हाऊस ऑफ सिक्रेट्स: द बुराडी डेथ्स

१ जुलै २०१८ची ती सकाळ फक्त दिल्लीसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी धक्कादायक ठरली. ३० जूनच्या रात्री बुराडीतल्या संतनगर कॉलनीमध्ये राहणाऱ्या भाटीया कुटुंबातील ११ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. एका सुखवस्तू मध्यमवर्गीय कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा प्रकार निदर्शनास येताच दिल्ली पोलिसांनी तपासणीची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली. ही आत्महत्या होती की घातपात? या घटनेचं नक्की कारण काय? यातले दोषी कोण आणि बळी कोण असे अनेक प्रश्न या तपासकार्यात येत राहिले आणि हळूहळू त्यांचा उलगडा होत गेला. याच तपासकार्यावर आधारित असलेला एक माहितीपट ‘नेटफ्लिक्स’वर रिलीज होऊन जवळपास दोन आठवडे उलटून गेले आहेत आणि अजूनही हा माहितीपट चांगलाच चर्चेत आहे. जाणून घेऊयात त्याविषयी..

Story: मनोरंजन । प्रथमेश हळंदे |
23rd October 2021, 11:30 pm
हाऊस ऑफ सिक्रेट्स: द बुराडी डेथ्स

भाटीयांच्या घराशेजारी राहणाऱ्या गुरुचरण सिंग यांनी १ जुलैच्या सकाळी दुकान बंद असल्याचं पाहिलं आणि त्याबाबत चौकशी करण्यासाठी ते घरात गेले. त्यावेळी घरात पाहिलेलं ‘ते’ भयाण दृश्य आजही गुरुचरणजींच्या नजरेसमोरून हटत नाही. आपल्यासमोर जे धक्कादायक चित्र उभं आहे ते खरंच आहे की खोटं याचा विचार करण्यातच वेळ गेला, असं पोलीसांना या घटनेची माहिती देणारे शेजारी कुलदीप सिंग सांगतात. पोलीस घटनास्थळी पोहोचायच्या अगोदरच तिथे शोकाकुल शेजाऱ्यांची गर्दी जमली होती. पहिल्या माळ्यावर असलेल्या त्या खोलीच्या छताला असलेल्या जाळीला ओढण्या बांधल्या होत्या आणि त्यांच्या मुळाशी लटकत होता संपूर्ण भाटीया परिवार... गळफास घेतलेल्या या चार पुरुष आणि सात स्त्रियांमध्ये लहान मुलेही होती. आतल्या खोलीत एक वृद्ध महिला गळफास लावलेल्या अवस्थेत जमिनीवर पडली होती. गळफास लावलेल्यांचे हात वायरने घट्ट बांधले होते. काहींच्या डोळ्यांवर पट्ट्या, चेहरे झाकलेले, कान व नाकात कापसाचे बोळे असं भयावह दृश्य सामान्यांनाच काय, पोलिसांनाही हादरवून टाकणारं होतं. कसंबसं स्वतःला सावरून पोलिसांनी प्राथमिक तपासणीला सुरुवात केली. 

