हुशार, कर्तबगार स्वयंपूर्णा : ज्योती पालयेकर

ज्योती पालयेकर एक हुशार कीर्तनकार महिला म्हणून मेरशी गावात ओळखली जाते. ज्योतीची प्रशंसा जितकी करावी तितकी कमीच, कारण वेगवेगळ्या क्षेत्रात तिने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

Story: स्वयंपूर्णा । प्रीती केरकर |
23rd October 2021, 12:16 am
हुशार, कर्तबगार स्वयंपूर्णा : ज्योती पालयेकर

तब्बल २५ वर्षांपासून एकाच सेल्फ हेल्फ ग्रूपमध्ये कार्यरत राहून आपल्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडून वेगवेगळी आव्हाने स्विकारणारी  ज्योती अशोक पालयेकर आज वयाच्या ७७व्या वर्षीही तितकीच सक्रिय व उत्साही आहे. जशी एखादी १८ वर्षांची तरूणीच! सर्वांना आपल्या सोबत घेऊन काम करणारी, एक हुशार, कर्तबगार सेल्फ हेल्फ ग्रूपची सभासद म्हणजे ज्योती. तिच्या सेल्फ हेल्फ ग्रूपचे नाव 'ओम सातेरी सेल्फ हेल्प ग्रूप'. या गटाची स्थापना १९९७ साली झाली तद्नंतर याचा समावेश २०१७ मध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ( DRDA) यांच्या ‘स्त्रीशक्ती’ योजने अंतर्गत करण्यात आला. या गटात ज्योती पालयेकर सचिव पद सांभाळते तसेच ती ‘संघर्ष’ ग्रामसंघाची अध्यक्षही आहे.

ज्योतीचा जन्म १६ एप्रिल, १९५५ साली झाला. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच तिला लग्नाची मागणी आली. १९ व्या वर्षी तिचे लग्न अशोक पालयेकर यांच्याशी झाले. पतीच्या आणि सासू, सासऱ्याच्या सहमतीने तिने आपले बी. ए.चे शिक्षण पूर्ण केले. तिचे पती होली फॅमिली शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ज्योतीला आपल्या सासरच्या मंडळीचा फार मोठा आधार होता. तिच्या प्रत्येक कार्याला त्यांचा पाठिंबा असायचा. पतीच्या मदतीने तिने मेरशी येथे एक किराणा दुकान सुरू केले. १९९८ - २००५ या कालावधित तिने मेरशी ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच आणि पंच सदस्य म्हणून कार्य केलेले, तसेच ती 'अखिल गोवा महिला परिषद'मध्ये सहा वर्षे खजिनदार पद सांभाळत होती. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंड्रस्टी (GCCI) वूमन वीगची सभासद म्हणून कार्यरत आहे. डोळे तपासणी शिबीर असो, वा रोटरी कल्बतर्फे महिलांना मास्क व गोधडी शिवण्यासाठी मिळवलेली ऑर्डर असो, ही संधी तिच्यामुळेच मिळाली. अश्या अनेक कार्यशाळांद्वारे अनेक रोजगाराच्या संध्या तिने आपल्या सेल्फ हेल्फ ग्रूपमधील सभासदांसाठी उपलब्ध केल्या आहेत. तिने (IA) रेखा वर्णेकर, प्रभाग समन्वयक आणि आपली सखी देविका कळंगुटकर, जी सुरूवातीपासून आतापर्यंत ज्योतीच्या सर्व कामात व सर्व येणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये तिच्या सोबत सतत असते,या सर्वांच्या मदतीने सर्व कार्यात यश प्राप्त केले आहे.

‘संघर्ष’ ग्रामसंघ तर्फे बांबोळीच्या FDI कार्यालयात कॅन्टीन चालवले जाते. त्यात ती त्यांना सहकार्य करते. जनशिक्षण अभियाना अंतर्गत अनेक कार्यशाळा तिने आपल्या गटातील सभासदांना मिळवून दिल्या. थर्मोकॉलचे आकाशकंदील बनवणे, बांधणी कला, काथ्यापासून, कागदापासून व कपड्यापासून पिशव्या तयार करणे,अश्या अनेक कार्यशाळा तिने सिबा (CIBA), पॉलिटेक्निक पणजी, रोटरी क्लब, जनशिक्षण अभियान यांच्या मार्फत घेतल्या आहेत. ह्या कार्यशाळांचा उपयोग जास्तीत जास्त महिलांना व्हावा म्हणून नेहमी ती धडपडत असते. हल्लीच कोविड - १९ महामारी काळात रोजगार कमी झाल्याने महिला वर्गाला थोडाफार हातभार लागावा म्हणून जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणे ( DRDA)च्या अध्यक्ष मीना गोलतेकर मॅडम त्यांच्या नेतृत्वाखाली तिच्या संर्घष ग्रामसंघाच्या सरकारी इमारतीखाली टेबल लावून घरी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री करण्यास मान्यता मिळाली. आता ग्रामसंघातील कित्येक ग्रुप आळीपाळीने तिथे आपल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री करतात.

ज्योती पालयेकर एक हुशार कीर्तनकार महिला म्हणून मेरशी गावात ओळखली जाते. ज्योतीची प्रशंसा जितकी करावी तितकी कमीच, कारण वेगवेगळ्या क्षेत्रात तिने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत आणि अजून त्या निभावत आहेत.

(जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ( DRDA) यांच्या सौजन्याने)