नदीत अडकली जीप; पर्यटकांची सुटका

‘दृष्टी’चे जीवरक्षक आणि ग्रामस्थांनी दिला मदतीचा हात


23rd September 2021, 12:11 am
नदीत अडकली जीप; पर्यटकांची सुटका

फोटो : दूधसागर नदीत अडकलेल्या जीपमधून पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढताना दृष्टीचे जीवरक्षक.
प्रतिनिधी । गाेवन वार्ता
धारबांदोडा : दिल्लीहून आलेल्या पाच पर्यटकांनी गुगल मॅपच्या आधारे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ दूधसागर धबधब्याकडे जाण्यासाठी महिंद्रा जीप थेट नदीच्या पाण्यात उतरवली. जीप पाण्यात अकडून पडल्याने बचावासाठी त्यांनी मदत मागितली. जवळच असलेल्या ‘दृष्टी’च्या जीवरक्षकांनी व स्थानिक ग्रामस्थांनी लागलीच मदतीचा हात पुढे करून सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. नंतर दुसऱ्या जीपच्या साहाय्याने अडकलेली जीपही पाण्यातून बाहेर काढली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथील पाच पर्यटक दूधसागर धबधब्याकडे जाण्यासाठी म्हापसा येथून जीए ०३ डब्ल्यू ३०७० क्रमांकाची महिंद्रा जीप घेऊन आले होते. त्याच जीपने कुळे येथून पुढे दूधसागर धबधब्याकडे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी कुणाकडेही रस्त्याबाबत वा अन्य कशाचीही विचारपूस केली नाही आणि जीप थेट नदीच्या पाण्यात उतरवली. सदर पर्यटकांना कदाचित दोन ठिकाणी नदी आेलांडावी लागते हे माहीत नसल्यामुळे त्यांनी जीप थेट पाण्यात उतरवल्याची शक्यता आहे.
सध्या दूधसागर पर्यटक व्यवसाय बंद आहे. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही जीपला थेट दूधसागर धबधब्यावर जाता येत नाही. शिवाय दूधसागर पर्यटन हंगाम सुरू होत नाही, तोपर्यंत वाहनाने धबधब्याकडे जाण्यासही बंदी आहे. तरीदेखील हे पर्यटक इथपर्यंत आले कसे ? वाटेत कोणीच त्यांना कसे काय अडवले नाही, त्यांची चौकशी केली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या पर्यटकांची जीप अडकली म्हणून पर्यटक थेट धबधब्यावर वाहन घेऊन जात असल्याचे समोर तरी आले. बंदी असतानाही दररोज किती पर्यटक धबधब्यावर जात असतील, एखादा मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित प्रशासनाने पर्यटकांना धबधब्यावर जाण्यास अटकाव करावा, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा