अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायद्याची गरज

Story: विश्वरंग | सुदेश दळवी |
23rd October 2021, 12:37 am
अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायद्याची गरज

बांगलादेशातील हिंदूविरोधी हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात आली असून, देशातील प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य देण्यासाठी आणि अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदा तयार करण्यात यावा, अशी मागणी या निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या शिक्षणतज्ज्ञांनी केली आहे. दुर्गा पूजा उत्सवादरम्यान समाजमाध्यमांवर आलेल्या कथित ईशनिंदेच्या पोस्टनंतर मागील आठ दिवसांपासून बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंदू आणि मंदिरांवर हल्ले घडवण्यात आले. दरम्यान, या कालावधित हिंदूंची ६६ घरे पेटवण्यात आली. या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी येथील हिंदू समुदायाने देशभरात सलग सहाव्या दिवशी निदर्शने केल्याचे वृत्त आहे.             

देशभरात विविध ठिकाणी झालेल्या निदर्शनांमध्ये या हिंसाचारातील आरोपींना शिक्षा देण्याची व अल्पसंख्याकांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. हिंदूंवर आणि मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्यांना उदाहरण ठरेल, अशी शिक्षा देण्याची मागणी ‘द ढाका युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (डीयूटीए)ने केली आहे. देशातील प्रत्येकाचे धार्मिक स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी कायदा तयार करण्यात यावा, अशी मागणीही या संघटनेने केली आहे. या संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मानवी श्रृंखला तयार करून हिंसाचाराचा निषेध ढाका विद्यापीठाच्या परिसरात केला.             

बांगलादेशातील दुर्गा पूजा हे देशाच्या धर्मनिरपेक्षतेचे जगात दिले जाणारे उदाहरण आहे. हा सण देशातील सर्वधर्मीय नागरिकांसाठी खुला असावा. मात्र, कट्टरवादामुळे देशात हिंसाचार घडत असून, त्याचा निषेध करणे आवश्यक आले, असे विद्यापीठाचे कुलगुरू एम. अतरुझ्झमन यांनी सांगितले. एका बातमीनुसार बांगलादेशात हिंदूंविरुद्ध हिंसाचार होण्याचे मुख्य कारण त्यांच्याकडे असलेल्या जमिनी बळकवणे आहे. ढाका टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार बहुसंख्य मुस्लीम अल्पसंख्य गरीब हिंदूंवर हल्ला करतात, त्यांच्या माताभगिनींवर अत्याचार करतात, त्यांची घरेही जाळून टाकतात. त्यानंतर हिंदू कुटुंबाला त्यांचे घर सोडून सुरक्षित ठिकाणी जाणे भाग पडते. मुस्लीम हिंदूंची जमीन बळकावतात अशी येथील अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांची पद्धत आहे. बांगलादेशाच्या इतिहासात १९७१ मध्ये हिंदूंवर सर्वाधिक अत्याचार झाले होते. बांगलादेश मुक्ती संग्रामादरम्यान पाकिस्तानी लष्कराने हिंदूंची गावच्यागावं उद्धवस्त केली होती. त्यावेळी ३० लाखांहून अधिक हिंदूंचा नरसंहार झाला होता.                   

बांगलादेश ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिकनुसार बांगलादेशात १९७४ साली हिंदूंची संख्या १३.५ टक्के होती ती १९८१ मध्ये घटून १२.१ टक्के झाली. त्यानंतर १९९१ मध्ये ही संख्या आणखी घटली आणि १०.५ टक्के झाली. २००१ मध्ये बांगलादेशात एकूण लोकसंख्येच्या केवळ ९.३ टक्केच हिंदू होते. २०११ मध्ये हिंदूंची लोकसंख्या ८.५ टक्के होती २०२१ चा अंदाज लावला तर आता बांगलादेशात केवळ ६.५ टक्केच हिंदू नागरिक आहेत. हिंदूंवर होणारे अत्याचार हे हिंदू लोकसंख्या घटण्यामागचे प्रमुख कारण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणून बांगलादेश सरकारला कठोर पावले उचलायला लावणे गरजेचे आहे. नाहीतर खरोखरच बांगलादेशात २०५० पर्यंत एकही हिंदू राहणार नाही.