या आहे. दिवसाला तीन हजाराच्या आसपास चाचण्या होतात आणि अवघे पन्नासहून कमी नवीन रुग्ण आढळतात, अशी स्थिती सहा ते सात महिन्यांनंतर आलेली आहे. कोविडच्या इतर व्हेरिएन्टचा प्रभाव राहिलेला नाही किंवा कोविडच्या इतर प्रकारांतील रुग्ण सापडत नाहीत. गेल्या आठ दिवसांत रुग्णसंख्या ही फारच कमी होत गेली आहे. कोविडच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने राज्याचे जे अतोनात नुकसान केले, जे बळी घेतले, त्यामुळे प्रचंड दबावाखाली असलेल्या राज्याला आताचे हे चित्र काहीसे दिलासादायकच म्हणावे लागेल. दुसरी लाट पूर्णपणे ओसरत चालल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण, अजूनही कोविडमुळे बळी जाण्याचे प्रमाण शून्य झालेले नाही. आठवड्यातील एक-दोन दिवस कोविडचा बळी नसला तरी एखाद्या दिवशी तीन चे चार बळी जाण्याचे प्रकारही घडत आहेत. तेवढी स्थिती नियंत्रणात येण्याची गरज आहे आणि मृत्यूदर शुन्यावर यावा लागेल.
गोव्यात आतापर्यंत १,७७,९६९ जणांना कोविडची लागण झाली आहे. त्यातील ३,३६३ जणांचा कोविडने बळी घेतला आहे. राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा प्रचंड मोठा आहे. गोव्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवल्यानंतर अनेक घरांना फटका बसला. अनेकांच्या घरातील मिळकतीचे हात गेले. अनेकजण निराधार झाले, तर काही कुटुंबांनी एकापेक्षा जास्त लोकही गमावले. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक बळी गेले. एप्रिल महिन्यात गोव्यात कर्फ्यू लागू केल्यामुळे लोकांवर काही प्रमाणात निर्बंध आले. ज्यातून कोविडचे रुग्ण कमी होण्यास मदत झाली. पण, सलग काही महिने रोज सक्रिय रुग्ण हे हजारोंच्या संख्येत असायचे. ती संख्या ऑक्टोबरच्या मध्यानंतर कमी-कमी होत आता पाचशेच्या खाली आली आहे. विशेष म्हणजे रोज नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण गेल्या पाच दिवसांपासून तीसच्या आसपास आहे. रोज जेवढे रुग्ण सापडत आहेत, त्याच्या दुप्पट बाधित बरे होत आहेत. ही स्थिती अशीच सुधारत राहिली तर दिवाळीपर्यंत रोज सापडणाऱ्या रुग्णांची संख्या आणि सक्रिय रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल. सध्या दररोज तीन हजाराच्या आसपास कोविडच्या चाचण्या होतात. आतापर्यंत गोव्यात १४.५८ लाख चाचण्या झाल्या आहेत. सरकारी पातळीवर मधल्या काळात हलगर्जीपणा झाल्यानंतर सरकारने कोविडला पराभूत करण्यासाठी जे प्रयत्न सुरू केले, ते अजूनही सुरू आहेत. हळूहळू कोविडसाठीची इस्पितळे आणि कोविड निगा केंद्रे बंद केली जात आहेत. कोविडसाठी काही ठराविक ठिकाणीच उपचार केले जातात. अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जागी पाठवले जात आहे. त्यासोबतच तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठीही तितक्याच ताकदीने सरकारने तयारी ठेवली आहे.
गोव्यात आतापर्यंत २२ हजारपेक्षा जास्त मुलांना कोविडची लागण होऊन ती बरी झाली आहेत. सध्या नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. दिवाळीनंतर सरकार पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही शाळेत बोलावण्याची तयारी करत आहे. पण एक लक्षात घ्यायला हवे की, कोविड अद्यापही पूर्णत: पराभूत झालेला नाही. त्याला नियंत्रणात आणले आहे, असे म्हणावे लागेल. त्यामुळे पूर्णपणे कोविडचा धोका कमी होण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क, सामाजिक अंतर ह्या गोष्टींना प्राधान्य दिलेच पाहिजे. त्यासाठी सरकारनेही सक्रियपणे लक्ष ठेवावे.
गोव्यात आतापर्यंत ८,७९,९६३ जणांना कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. ३,५५,६०० जणांना पहिला डोस मिळाला आहे. लवकरच १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. सध्या आरोग्य खात्याकडे सुमारे २.७१ लाख एवढ्या लसी शिल्लक आहेत. दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांनी वेळेवर डोस घ्यावा, यासाठी सरकारकडूनही वेळोवेळी आवाहन करण्याची गरज आहे. लसीकरणाचा वेग वाढायला हवा आणि पात्र नागरिकांना लसीचे दोन्ही डोस लवकर मिळायला हवेत. लसीकरण पूर्ण झाले तर गोव्यात कोविडच्या बळींचा आकडाही कमी होण्यास मदत होऊ शकते. नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाणही खाली येऊ शकते. गेल्या पाच ते सहा दिवसांत कोविडचे रुग्ण ज्या प्रकारे कमी होत आहेत, ते पाहता कोविडच्या दहशतीतून दिलाशाकडे गोव्याचा प्रवास सुरू आहे. सर्वांनी दक्षता घेतल्यास सक्रिय रुग्णांचे प्रमाण लवकरच दोन आकड्यांमध्ये येऊ शकते.