प्रसाद कळी की रक्तरंजीत यक्ष ईश्वरी !

जितकी खोडकर रानात दिसते, तितकीच पवित्र देवळात आल्यानंतर वाटते. कधीतरी रानवाटेवर लावा प्रसाद हिच्या कळ्यांचा आणि विचारा हे रान मला प्रसन्न होईल का? ती खुदकन हसेल अगदी लाल चुटूक होऊन...

Story: त्या फुलांच्या गंधकोषी । अासावरी कुल |
08th October 2021, 10:30 Hrs
प्रसाद कळी की रक्तरंजीत यक्ष ईश्वरी !

दारी फुलते

वेल मोगरी

आणि वनात 

फुले ईश्वरी 

सखीच्या भेटी

येई झडकरी 

गाठ बांधली

केळी दोरी

कोणे ऐके काळी एक शक्तिशाली राजा दक्षिण प्रदेशात राज्य करीत होता. आपल्या प्रजेवर खूप प्रेम करायचा.म्हणून तो प्रजेतही लोकप्रिय होता.पण शेजारच्या राज्यातले राजे याच्यावर जळायचे आणि युद्धाची संधी शोधायचे. वनांची योग्य काळजी घेतल्यामुळे वनातील रहिवासी, प्राणी, पक्षी इतकेच काय वन यक्ष, राखणदार राजावर प्रसन्न होते. एकदा शेजारच्या राज्यातल्या राजांनी मिळून युद्धाचे आव्हान दिले. राजाने सैन्य  पाठवायचं ठरवलं, पण या वेळी शत्रू पक्ष मोठा होता . आता काय करायचं त्यावेळी वनातील लोकांनी  एक युक्ती सांगितली, त्यांनी शत्रू राज्यातली  गुर रात्रीची चोरून आणली. त्यांच्यावर मागून हल्ला झाला आणि ते खूप जखमी झाले.यक्ष या सगळ्यात इतके चिडले होते त्या अर्धमेल्या अवस्थेतही धैर्य दाखवून त्यांनी गोधन राज्यात आणले, वनातल्या पवित्र मातीची आंघोळ केली आणि ते बरे झाले. याच मातीत एका फुलाचं झाड जन्माला आलं, ज्याची फुलं रक्ताने माखल्यासारखी होती. लोकांनी त्या फुलाला कार्रीयाक्क्न  आणि वेतीची असे नाव दिले. ज्याचा अर्थ होतो रक्ताने माखलेला यक्ष आणि गुर चोरायला जाताना वापरायची फुलं. आजही वेतची घालून हा गुरे चोरायचा खेळ तमिळनाडूमध्ये खेळला जातो.बात्तीकोल नावाच्या तमिळ भागात कोंबूविलायाडू नावाचा युद्ध खेळ खेळला जातो. जो तमिळ मधल्या प्रसिद्ध देवता कन्नगी आणि तिचा नवरा कोवलन यांच्या मधल्या रस्सीखेच दर्शवतो. या खेळात करीयक्क्न झाडाची फांदी वापरली जाते. या फुलाला केरळ आणि इतर भागात ईश्वरी असे नाव आहे, शिवाचे आणि पार्वतीचे आवडते म्हणून त्याला हे नाव पडल्याची  आख्यायिका आहे. ओणमच्या सणावेळी पूवलम म्हणजे फुलांची रांगोळी घालताना ईश्वरी फार आवश्यक अशी फुलं आहेत.

