गोव्याच्या विकासाची गती बहुमत मिळाल्यास दुप्पट!

गृहमंत्री अमित शहांची हमी; विकासकामे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा सल्ला

|
15th October 2021, 12:34 Hrs
गोव्याच्या विकासाची गती बहुमत मिळाल्यास दुप्पट!

फोटो : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुष्पहार घालून स्वागत करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सदानंद शेट तानावडे. सोबत मान्यवर. (नारायण पिसुर्लेकर)

__
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : स्थिर, भ्रष्टाचारमुक्त शासन आणि विकासासाठी राज्यात भाजपचे स्पष्ट बहुमताचे सरकार आणा. येत्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यास गोव्याच्या विकासाची गती दुप्पट करू, अशी हमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोमंतकीय जनतेला दिली. शिवाय केंद्र आणि राज्य सरकारने घडवून आणलेली प्रगती, विकास घेऊनच लोकांपर्यंत जाऊन मते मागण्याचा सल्ला त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.
ताळगाव येथील कम्युनिटी सभागृहात गुरुवारी आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, प्रभारी सी. टी. रवी, राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, बाबू आजगावकर यांच्यासह मंत्री, भाजप आमदार यावेळी उपस्थित होते.
स्व. मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्री म्हणून गोव्याला आणि संरक्षणमंत्री म्हणून देशाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या डॉ. प्रमोद सावंत यांनी विकासाची घोडदौड सुरूच ठेवली आहे असे म्हणत, शहा यांनी भाजप सरकारच्या कार्यकाळात पूर्ण झालेल्या विविध विकासकामे आणि प्रकल्पांची यादी उपस्थितांसमोर ठेवली. राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने गोव्याला पारदर्शक प्रशासन दिले आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये राज्याने विकास साधला आहे. कोविडसारख्या संकटावर लीलया मात केली. शंभर टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे आणि प्रत्येक घराला पाण्याचा नळ देणारे गोवा देशातील पहिले राज्य बनले आहे. गोव्याच्या विकासासाठी आवश्यक तेथे केंद्रातील भाजप सरकारने पूर्ण मदत केली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी ताठ मानेने राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारची उपलब्धी तळागाळातील जनतेपर्यंत न्यावी​ आणि येत्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्रातील मोदी सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले म्हणूनच जम्मू-काश्मिरातील कलम ३७०, राम जन्मभूमी, तिहेरी तलाक आदींसारखे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले विषय मार्गी लागले. गोव्यातही भाजपला पुन्हा बहुमत मिळाल्यास उर्वरित सर्वच प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील, असेही गृहमंत्री अमित शहा यांनी नमूद केले.
.........................................
पर्यटनासंदर्भात शहा म्हणाले...
- पर्यटन व्यवसायाशी संबंधित सर्व व्यावसायिकांना १० लाख रुपयांपर्यंतचे तसेच पर्यटक गाईडसाठी सरकारी हमीवर १ लाख रुपयांचे कर्ज देण्याची योजना केंद्रातील भाजप सरकारने तयार केली आहे.
- विदेशातून येणाऱ्या चार्टर विमानांना १५ ऑक्टोबरपासून परवानगी देण्याचा, तसेच सुरुवातीच्या पाच लाख विदेशी पर्यटकांना मोफत व्हिसा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.
- केंद्र सरकारच्या या तिन्ही निर्णयांचा गोव्यातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
..............................................
मुख्यमंत्र्यांनी उलगडले ‘२२ +’चे कोडे!
सध्या भाजपकडे २७ आमदार असतानाही येत्या निवडणुकीत भाजपने ‘२२ +’चा नारा दिला आहे. कारण अतिआत्मविश्वासाने आकडे फुगवून सांगण्याची प्रथा भाजपमध्ये नाही. येत्या निवडणुकीत काहींचा पराभव झाला तरी २२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळण्याचा विश्वास आम्हाला नक्कीच आहे, असे म्हणत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘२२ +’ च्या घोषणेसंदर्भात गुरुवारी प्रथमच स्पष्टीकरण दिले.
...............................................
फडणवीसांची काँग्रेस, आप, तृणमूलवर सडकून टीका
भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच काँग्रेस, आप आणि तृणमूल काँग्रेसवर सडकून टीका केली. केंद्रात आणि गोव्यात नेतृत्वच नसल्याने काँग्रेस बुडते जहाज बनले आहे. निवडणुकीपर्यंत काँग्रेसमध्ये कोणी राहील असे आपल्याला वाटत नाही असे ते म्हणाले. आपची अवस्था ‘खोटे बोल पण रेटून बोल’ अशी आहे. तर तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालप्रमाणेच गोव्यातही लोकशाहीचा तमाशा सुरू केला आहे. त्यामुळे सुशिक्षित गोमंतकीय जनता या तिन्ही पक्षांना योग्य धडा शिकवेल आणि भाजपला स्पष्ट बहुमत देईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
---
...तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक
फोंडा : काश्मिरातील नागरिकांच्या हत्येसाठी दहशतवाद्यांना मदत करणे न थांबवल्यास सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला दिला. आम्ही आमच्यावर केलेले हल्ले खपवून घेत नाही, हे यापूर्वी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने सिद्ध केले आहे. त्यामुळे तुम्ही सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले किंवा काश्मीरमधील आमच्या नागरिकांना मारण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही आणखी सर्जिकल स्ट्राईल करू, असे उद्गार अमित शहा यांनी काढले. धारबंदोडा येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.
अमित शहा पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले सर्जिकल स्ट्राईक हे एक महत्त्वाचे पाऊल होते. भारताच्या सीमांवरील शांतता कोणीही भंग करू शकत नाही, हाच संदेश आम्ही या या सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून दिला होता. दोन्ही देशादरम्यान चर्चेची एक वेळ होती, मात्र आता ती वेळ राहिली नसून आता जशात तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे,” असेही गृहमंत्री शहा म्हणाले.