भाटीया कुटुंब हे मूळचं हरियाणा राज्यातल्या टोहाना गावचं. पितृसत्ताक पद्धतीनुसार या कुटुंबाचे प्रमुख भोपालसिंग भाटीया होते. २००६मध्ये त्यांचा वार्धक्याने मृत्यू झाल्यावर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या धाकट्या मुलाने, ललितने स्वीकारली. वयाने लहान असला तरी भाटीया कुटुंबाच्या आणि आप्तेष्टांच्या नजरेत ललित इतरांपेक्षा जास्त प्रगल्भ होता. ललित प्लायवूडच्या बिझनेसमध्ये सक्रीय होता तर थोरला भुवनेश घराखालीच असलेल्या किराणा मालाच्या दुकानाचं कामकाज बघत होता. भाटीया कुटुंब किती प्रेमळ, कष्टाळू आणि मनमिळाऊ आहे याची प्रचीती त्यांच्या शेजारच्यांना आली होती. अगदी राजश्री प्रोडक्शनच्या चित्रपटात शोभून दिसेल असा हा परिवार होता. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे भाटीया कुटुंबाचं वर्तन होतं. कुणाच्या अध्यातमध्यात नसलेलं पण सुखदुःखाच्या प्रसंगात अडीअडचणीला धावून जाणारं, धार्मिक आणि सालस प्रवृत्ती जपणारं, मेहनती आणि प्रामाणिक भावंडांनी उभं केलेलं, गृहकर्तव्यदक्ष गृहिणींनी सांभाळलेलं, हुशार नातवंडांनी भरलेलं हे गोकुळ एका रात्रीत अश्या प्रकारे उद्ध्वस्त झाल्याचं कळल्यावर भाटीया परिवाराशी संबंधित सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात यात घराबाहेरच्या कोणत्याही व्यक्तीचा हात असावा, अशी शंका निर्माण करणारा एकही पुरावा सापडला नव्हता. गळ्याला बसलेल्या फासातून सुटण्याचा प्रयत्न काहींनी केल्याचा स्पष्टपणे दिसत असल्याने झाल्या प्रकाराला घरातल्या सर्वांचीच मान्यता नव्हती, हेही निष्पन्न झालं. पण मान्यता नसतानाही त्याचा प्रतिकार का केला गेला नसावा हे कोडं कुणालाच उमगत नव्हतं. एव्हाना प्रकरण फार तापलं होतं. बाहेर बघ्यांची गर्दी जमली होती. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या भागाला भेट दिली. मृतांचे नातेवाईकही घटनास्थळी पोचले होते. भरीस भर म्हणून ‘करणी सेना’सारख्या संघटनेने मुख्य चौकात घोषणाबाजीही सुरु केली होती. भाटीया कुटुंबाला जवळून ओळखणाऱ्या कुणाचाही या बातमीवर विश्वास बसतच नव्हता. नुकत्याच काही दिवसांपूर्वी घरातील एका सदस्याचा साखरपुडा सोहळा संपन्न झालेला असल्याने या तपासाला आणखीनच वेगवेगळी वळणे मिळत होती. बघ्यांची गर्दी, हतबल नातेवाईकांचा आक्रोश, मृतांच्या निकटवर्तीयांकडून न्याय व सखोल तपासाची मागणी आणि पत्रकारांचा ससेमिरा चुकवत पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी मृतदेह ताब्यात घेणं सुरु केलं.

घटनास्थळी पोहोचलेल्या फॉरेन्सिक टीमने घरभर शोध घेतला तेव्हा देव्हाऱ्याजवळ ठेवलेल्या डायऱ्या त्यांच्या निदर्शनास आल्या. याच डायऱ्या आत्महत्येचं गूढ उकलणाऱ्या ठरल्या. डायरीतील मजकुरानुसार, या सर्व दुष्कृत्यासाठी ललित जबाबदार ठरत होता. ललितच्या मृत पित्याचा आत्मा त्याच्या शरीरात येऊन घरात कोणी, कधी, कसं, काय करावं याबद्दल सूचना देत असे, ज्या डायरीमध्ये लिहून ठेवल्या जात. कुटुंबाची धार्मिक वृत्ती पाहता तो आत्मा त्यांना विविध धार्मिक अनुष्ठानांबद्द्लही सांगत असे व ललितच्या तोंडून बोलणाऱ्या मृत भोपालसिंगचा शब्द प्रमाण मानून संपूर्ण भाटीया कुटुंब त्याप्रमाणे वागत असत. ही सामूहिक आत्महत्यादेखील भोपालसिंगच्या मते एक पूजाच होती. या पूजेचं नाव होतं ‘वट पूजा’, ज्यात सर्वांना स्वतःला वडाच्या पारंब्यांप्रमाणे स्वतःला लटकवून घ्यायचे होते! २००७ पासून तब्बल अकरा वर्षे हा प्रकार त्या घरात सुरु होता आणि या कालावधीत कुणीही याच्या विरुद्ध मत मांडलं नाही. कुठेही याची वाच्यता केली नाही. त्या अकरा वर्षांच्या अकरा डायऱ्या वाचून फॉरेन्सिक टीम आणि दिल्ली पोलिसांची मती गुंग व्हायची वेळ आली.

