पिंपळावरचं कर्णपिशाच्य..

त्याने, भाटल्यातला पिंपळ सोडला होता. माझा डावा कान हेच त्याचं आजपासून नवीन वस्तीस्थान झालं होतं.

Story: तात्यांच्या बाता/ दीपक मणेरीकर |
09th October 2021, 11:52 Hrs
पिंपळावरचं कर्णपिशाच्य..

त्या रात्री पिठलं भाकरी खाऊन, आम्ही मधल्या चौकात बैठे खेळ खेळत बसलो होतो. तांदळाच्या भाकऱ्या अंगावर आल्या होत्या, डोळे झोपेने तारवटल्यासारखे झाले होते एवढ्यात तात्यांचा "एकदा काय झाले जाणे" हा आवाज आमच्या कानी पडला. तात्या, समोर बसलेल्या चार-पाचजणांना काहीतरी ऐकवण्याच्या मूडमध्ये आहेत हे जाणून आम्ही बालगोपाळ मंडळी लगेच त्यांच्या समोर जाऊन बसलो. आरामखुर्चीत, दोन्ही हातांनी जानवं फिरवत बसलेले तात्या बोलते झाले.

" एकदा काय झाले जाणे... आमच्या लागवडीखालच्या सात - आठ जमिनींपैकी 'पिंपळ भाटले ' या दोन एकर जमिनीत आम्ही त्यावर्षी पहिल्यांदाच ऊसाची लागवड केली होती आणि त्याची संपूर्ण जबाबदारी मी स्वतःवर घेतली होती. या जमिनीत एक पिंपळाचं भलं मोठं झाड होतं. या झाडामुळेच या जमिनीला 'पिंपळ भाटलं' हे नाव पडलं असावं. या पिंपळाच्या झाडाला मेलेल्या लोकांचे केस खिळ्यांनी ठोकायची पूर्वीच्या काळी प्रथा होती असं मी ऐकून होतो. अनेक अतृप्त आत्मे, एक-दोन मुंजेसुध्दा या झाडावर वस्तीला असल्याचीही वदंता मध्यंतरी उठली होती. बहुतेक याचकारणासाठी आमच्या या जमिनीत कुणीही जायला उत्सुक नसे. आमच्या राघव काकांनी या पडिक जमिनीत काहीतरी उत्पन्न निर्माण करायचा विचार मला बोलून दाखवला आणि मी लगेच तिथे ऊस लागवड करायची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर घेतलीसुध्दा. ठरल्याप्रमाणे मी जमिनीची मशागत करून, चंदगड भागातून ऊस आणून लागवड केली . पण हे काम सुरू करण्यापूर्वी, मी पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या पाषाणाला पिंजर लावून तिथे नारळ फोडून नमस्कार केला मात्र... वाऱ्याची एक थंडगार झुळूक आली आणि पिंपळाची पानं अशी काही सळसळली की त्या पिंपळाला जणूकाही अत्यानंद झाला असावा... तो एक योगायोग होता का? की पिंपळाच्या झाडावर वास करणाऱ्या त्या तथाकथित पिशाचांना आनंद झाला होता? ते काहीही असो पण ती सळसळ ऐकून माझ्या अंगावर नक्कीच काटा आला होता... हो मी मनोमन चरकलो होतो... 

