क्रीडाक्षेत्रातून वेगळी वाट शोधणारी 'रिहा'

" जे आहे त्यावर विश्वास ठेवा. आयुष्य अनेक संधींनी भरलेले आहे, ती संधी मिळवा आणि त्याचा सर्वोत्तम वापर करा. चढ -उतार असतील पण लक्षात ठेवा काहीही सोपे नाही, संघर्ष खरा आहे."

Story: मार्ग नवा, ध्यास नवा । सुश्मिता मोपकर |
23rd October 2021, 11:41 Hrs
क्रीडाक्षेत्रातून वेगळी वाट शोधणारी 'रिहा'

लहानपणापासूनच रिहा शिंदे हिला नृत्याची आवड. म्हापसा येथील सेंट मेरी विद्यालयात तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. सेंट झेवियर्स महाविद्यालयातून बी.कॉम.ची पदवी मिळवली. सुरक्षा महत्त्वाची असल्याने तिने लहानपणापासूनच ज्युडो, कराटे, क्रेव्ह माका सारख्या खेळांत सहभाग नोंदवला. आर.व्ही. शिंत्रे यांच्याकडून सहावीपासून ती ज्युडोचा सराव करत आहे. तिने ज्युडोमध्ये अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे आणि या खेळात अनेक पदके जिंकली आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, केरळ येथे राष्ट्रीय स्तरीय शालेय खेळ ज्युडो स्पर्धेत शाळेचे प्रतिनिधित्व केले. 

महाविद्यालयात तिला एन.एस.एस.चा भाग होण्याची संधी मिळाली. तिच्या बहिणीला एन.सी.सीच्या माध्यमातून २६ जानेवारीच्या परेडसाठी निवडण्यात आले होते तेव्हापासून तिलाही राज मार्गावर मार्चिंग करण्याची इच्छा होती. २०१६ मध्ये दिल्ली येथील राजपथवर (RDC) प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा भाग होण्याची संधी मिळाली. 

राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानी सांस्कृतिक कला सादर करण्याची संधी मिळाल्याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करते. इतका महत्त्वाचा आणि मेहनतीने मिळविलेला क्षण हा तिच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. प्रत्येक गोमंतकीयाने तिचे कौतुक करण्याजोगी गोष्ट म्हणजे चीनमधील आंतरराष्ट्रीय युवा विनिमय कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली, गोव्यातून फक्त दोघाजणांची निवड झाली होती. 

खेळाबरोबर रिहाने नृत्याला नेहमीच प्राधान्य दिले. विविध आंतरमहाविद्यालयीन आणि राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. शाळेत तसेच महाविद्यालयात तिला ओळखले जाण्याचे आणि आदर मिळवण्याचे स्रोत म्हणजे नृत्य आणि जुडो होते.  या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकल्याबद्धलचे श्रेय ती आपल्या आईला देते. प्रत्येक वेळी तिने दिलेल्या पाठिंब्यामुळे आपण आपल्या कलागुणांना वाव देऊ शकलो असे ती म्हणते.  ती लहान मुलांसाठी विनामूल्य नृत्य प्रशिक्षण कार्यशाळा देखील घेते, ज्यातून तिला समाधान आणि आनंद मिळतो.

गुरुंनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाने तिला योग्य वाटेने ध्येयापर्यंत जाण्यास मदत झाली. आपल्या जीवनातील गुरुंविषयी सांगताना ती म्हणते, "शाळेत मी माझ्या एन.सी.सी. शिक्षिका अरुणा पेडणेकर यांच्यापासून प्रेरणा घेतली, ज्यांनी मला प्रत्यक्षात विविध शालेय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि भाग घेण्यास प्रवृत्त केले, ज्यामुळे मला वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास मिळाला.''

माझ्या या प्रवासात शिक्षिका नम्रता मोपकर, श्री. दिलीप धारगळकर, शिक्षिका अॅनेट लोबो, शारीरिक शिक्षण शिक्षक न्यूटन यांनी मला प्रत्येक वेळी पाठिंबा आणि मार्गदर्शन केले. तिला क्रिडा क्षेत्रातून तिचे करिअर घडवायचे होते अल्रीच डिसूझा या तिच्या मित्राच्या माध्यमातून तिला डेकाथलॉनबद्दल माहिती मिळाली, जे एक क्रीडा स्टोअर आहे. तिला डेकॅथलॉनची कार्यसंस्कृती खरोखर आवडली.  म्हणून तिने 'डेकाथलॉन गोवा'चा एक भाग होण्याचे ठरवले.  आता ती २०१९ पासून तिथे कार्यरत आहे आणि तिला तिच्या ग्राहकांसोबत खेळाबद्दलचा तिचा अनुभव व्यक्त करताना, त्यांना मार्गदर्शन आणि त्यांच्यासाठी सर्वोत्कृष्ट अशी शिफारस करण्यात आनंद मिळत असल्याचे ती सांगते आहे.

युवा पिढीला संदेश देताना ती सांगते, " जे आहे त्यावर विश्वास ठेवा.  आयुष्य अनेक संधींनी भरलेले आहे, ती संधी मिळवा आणि त्याचा सर्वोत्तम वापर करा.  चढ -उतार असतील पण लक्षात ठेवा काहीही सोपे नाही, संघर्ष खरा आहे." शेवटी ती म्हणते, "लक्षात ठेवा! अपयश हे प्रगतीकडे नेणारे एक पाऊल आहे. आणि जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा सर्वकाही शक्य होते"