आयपीएल बेटिंगचा पर्दाफाश

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
15th October 2021, 12:29 Hrs
आयपीएल बेटिंगचा पर्दाफाश

पणजी : गोवा पोलिसाच्या गुन्हा शाखेने बुधवारी रात्री सांगोल्डा येथील सन राइझ अपार्टमेंटच्या एका खोलीवर छापा टाकून आयपीएल बेटिंगचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी राजस्थान सुजनगर्ड येथील विकास पृथ्वीराज सैन (३०) आणि आकाश सुरेश कुमार (२६) या दोघा संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून लॅपटॉप, मोबाईल तसेच ५,३०० रुपये मिळून १ लाख १० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.

गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार, सांगोल्डा येथील सनराइझ अपार्टमेंटच्या खोली क्रमांक १०६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स(डीसी) आणि कोलकाता नाईट रायडर्स मध्ये झालेल्या सामन्यात आयपीएल बेटिंग होत असल्याची माहिती गुन्हा शाखेला मिळाली होती. या माहितीनुसार, गुन्हा शाखेचे अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखेच्या पथकाने बुधवार १३ रोजी रात्री ९ ते ११.५० वाजता संबंधित अपार्टमेंटच्या खोलीवर छापा टाकला. या वेळी गुन्हा शाखेने विकास पृथ्वीराज सैन (३०) आणि आकाश सुरेश कुमार (२६) या संशयितांना ताब्यात घेतले. या वेळी गुन्हा शाखेने संशयितांकडून लॅपटॉप, मोबाईल तसेच ५,३०० रुपये मिळून १ लाख १० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. संशयिताविरोधात गोवा, दमण व दीव सार्वजनिक जुगार प्रतिबंधक कायदा १९७६च्या कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करून संशयितांना रीतसर अटक केली.