या ईश्वरीचे नामकरण पोर्तुगीज अपभ्रन्शातून आय्क्सोरा असे झाले. लक्षात आलं का आपल्या हे कोणते फूल आहे? हे तर आपले पिटकुळणीचे फूल नाही का. आहो! आपल्या अवतीभवती सहज दिसणारे रानातले फूल, ज्याची फळं आपण आवडीने खातो आणि कळ्या प्रसाद लावण्यासाठी अधीकश्या देवीच्या देवळातून वापरतात ते का हे? मोगरीच्या सुबक फातीला अजून सुंदर बनवणारे हे चार पाकळ्यांचे फुल. खरंतर गुच्छ चे गुच्छ आपण असेच खुडून आणतो. या फुलांचे लागवडीत आणले गेलेले खूप प्रकार आहेत आणि बागेत लावण्याजोगे सर्वात आवडते झाड आहे. शाळेत कुठल्याही कार्यक्रमाला पाहुण्यांना देण्यात येणाऱ्या पुष्पगुच्छांचा आवश्यक असा भाग. कारण कुठल्याही बागेत कुठल्याही ऋतूत भरभरून फुलत असते हे झाड. महागडे गुच्छ देण्याची प्रथाच नव्हती त्यावेळची गोष्ट आहे ही.पाऊसभर रानोमाळ फुलताना दिसतात हे शेंदरी लाल फुलांचे गुच्छ. फुलून गेल्यावर याला रसरशीत लाल काळसर कॉफी सदृश्य फळ लागतात. जे लहान मुलांसकट पक्ष्यांचेही  अत्यंत आवडते आहे. कॉफी सदृश्य दिसणार हे झाड कोफिच्याच कुळातले आहे. आणि वर म्हटल्याप्रमाणे आय्क्सोरा कॉक्सिनिया असे याचे शास्त्रीय नाव  आहे.कोक्सिनिया म्हणजे शेंदरी लाल असा अर्थ आहे. हिंदीत रुग्मिनी, मल्याळममध्ये चेथी किंवा ईश्वरी आणि संस्कृतमध्ये बंधुका किंवा रक्तक  आणि सिंहलीमध्ये रथमाला असे म्हणतात. श्रीलंकेतल्या बऱ्याच गावांची नावं ही रथमाला नावापासून सुरु होतात इंग्रजीमध्ये स्कार्लेट जंगल फ्लेम किंवा जंगल जिरेनियम असे नाव आहे. मूळ उत्पती स्थान दक्षिण भारत आणि श्रीलंकेमध्ये असले तरी आता जगात सगळीकडे बागेत लावण्यासाठी वापरली जातात. रानटी फुलांचा रंग शेंदरी लाल आणि पांढरा असतो आणि आता वेगवेगळ्या रंगातही फुलं  उपलब्ध आहेत. गोव्यातल्या कित्येक देवळात भाविक आपले कौटुंबीक प्रश्न, समस्या घेऊन देवाकडे येतात, या फुलांच्या पाकळ्या किंवा कळ्या मूर्तीला  किंवा कलशाला चिकटवल्या जातात, ज्या बाजूची पाकळी किंवा कळी खाली पडते त्या वरून उजवा किंवा डावा कौल असे ठरवले जाते आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सकरात्मक की नकारात्मक हे ठरवले जाते.पंधरा ते वीस वर्षांपूर्वी अगदी ख्रिश्चन धर्माचे लोक अश्या प्रकारे प्रसाद लावण्यासाठी देवळात यायचे. प्रसाद लावण्यासाठी पिटकुळ वापरण्याची प्रथा कशी सुरु झाली असेल? प्रसिद्ध आकाशवाणी कलाकार, शिक्षक आणि पत्रकार श्री अरविंद सायनेकर म्हणतात की पिटकुळ सहसा वारुळानजीक फुललेली दिसते. गोव्यातल्या देवता या शान्तेर किंवा सातेर म्हणजेच वारुळाच्या रुपात पुजल्या जातात. आणि त्याचमुळे वारुळा जवळ उगवणारे म्हणून देवीला प्रिय अश्या या फुलांचा वापर प्रसाद लावण्यासाठी सुरु झाला असावा. वारुळावर उगवणाऱ्या अळंबीचे प्रतीक म्हणजे तरंग असे मत डॉ. नंदकुमार कामत यांनी वेळोवेळी मांडले आहे. तश्याच पद्धतीने पिटकुळणीचा वापर होत असावा या मताला पुष्टी मिळते. गोव्यात आपण जरी याला पिटकुळ म्हणत असलो तरी ईश्वरी हे नाव पूर्वी प्रचलित असावे असे वाटते. पौर्णिमा केरकर यांनी संकलित केलेल्या एका धालोगीतात “ वयल्या वयल्या डोंगरी फुलल्या ईश्वरी गे, फुल फुलल्या ईश्वरी गे, हाडीली फुला गुंथिले झेले, वनदेवी माया सुंदरी असा उल्लेख आहे. इतके दिवस हे ईश्वरी म्हणजे काय हे मला कळत नव्हते. पण आता त्याचा उलगडा झाला.

ईश्वरीची झाडे अत्यंत प्रभावी अशी औषधी वनस्पती आहे. फुलांचा रस, लाल झालेल्या डोळ्यासाठी वापरतात.  श्रीलंकेमध्ये लहान मुलांना आंघोळ घालण्याच्या पाण्यात ही फुलं घातली जातात कारण त्वचारोगांसाठी हे अत्यंत उपयुक्त आहेत आणि तिथे रथमाला फुलं असलेले बेबी सोप फार प्रसिद्ध आहेत.स्त्रियांच्या मासिक पाळीतल्या तक्रारीवर सुद्धा याच्या मुळाचे औषध रामबाण मानले जाते. केसांसाठी खोबरेल तेल बनवताना याची फुलं वापरली जातात.याचे इतरही बरेच फायदे आहेत.

मोगरीची शुभ्र फाती सुंदर दिसते पण पिटकुळ त्या फातीचे सौंदर्य अजून खुलवते, हातात हात घालून जाणाऱ्या सख्या सारख्या दोघीही मिरवत रहातात केसभर. रानात हिरवे पण डोळ्याला खुपू लागताना मध्येच ही लाल फुलं किंवा रसरशीत फळ लक्ष वेधून घेतात. दूर तिथे दक्षिणेत 

जरी रक्तरंजीत यक्ष असेल किंवा युद्ध फुलं असेल तरी आपल्याकडे मात्र शांत देवळात प्रसाद देणारी कळी ईश्वरीच आहे. जितकी खोडकर रानात दिसते, तितकीच पवित्र देवळात आल्यानंतर वाटते. कधीतरी रानवाटेवर लावा प्रसाद हिच्या कळ्यांचा आणि विचारा हे रान मला प्रसन्न होईल का? ती खुदकन हसेल अगदी लाल चुटूक होऊन.....