‘ इंद्रधोणू उदेवं’ चे सप्तरंगी रंग

Story: पुस्तक प्ररीक्षण । उमाकांत शेटये देव |
23rd October 2021, 11:28 Hrs
‘ इंद्रधोणू उदेवं’ चे सप्तरंगी रंग

गोव्यात दरवर्षी कोंकणी, मराठी आणि इतर भाषांत बरीच पुस्तके प्रकाशित होतात. या प्रकाशनामध्ये कवितासंग्रहाची संख्या लक्षणीय असते. उदंड कवितासंग्रह प्रकाशित होतात,असे कोणी म्हटल्यास आपण त्यांना दोष देऊ शकणार नाही. गोव्याचे निसर्ग सौंदर्य आणि इथला कलासक्त समाज हाच या निर्मिती प्रक्रियेत मोठे योगदान देत असेल. या कवींपैकी सर्वजणच दर्जात्मक निर्मिती करतात असे म्हणणे धाडसाचे ठरेल. काही मोजकेच कवी आपला दर्जा राखून असतात. दर्जा राखतानाच तो आपला वाचकवर्ग निर्माण करण्यात यशस्वी होतो. नाहीतर पुस्तक प्रकाशित करुन धुळ खात पडले तर त्याचा काय उपयोग. शेवटी निर्मिती रसिकांना भावली पाहिजे. एकवेळ समीक्षकांना न भावली तरी चालेल हे माझे प्रांजळ मत. 

उदय म्हांबरे यांचा काव्यप्रवास आजकालचा नव्हे. जवळजवळ तो तीस पस्तीस वर्षांचा असेल. कोंकणी चळवळीत निष्ठापूर्वक सेवा देत असतानाच त्यांची कविता जन्म घेऊ लागली. वाचन, अभ्यास, चिंतन, मनन आणि समाज निरीक्षण ह्या सर्वाचा परिपाक म्हणजे त्याचा २०२० मध्ये प्रसिध्द झालेला “इंद्रधोणू उदेवं” हा काव्यसंग्रह. त्याच्या कवितेचा एक रसिक या नात्याने त्याचे कविता गायन मी ऐकले आहे. इतरांनाही ऐकविले आहे. ज्यांनी त्याची कविता ऐकली ते त्याच्या प्रेमात पडले हे नक्कीच. उदयकडे माझे नाते बहुआयामी. एक म्हणजे तो माझा नातेवाईक, कोंकणी चळवळीतील सहयोगी त्याचप्रमाणे मित्र सुध्दा. अशा मित्राच्या काव्यसंग्रहाचा शब्दरुपी आस्वाद इतरांना देणे हा या छोटेखानी लेखाचा उद्देश. 

वळवई हा मांडवीच्या तीरावरील छोटासा गाव. एके काळी मुख्यत्वे मासेमारी व काही प्रमाणात पारंपरिक रेती व्यवसाय. पुढे खनिज व्यवसायामुळे बऱ्याच जणांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. पारंपरिक “वारये” मध्ये लावण्यात येणारी भाजी, मिरची त्याचप्रमाणे हळसांदे हे गावचे वैशिष्ट. व्यवसायच्या निमित्ताने लेखकाचे वडील या गावात स्थायिक झाले. उदयाचे शिक्षण याच गावात त्याचप्रमाणे सावयवेंरे आणि पणजी इथे झाले. या दरम्यानचे निरीक्षण त्याच्या साहित्यात प्रतिबिंबित होते. 

इंद्रधनुष्य ही निर्सगाची अप्रतिम दैवी स्पर्श असलेली निर्मिती असे माझ्यासारखा आस्तिक नक्कीच म्हणू शकतो. उदयाचा “इंद्रधोणू उदेवं” हा काव्यसंग्रहाला ह्या निर्सग निर्मित इंद्रधनुष्याचा परिसस्पर्श झालेला आहे. कारण संग्रहातील कविता समाज जीवनातील रंग आपल्यासमोर आणताना आशावाद आणि सकारात्मकता याच्याकडे वाचकांना घेऊन जातात.

कवितासंग्रहाच्या सुरुवातीलाच पान १९ वर “काळजातल्यान” या कविच्या चार ओळी आहेत. या चार ओळी आपणाला कवीचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन दाखवितात, दृग्ध्दोचर करतात. सूर्य आणि त्याचा उजेड याची सवय मला लागू दे असे म्हणताना त्याची ही मागणी एकंदरीच समाजाप्रतीच आहे. मी तर म्हणेन कवीचे हे एक पसायदानच आहे, जे वाचकाच्या काळजाला हात घालते आणि एकंदरीत कविता वाचण्याची उत्सुकता वाढविते. 

