उगेतील पाषाण खाणी बंद करण्याची मागणी

उपजिल्हाधिकाऱ्यांना उगेवासीयांचे निवेदन; अन्यथा रास्ता रोकोचा इशारा

|
22nd September 2021, 11:36 Hrs
उगेतील पाषाण खाणी बंद करण्याची मागणी

सांगेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना उगीतील ग्रामस्थ. (संदीप मापारी)

प्रतिनिधी। गोवन वार्ता
सांगे :
उगे - सांगे येथे सर्वे क्रमांक ५२/० मध्ये सुरू असलेल्या चार पाषाण खाणी बंद करण्यासाठी उगे ग्रामस्थ एकवटले असून उगेतील सुमारे १५० ग्रामस्थ मिळून सांगेचे उपजिल्हाधिकारी सागर गावडे यांना निवेदन सादर केले. या सुरू असलेल्या पाषाण खाणी बंद करण्यासाठी ठोस पावले उचलली नाही, तर उगे जंक्शनवर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले जाईल, असा इशारा उगे पंचायतीचे पंच सदस्य संजय परवार यांनी दिला आहे.
यावेळी मेल्विन काबो, मार्कुस परेरा, स्वप्नेश नाईक व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना परवार म्हणाले की, सर्वे क्रमांक ५२/० मध्ये जे. आय. बाप्तिस्ता, सत्यप्पा धनगळकर, मारुस्का स्टोन इंडस्ट्री, धनरा मेटल्स या चार पाषाण खाणी आहेत. त्यापैकी सत्यप्पा धनगळकर व धनरा मेटल्सचा परवाना अनुक्रमे ८ सप्टेंबर २०२१ व २१ ऑगस्ट २०१९ रोजी संपला असून या दोन्ही पाषाण खाणींचे मालक परवान्यांचे नूतनीकरण न करता बेकायदेशीरपणे पाषाण खाणी चालवत आहेत.
स्वप्नेश नाईक म्हणाले की, उगे गावात सुमारे २०० घरे असून उगे गावापासून केवळ १५० मीटरवर या पाषाण खाणी कार्यरत आहेत. या खाणींवर पाषाण काढण्यासाठी तीव्र क्षमतेने जिलेटिनचे स्फोट करून पाषाण काढले जात असल्याने काही अंतरावर असलेल्या घरांना तसे देवालयांच्या भिंतीना तडे गेले आहेत तसेच धूळ प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत असते.
मार्कुस परेरा म्हणाले की, या पाषाण खाणींमुळे मातीची धूप होत असून ही माती नजीकच असलेल्या नदीत मिसळत असल्याने नदीचे पाणी दूषित होते. या पाषाण खाणींमुळे घरांना व ग्रामस्थांना धोका असल्याने सरकारने चारही पाषाण खाणी बंद कराव्यात, अशी मागणी मार्कुस परेरा यांनी केली.

चार दिवसांत निर्णय कळवणार : उपजिल्हाधिकारी
सांगेचे उपजिल्हाधिकारी सागर गावडे यांनी सांगितले की, आपण नवीन असल्याकारणाने सुरू असलेल्या पाषाण खाणींविषयीची आपल्याला माहिती नाही. आपण या संदर्भात सांगेचे मामलेदार मनोज कोरगावकर यांच्याशी चर्चा करून चार दिवसांत निर्णय कळवतो, असे त्यांनी सांगितले.