माझा अभिमान : माझे बाबा

काहींच्या बाबतीत मी बघते, दिवसभर राबून सायंकाळी डॅडी, पपा, पॉप्स, डॅडू अशा नावाने वडिलांना हाक मारताना मुलं आपल्याला दिसतात. पण मी जेव्हा माझ्या वडिलांना बाबा म्हणून हाक मारते तेव्हा खरंच मला खूप अभिमान वाटतो.

Story: माझे बाबा । ग्रीष्मा गावस |
08th October 2021, 10:31 pm
माझा अभिमान : माझे बाबा

बाबा म्हटलं की, वडिलांचा हसरा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो. प्रत्येकाच्या जीवनात आपले वडील हे आपल्यासाठी ग्रेट असतात. तसेच माझे बाबा माझ्यासाठी ग्रेट आहेत आणि माझी रोज सकाळ पण होते ती माझ्या बाबांच्या हाकेने. "उठ गं बाय..किती वेळ झोपणार? सूर्य आला वर बघ! चिऊताई पण गेली कामाला आणि तू अजून झोपलीस? ऊठ लवकर!!"असं म्हणून बाबा मला रोज पहाटे उठवतात. कारण पहाटेचं वातावरण एकदम शांत असतं. पशु पक्ष्यांची मधुर गाणी व देवळामध्ये लावलेला सनई चौघडा ऐकून मन शांत होतं आणि अशाप्रकारे माझी सुंदर सकाळ सुरू होते.

बाबांचा कामावर जाण्याचा वेळ झाला की, मग ते "येतो हा" असं आम्हाला सांगून सकाळी चेहऱ्यावर हास्य दाखवून जातो.थकून घरी परतल्यावर मी "बाबा" म्हणून जेव्हा हाक मारते तेव्हा तोच त्यांचा तसाच हसरा चेहरा असतो.काहींच्या बाबतीत मी बघते,दिवसभर राब राब राबून सायंकाळी डॅडी, पपा, पॉप्स, डॅडू अशा नावाने वडिलांना हाक मारताना मुलं आपल्याला दिसतात. पण मी जेव्हा माझ्या वडिलांना बाबा म्हणून हाक मारते तेव्हा खरंच मला खूप अभिमान वाटतो. कारण बालपणातला बालमित्र म्हणजे माझे बाबा. मी लहान होते तेव्हा ते माझ्याबरोबर लहान मुलांसारखं खेळायचे. कधी रात्रीच्यावेळी लाईट गेली तर मग गंमत अशी व्हायची की आई जेवणासाठी बोलवत राहायची आणि इकडे आम्ही दोघं दिव्याच्या प्रकाशात हाताच्या सावली भिंतीवर टाकत वेगवेगळ्या आकृती करत बसायचो मग आई तो दिवाच घेऊन स्वयंपाकघरात जायची.

जेवणानंतर झोपायची वेळ झाली की मग मी मात्र बाबांसमोर हट्ट करायची गोष्टी सांगा म्हणून. कधी रूसूनही बसायची कारण मला माहीत असायचं, बाबा लाडाने आपल्याला जवळ घेऊन गोष्ट सांगणार आणि रात्र झाली की मला उत्सुकता पण असायची गोष्ट ऐकण्याची. कारण बाबा रोज मला नवीन नवीन गोष्टी सांगत असायचे. कधी स्वप्नातल्या सुंदर दुनियेत घेऊन जायचे. . आमच्या जीवनात आई ही आमच्यासाठी मायेचा सागर असतो ती डोळे मिटेपर्यंत आमच्यावर प्रेम करते. आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो तो बाबा. बाबा हा अथांग पसरलेल्या निळ्या नभात ज्याची उंची कोणीच मोजू शकत नाही ते बाबा. प्रत्येक संकटात ठामपणे पाठीशी उभे असणारे त्याचे रूप प्रत्यक्ष पंढरीच्या पांडुरंगासारखं वाटतं. माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करतात. आणि त्याचा तो जिव्हाळा, ती आपुलकी मला भावते. माणुसकीचे महत्त्व शिकवणारे माझे बाबा व प्रत्येक चुका माफ करून मायेन जवळ घेणारे माझे बाबा.

 लहानपणापासून मला एखाद्या परीसारखं जपणारा माझा बाबा. आज काही अशी माणसे आपल्याला दिसतात की ज्यांना बाबा हा शब्द गावंढळ वाटतो. का कोणास ठाऊक, बाबा म्हणणारी मुलं पण क्वचितच कुठं दिसतात. माझ्या बाबांचा स्वभाव एकदम शांत, निरागस अशा वाहणाऱ्या ओढ्यासारखा. कधीकधी थोडसा तिखट असतो,पण त्याचं मन निर्भळ व प्रेमळ असतं. लोकांना मदत करणारे, मग ती ओळखीची असो वा अनोळखी व जीवनात कितीही दु:खी असलं तरी त्याचा चेहरा सदैव हसतमुख असतो. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते ठामपणे माझ्या पाठिशी उभे राहतात. माझ्या बाबांबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे, पण माझे बाबा माझ्यासाठी ग्रेट आहे.