आत पोलिसांना अकरा डायऱ्या मिळाल्या असून यांचा सुसायडल नोटशी काही संबंध असण्याच्या दाट शक्यता आहेत ही खबर बाहेर जमलेल्या पत्रकारांनाही कळाली आणि चर्चांना तोंड फुटलं. अश्यातच झी न्यूजच्या प्रमोद शर्मांना घराच्या एका बाजूच्या भिंतीवर काही पाईप्स लावलेले दिसले. ते त्या पाईप्सचा फोटो काढत असताना इतर पत्रकारांमध्येही यावर चर्चा सुरु झाली. यातले सात पाईप सरळ तर चार पाईप जमिनीच्या दिशेने वळवण्यात आले होते. योगायोग असा की मृतांमध्ये सात स्त्रिया आणि चार पुरुष होते. ‘माकडाच्या हाती कोलीत’ म्हणतात तसं मिडीयाच्या हाती हे फुटेज लागलं आणि ‘पाईप, प्लॅनिंग आणि पॅटर्न’चा मुद्दा उपस्थित करून ब्रेकिंग न्यूज फिरू लागल्या. या सर्व बातम्यांचा, कॉन्स्पिरसी थेअरीजचा केंद्रबिंदू होता ’११’ हा आकडा! ह्या आकड्याचा आणि घटनेचा वाट्टेल तसा संबंध जोडला जाऊ लागला. लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या मिडीयाचं हे अधःपतन लीना यादव आणि अनुभव चोप्रा या जोडगोळीने अतिशय मार्मिकपणे टिपलेलं आहे.

आपलं मानसिक संतुलन गमावून बसलेल्या कुटुंबप्रमुखाने पसरवलेल्या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन एका कुटुंबाने आपली जीवनयात्रा संपवली. ललितने त्याच्या आयुष्यात घडलेल्या दोन अपघातांचा चांगलाच धसका घेतला होता. त्यानंतर आलेल्या पोस्ट ट्रॉमॅटीक स्ट्रेस डिसॉर्डरचा (PTSD) परिणाम म्हणून तो त्याची वाचा काही महिन्यांसाठी गमावून बसला. वैद्यकीय तपासणीत ललित शेअर्ड सायकोसिसचा रुग्ण असल्याचं आढळून आलं. कुटुंबातील कोणालाही ललितच्या अश्या वागण्यामागची खरी कारणे जाणून घ्यावीत असं कधीही वाटलं नाही. ललितने भोपालसिंगच्या माध्यमातून घरावर आणि घरातल्या कारभारावर एकहाती पकड मिळवली होती. भारतामध्ये मानसिक आरोग्याबाबत असलेल्या जनजागृतीचा अभाव भाटीया कुटुंबाच्या गळफासाचा दोरखंड ठरला. ललितने फेकलेलं अंधश्रद्धेचं जाळं इतकं घट्ट विणलं गेलं होतं की कुटुंबातल्या मोठ्यांनी सोडाच, लहानांनीही या प्रकाराची वाच्यता बाहेर कुठेही केली नव्हती. भाटीया कुटुंबियांच्या सामूहिक आत्महत्येसाठी मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या ललितला जबाबदार धरण्यात आलं आणि या प्रकरणावर एकदाचा पडदा पडला.

हे सगळं कुणा बाहेरच्याला आधीच कळालं असतं तर ही दुर्दैवी घटना टाळता आली असती का? आपलं मानसिक स्वास्थ्य योग्य नाही यावर ललितने विश्वास ठेवला असता का? लहान लेकरांना फासावर चढवताना घरातल्या मोठ्यांचं, विशेषतः त्यांच्या आयांचं काळीज गलबलून आलं नसेल का? की त्यांच्या मताला घरात काही किंमतच नसावी? ज्या सहजतेने घरातली कच्चीबच्ची ‘वटपुजे’ची तयारी करत होती, त्यावरून अशी पूजा किंवा तत्सम जीवघेणं अनुष्ठान या आधीही केलं गेलं असावं का? एखाद्या निर्णायक क्षणी कोणत्याही सदस्याने डायरीतील कार्य करायला नकार दिल्यावर त्याच्याकडून होकार कसा वदवून घेतला जात असेल? शहाण्यासुरत्या माणसाच्या सद्सद्विवेकबुद्धीला न पटणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी करताना या शाळकरी पोरांच्या मनात विरोध करण्याची उर्मी का आली नसावी? असे एक ना अनेक प्रश्न ही डॉक्युमेंटरी सिरीज बघताना डोक्यात पिंगा घालू लागतात आणि शेवटपर्यंत अनुत्तरीतच राहतात..