किशोरवयीनांना ऑक्टोबरमध्ये कोविड लस शक्य

झायकोव्ह डी लसीला मुलांना लसीकरणासाठी भारतात मान्यता


22nd September 2021, 11:40 pm
किशोरवयीनांना ऑक्टोबरमध्ये कोविड लस शक्य

नवी दिल्ली : देशात करोनाविरुद्ध लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. या मोहिमेमध्ये वृद्ध आणि ४५ वर्षांवरील लोकांनंतर, १८ वर्षे वय ओलांडलेल्या लोकांचे लसीकरण केले जात आहे. पण, अद्याप किशोरवयीन आणि १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या लसीकरणाची परवानगी देण्यात आलेली नाही. पण, आता लवकरच लहान मुलांनाही करोना लस मिळण्याची शक्यता आहे.
लहान मुलांच्या कोविड लसीकरणाबाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) मध्ये कोविड-१९ साठी राष्ट्रीय टास्क फोर्सच्या ऑपरेशनल रिसर्च ग्रुपचे डॉ. एन. के. अरोरा म्हणतात की, देशात एकूण ४४ कोटी मुले आहेत. त्यांपैकी १२ वर्षाखालील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचबरोबर १२ ते १७ वर्षे वयोगटातील एकूण १२ कोटी मुले आहेत. सध्या झायकोव्ह डी लसीला या वयोगटातील मुलांना लसीकरणासाठी भारतात मान्यता देण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात किशोरवयीन मुलांना लस मिळण्याची शक्यता आहे.
डॉ. अरोरा म्हणाले की, देशातील ३२ कोटी मुले १२ वर्षाखालील आहेत. सध्या दोन वर्षांखालील मुलांना करोना लसीकरणात समाविष्ट केले जाणार नाही. भारत बायोटेकसह इतर अनेक लसींच्या चाचण्यांच्या निकालांनंतर ऑक्टोबरपर्यंत किशोरवयीन गटाचे लसीकरण सुरू होईल. २०२२च्या जानेवारी ते मार्च दरम्यान २ ते १२ वर्षांच्या मुलांचे लसीकरण सुरू होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा