हिंदी कलाकारांची नशेबाजी

मुंबईतून गोव्याकडे निघालेल्या क्रूझ बोटीवर छापा टाकून एनसीबीनं ड्रग्ज पार्टी उधळली. त्यात हिंदी सिनेसृष्टीचे कनेक्शन उघड झाले. हा प्रकार आता ब्रेकिंग न्यूजचा विषय असला, तरी या नशेबाजीचा इतिहास खूप जुना आहे.

Story: मनोरंजन/ सचिन खुटवळकर |
09th October 2021, 11:59 Hrs
हिंदी कलाकारांची नशेबाजी

देव आनंदचा ‘हरे रामा हरे कृष्णा’ चित्रपट आठवतोय? १९७१ साली आलेल्या या हिंदी चित्रपटाने ड्रग्जच्या नशेची एक झलक समोर आणली होती. काठमांडूमधील एका खर्या्खुर्या् प्रसंगानंतर देव आनंद यांना ‘हरे रामा हरे कृष्णा’ची कथा सुचली. ड्रग्जच्या आहारी जाण्याबाबतच्या मानसिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला. कारण हिंदी सिनेसृष्टी या नशेच्या जाळ्यात कधीच ओढली गेली होती. ७० आणि ८० च्या दशकांत अनेक हिंदी कलाकार ड्रग्ज घेत असत. ड्रग्ज घेणे ही उच्च प्रतीची नशेबाजी मानली जात असे, आजही मानली जाते. ड्रग्ज घेण्यामागे तेव्हाच्या संदर्भांनुसार अनेक कारणे होती. कधी कामाचा अतिताण, कधी कामच न मिळणे, तर कधी प्रेमप्रकरणांतील धोकेबाजी अशा कारणांखाली अनेक जण ड्रग्जकडे वळले होते. काही अभिनेत्रीही या विळख्यात सापडल्या होत्या. पण हे सगळे प्रकार तेव्हा अतिशय काळजी घेऊन आणि गुप्तपणे चालत असत. ड्रग्ज डिलरकडून व्यवस्थित नियोजन केले जात असे. नंतरच पार्टीचे आयोजन होत असे. कारण पोलिसांपर्यंत अशी प्रकरणे पोहोचणे कलाकार आणि त्यांच्यावर अवलंबून असणार्याक घटकांना परवडणारे नव्हते. एका अर्थाने सभ्य समाजाची आणि कायद्याचीही अदृश्य भीती त्यांना सतावत असे.

या समजाला तडा दिला तो. १९८० च्या दशकातील वारेमाप भांडवलशाहीने. गुन्हेगारी विश्वातील बड्या हस्ती आपला काळा पैसा हिंदी सिनेसृष्टीत गुंतवू लागल्या आणि त्याबरोबरच ड्रग्जची पाळेमुळेही फोफावली. पोलिसांच्या नकळत गोपनीयरीत्या हे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झाले. अनेक सधन कलाकार ड्रग्जच्या आहारी गेले. इतकेच नव्हे, तर ड्रग्जच्या सेवनाची दृश्ये चित्रपटांतूनही दाखवली जाऊ लागली. एका अर्थाने ड्रग्ज घेण्याविषयीची उत्सुकता सधन वर्गाला समोर ठेवून पद्धतशीरपणे पसरवली जाऊ लागली. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटला हातपाय पसरण्यासाठी हा एक नवा मार्ग सापडला होता. त्यानंतरच्या काळात ड्रग्ज पार्ट्यांच्या आयोजनांना आणखी उत आला. कलाकारांसह त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीय अशा पार्ट्यांमध्ये ‘दम’ मारू लागले. सहजपणे मिळणार्याि गांजाची जागा कोकेनने घेतली. नंतर अनेक विदेशी ड्रग्ज सिनेसृष्टीच्या माध्यमातून अन्य सधन वर्गापर्यंत कधी पोहोचले आणि या नशेच्या विळख्यात समाजाचा एक मोठा वर्ग कधी सापडला, ते कळलेही नाही.

नशेत चुर्र असलेल्या हिंदी सिनेसृष्टीचे डोळे १९८२ सालच्या एका घटनेने खाड्कन उघडले. बुजुर्ग अभिनेते सुनील दत्त यांचा पुत्र संजय दत्त ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी दोषी ठरला. ड्रग्जच्या आहारी गेल्यामुळे त्याच्यावर उपचारही करण्यात आले. शिवाय ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी पाच महिन्यांची सजाही त्याला झाली. २०१८ साली आलेला ‘संजू’ चित्रपट याच पार्श्वभूमीवर बनवण्यात आला होता. यात संजय दत्तची बाजू सांभाळून घेण्याची कसरत लेखक-दिग्दर्शकाने केली, जी अपेक्षित होती. परंतु  या चित्रपटाला समीक्षकांची प्रचंड टीका सहन करावी लागली होती. थातुरमातूर कारणे देऊन ड्रग्ज घेण्याचे आणि नशेत धुंद राहण्याचे समर्थन कसे काय केले जाऊ शकते, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

सध्या सिनेरसिकांच्या विस्मृतीत गेलेला अभिनेता फरदिन खान याला २००१ मध्ये ड्रग्जप्रकरणी अटक झाली होती. त्यावेळीही मोठी चर्चा माध्यमांनी घडवली. ड्रग्ज हा विषय गांभीर्याने घेतला गेला. मात्र दुर्दैवाने हिंदी सिनेसृष्टीचा हा काळा चेहरा त्यानंतरही अधिक काळवंडला गेला. मध्यंतरी विकी गोस्वामी हे नाव गाजले ते अभिनेत्री ममता कुलकर्णीमुळे. ममताने ज्या व्यक्तीशी लग्न केले तो कुख्यात ड्रग डिलर विकी गोस्वामी हाच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हिंदी सिनेसृष्टीचे ड्रग्ज कनेक्शन पुन्हा चव्हाट्यावर आले. अक्षय खन्नाचा भाऊन साक्षी हासुद्धा रेव्ह पार्टीत सापडला आणि त्याला अटक झाली होती. अपूर्व अग्निहोत्रीला तर त्याच्या पत्नीसह अटक झाली होती. २०११ आणि २०१२ च्या सुमारास घडलेल्या या घटनांनी ड्रग्जचे पाश आणखी घट्ट होत असल्याचेच सिद्ध केले. गेल्या वर्षी दिग्दर्शक करण जोहरच्या घरी झालेली रेव्ह पार्टी असो किंवा काही गायकांनी ड्रग्जच्या आहारी गेल्याची दिलेली कबुली असो, या नशेबाजांची यादी वाढतानाच दिसते. ‘कौवा बिर्यानी’फेम विजय राजपासून ते अलीकडचा स्टार विकी कौशलपर्यंत अनेकांची नावे ड्रग्जच्या संदर्भात चर्चेत आली. आपण कधी काळी ड्रग घेतल्याची जाहीर कबुली रणबीर कपूरनेही यापूर्वी दिलीय. मनीषा कोईराला, हनी सिंग अशी अनेक नावे ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांच्या यादीत आहेत. 

गेल्या वर्षी जूनमध्ये सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर हिंदी कलाकार आणि ड्रग्ज माफियाचे कनेक्शन नव्याने समोर आले. एनसीबीच्या छापेमारीनंतर अनेकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. दीपिका पदूकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची तर ड्रग्जसंबंधीची वॉट्सअॅ प चॅटिंगसुद्धा समोर आली. त्यामुळे ड्रग्जची नशा हिंदी सिनेसृष्टीत प्रचंड भिनल्याचे अधोरेखित झाले. एनसीबीच्या ताज्या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा ड्रग्जसह सापडल्यामुळे ही नशेबाजीची घातक परंपरा हिंदी मनोरंजन विश्वात जोमाने वाढत असल्याचेच सिद्ध झाले. या घटनेनंतर ज्या प्रकारे हिंदी सेलिब्रिटींनी शाहरुख आणि आर्यन खानची सोशल मीडियावरून पाठराखण केली, ती धक्कादायक होती. नशेबाजांच्या या जमातीने त्यांच्या चाहत्यांच्या फाजिल अपेक्षांचा अंमल असा खाड्कन उतरवला हे एका दृष्टीने बरेच झाले!