ऊस लागवड म्हणजे, लागण करण्यापासून ऊस तोडणी होईपर्यंत सतत काहीतरी कामं सुरूच असतात . सबंध दिवस मशागतीची कामं करायची व ऊस रुजून आल्यावर, रात्री, गवे, कोल्हे, रानडुक्कर इत्यादी जनावरांपासून पिकाची राखण करण्यासाठी माळ्यावर म्हणजे मचाणीवर झोपायला यायचं असा ऊस उत्पादकांचा नित्यक्रम असतो . दिवसभरात माझ्यासाठी जे काही खायला आणलं जायचं ते खाण्यापूर्वी एखादा घास मी, पिंपळवृक्षाखालच्या पाषाणा समोर न चुकता ठेवत असे आणि मगच अन्न भक्षण करीत असे. हळूहळू मला तशी सवयच लागली. ऊस रुजून आल्यावर मी पिंपळ भाटल्यात एक उंच असा माळा तयार केला पण तिथे येऊन झोपायचं धाडस काही माझ्याने होईना. आज उद्या करत मी रखवालीला यायचं टाळत होतो. तसा मी भित्रा मुळीच नाही पण भुतं म्हटली की नाही म्हटलं तरी थोडीशी भीती वाटतेच ना? शेवटी एके रात्री धीर एकवटून मी माझी बंदूक घेऊन माळ्यावर आलो. ती रात्र मी, न झोपता काढली. पिंपळपानांची सळसळ मला सतावत होती. आजवर मी भूताखेतांच्या गोष्टी ऐकल्या होत्या पण प्रत्यक्षात भूत कधीच बघितलं नव्हतं. भुता बद्दलच्या कल्पना एकसारख्या डोक्यात घोंगावत होत्या आणि त्याला पानांच्या सळसळीचं पार्श्वसंगीत एकसारखं साथ देत होतं. एक - एक करत रात्री सरत गेल्या तशी माझ्या मनातील भीती कमी होत गेली. मी दररोज माळ्यावर झोपू लागलो. आणि एके रात्री, माझ्या कानाच्या अगदी जवळ , तात्या ~ए, तात्या~अशी हळूवार आवाजात कुणीतरी हाक मारत असल्याचा मला भास झाला. मी जरासा जागा झालो पण जागेवरून उठलो नाही. उजव्या कुशीवर तसाच पडून राहिलो. काही वेळाने परत मला, तात्या ~ए, तात्या ~~अशी हळूवार हाक स्पष्टपणे ऐकू आली. माझ्या डाव्या कानाच्या अगदी जवळ येऊन कुणीतरी मला हाक मारत होता.मी उजव्या कुशीवरून उताणा झालो व 'कोण आहे?' असं म्हणत माझ्या उशीखाली असलेली विजेरी मी पेटवली. तिथे कुणीही नव्हतं मी जरासा घाबरलो कारण ती अमावस्येची रात्र होती. अमावस्या आणि भुतं व पिंपळ भाटलं आणि भुतं हे दोन्ही योग माझ्या डोक्यात थैमान घालू लागले. मी ताडकन माळ्यावरच उठून बसलो व विजेरीच्या झोतात मला हाक मारणाऱ्याचा शोध घेऊ लागलो. कुणीतरी मला घाबरवण्याचा प्रयत्न करतंय की हा भुताटकीचा प्रकार आहे हेच मला समजेना. माझी मस्करी करू शकतील अशा काही लोकांच्या नावाने मी हाका मारून बघितल्या पण त्याला कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. मी आता जरा जास्तच घाबरलो आणि माळ्यावरून खाली उडी मारण्याचा मी निर्णय घेतला. 

आता मी माळ्यावरून खाली उडी मारणारच होतो एवढ्यात माझ्या डाव्या कानात परत एक आवाज घुमला, " तात्याsss...अरे घाबरू नकोस.. शांत हो... तुला घाबरायची काहीच गरज नाही. होय मी एक अतृप्त आत्मा आहे... बळीराम असं माझं नाव होतं जेव्हा मी मनुष्य योनीत होतो. माझ्या चांगल्या स्वभावावर खूश होऊन वेताळाने मला कर्णपिशाच्य विद्या दिली आहे. तू दररोज इथे ठेवत असलेलं अन्न मीच खात असतो. तात्याsss मी तुझ्यावर खूश झालो आहे आता तुझ्या या डाव्या कानातच मी कायमचा रहाणार आहे व इथे बसून तुला पडलेल्या कुठल्याही प्रकारच्या प्रश्नांची अचूक उत्तरं मी तुझ्या कानात तुला सांगेन. आता अजिबात घाबरू नकोस. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव जो पर्यंत तुझ्या या डाव्या कानाने तुला ऐकू येईल, तोपर्यंतच मी इथे राहिन. " पिशाच्च्याचं हे बोलणं ऐकून मी जाम टरकलो. माझं अवसान कुठल्याकुठे गळून गेलं. मी गयावया करून त्या पिशाच्याला, मला सोडून जायच्या विनवण्या केल्या पण, बळीराम आपल्या निर्णयावर ठाम राहिला. आता त्याने,भाटल्यातला पिंपळ सोडला होता. माझा डावा कान हेच त्याचं आजपासून नवीन वस्तीस्थान झालं होतं. बळीरामने खरोखरच, मला त्रास होईल असं काहीही अजूनपर्यंत तरी केलं नव्हतं. माझ्या मनात आलेल्या कुठल्याही छोट्यामोठ्या प्रश्नांबद्दल मी विचार करण्यापूर्वीच त्यांची अचूक उत्तरं मला, 'तो' देत असे. मला कधीही डोकेफोड करावी लागत नसे. सगळं अगदी सुरळीतपणे सुरू होतं पण, सदुभाऊ रडत भेकत, एका भल्या पहाटे आमच्या घरी येईपर्यंतच...