शोएब अख्तरची लाईव्ह टीव्ही शोमधून हकालपट्टी


27th October 2021, 11:55 pm
शोएब अख्तरची लाईव्ह टीव्ही शोमधून हकालपट्टी

शोएब अख्तर

कराची : युएईमध्ये टी-२० वर्ल्डकपला सुरुवात झाल्यापासून पाकिस्तानी क्रिकेट संघ सातत्याने चर्चेत येत आहे. पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरला एका वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या चर्चेतून बाहेर जाण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानमधील पीटीव्ही या वृत्तवाहिनीवर शोएब अख्तर आणि अनेक माजी क्रिकेटपटू चर्चेत सहभागी झाले होते. यात व्हिव्हिएन रिचर्ड्स, सना मीर आणि अन्य लोक होते. या चर्चेचे अँकर डॉ. नौमान नियाज करत होते. चर्चेत शोएब शाहीन आफ्रीदी, हारिस राऊफ या खेळाडूंसंदर्भात काही मुद्दे मांडत होता. तेव्हा डॉ. नौमान यांनी लाईव्ह कार्यक्रमातच त्याला अपमानित केले. 'तू थोड्या सभ्यतेनं बोल. मला हे बोलण्याची इच्छा नाही, पण तू स्वत:ला ओव्हरस्मार्ट समजत असशील तर या कार्यक्रमातून निघून जाऊ शकतोस. मी तुला हे ऑन एअर सांगत आहे, असे सुनावले. हा सर्व प्रकार लाईव्ह कार्यक्रमात झाला. डॉ. नौमान यांनी त्यानंतर अख्तरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत इतरांना प्रश्न विचारले आणि कार्यक्रमात ब्रेक घेतला. ब्रेकनंतर अख्तरने हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला पण, नौमान यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. अखेर मी पीटीव्हीमधून राजीनामा देत आहे, असे सांगत अख्तर बाहेर पडला. दरम्यान, शोएब अख्तरने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आणि त्यानंतर स्वत:चे मत सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्याने डॉ. नौमान यांना माफी मागण्यास सांगितले आहे. परदेशी खेळाडूंसमोर माझ्या सोबत असे झाले. जे माझ्यासाठी फार वाईट होते. मी एक नॅशनल स्टार आहे. पण ज्या पद्धतीने मला वागवले गेले ते चुकीचे होते. रिचर्ड्स आणि डेव्हिड गोव्हर यांच्या समोर मला अशी वागणूक दिली गेली, जी योग्य नव्हती.