मांडवी नदीच्या रागाला वळवई गावाला नेहमीच सामोरे जावे लागले आहे. वळवई आणि पूर हे एक वर्षानुवर्षाचे समीकरण आहे. पावसामध्ये पुरामुळे इथल्या लोकांना बरेच त्रास सहन करावे लागले आहेत. पूर येथील समाज जीवनावर कसा प्रभाव टाकतो याचे प्रत्ययकारी चित्रण “हुवार” या कवितेत बघण्यास मिळते. हा पूर किडूकमिडूक सगळेच गिळंकृत करतो. भाट, शेत, दुकान त्याचबरोबर माणसाने जमविलेला कचरा सुध्दा तो साफ करतो. शेवटी सर्वत्र चिखल आणि चिखलच. पुरामुळे खचून न जाता, रडत भेकडत न बसता फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून परत आकाशाकडे सूर मारण्याची गावकऱ्यांची वृत्ती दिसते. गावातले सगळेच जण आपपर भाव विसरुन या चिखलातून परत आपला चरितार्थ सावरण्यासाठी एकत्र येतात, नव्या सूर्याची वाट बघत. समाजाचे हे आशावादी चित्रण उदय आपल्या साध्या सोप्या ओघवत्या शैलीत आपल्यासमोर उभे करतो. 

इथून तिथून माणसाचा स्वभाव सगळीकडे सारखाच. या स्वभावावर भाष्य करण्यासाठी कवी साध्या सोप्या प्रतिकांचा उपयोग करतो. खिळी तर घराघरात असतेच. या खिळीचा उपयोग कवी मानवी स्वभावावर भाष्य करण्यासाठी वापरतो. “तोंडाक खिळी” या कवितेत कवीची खंत आपणास दिसते. धूर दिसला की त्याच्यावर फुंकर घालून आग पेटवणारे जास्त. या सर्व सामान्य वृत्तीवर कवी उंगलीनिर्देश करतो. अशा वृत्ती जरी असल्या तरी ज्या घराची बुनियाद नात्याच्या विणीने घट्ट उभी असते, तिथल्या माणसांना थंडी, ऊन, पाऊस याची फिकीर नसते. उशाला दगडधोंडा व पांघरुणासाठी आभाळ असते पण फुतफुत आवाज मात्र असत नाही त्या घराला कोणताही त्रास होऊ शकत नाही. माणसाची नाती घट्ट असल्यास तिच घराची मोठी शक्ती, हेच कवी इथे ठामपणे सांगतो.

घरात मुल येणे हा आगळावेगळा आनंद. मुल म्हणजे घराचा प्राण, वैभव आणि जीवनशक्ती. कवीची “प्रतिबिंब” ही कविता वाचताना (थोडेसे विषयांतर करुन) मला माझे गुरुवर्य व्याकरणकार सुरेश बोरकार यांची कवितेची आठवण झाली. त्यांचा वज्रथिकां कवितासंग्रह मी खूप वेळा वाचतो. त्यातलीच एक कविता:

म्हजे बांय

जोडूंक वता

एक अक्षर एक दिसाक

म्हजे बांय अजाण बालक

ह्या संवसाराच्या चिखलातले

म्हजे अपुरबायेचे

अती प्रसन्न

कुस्कूटा लेगीत खत नाशिल्ले

सुपुले साळक!

ही कविता जेव्हा मी माझ्या मुलीला पाठवून जी आताच तिसऱ्या वर्गात शिकत आहेत त्या नातीला वाचायला लावून त्याचा व्हिडिओ मी पाहिला तेव्हा माझे मन आणि काळीज जसे भरुन आले तसाच अनुभव “प्रतिबिंब” ही कविता वाचताना येते. 

कविच्या दोन तीन कवितांचाच रसस्वाद मी इथे प्रस्तुत केला आहे. एकंदरीत ह्या कविता अनुभव व आशय याने समृध्द आहेत. महत्त्वाचे म्हणजे कटू अनुभव, कोडगेपणा कुठेही नाही. समाज सुधारण्याचा आवेश नाही. जे काही प्राप्त करायचे आहे ते प्रेमाने मिळू शकते ही कवीची भावना. हिच भावना कवीचे शक्ती स्थळ आहे असे आपण म्हणू शकतो. आपण हा कवितासंग्रह जरुर वाचावा. आपल्यालाही एक आगळीवेगळी अनुभूती प्रत्ययास येईल हे नक्की.